काँग्रेस-राष्ट्रवादी-जनता दल संयुक्‍त आघाडीचे उमेदवार जाहीर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 मार्च 2018

देवरूख - देवरूख नगरपंचायतीच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी-जनता दल संयुक्‍त आघाडीच्या उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली. १६ पैकी १३ उमेदवार जाहीर करण्यात आले असून नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या सौ. स्मिता संतोष लाड यांचे नाव जाहीर करण्यात आले.

देवरूख - देवरूख नगरपंचायतीच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी-जनता दल संयुक्‍त आघाडीच्या उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली. १६ पैकी १३ उमेदवार जाहीर करण्यात आले असून नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या सौ. स्मिता संतोष लाड यांचे नाव जाहीर करण्यात आले.

येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम, काँग्रेसचे नेते, माजी आमदार रमेशभाई कदम, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष युयुत्सु आर्ते, डॉ. नलिनी भुवड, हानीफशेठ हरचिरकर, माजी सरपंच मनोहर गोखले, बाळू ढवळे, प्रफुल्ल भुवड, पंकज पुसाळकर, नीलेश भुवड यांच्यासह आघाडीचे बहुतांश पदाधिकारी व संभाव्य उमेदवार यावेळी उपस्थित होते. 

जाहीर करण्यात आलेल्या यादीत सर्वसाधारण प्रभाग १ (राष्ट्रवादी), ओबीसी महिला प्रभाग- २ (काँग्रेस), सर्वसाधारण पुरुष प्रभाग ७ (काँग्रेस) अशा तीन प्रभागातील उमेदवारांची नावे गुलदस्त्यात ठेवली आहेत. प्रभाग ३ मधून सर्वसाधारण महिलासाठी राष्ट्रवादीच्या दीपाली करंडे, प्रभाग ४ च्या सर्वसाधारण पुरुष आरक्षणासाठी राष्ट्रवादीचे गणेश मोहिते, प्रभाग ५ मधील ओबीसी आरक्षणासाठी जनता दलाचे युयुत्सु आर्ते, प्रभाग ६ मध्ये सर्वसाधारण पुरुष आरक्षणासाठी राष्ट्रवादीचे प्रफुल्ल भुवड, ८ मधून ओबीसी महिलांसाठी काँग्रेसच्या स्नेहा संदीप वेल्हाळ, ९ मधून याच आरक्षणासाठी काँग्रेसच्या प्रतीक्षा प्रणय वणकुद्रे, १० मधील सर्वसाधारण पुरुषसाठी राष्ट्रवादीचे उल्हास नलावडे, ११ मधून सर्वसाधारण महिलासाठी राष्ट्रवादीच्या प्रेरणा पंकज पुसाळकर, १२ मधून सर्वसाधारण महिलांसाठी काँग्रेसच्या रिया श्रीकांत शेट्ये, १३ मधून मागासवर्गीय गटासाठी राष्ट्रवादीचे शाम कदम, १४ मधून सर्वसाधारण महिलासाठी काँग्रेसच्या पूजा विजय सुवारे, १५ साठी सर्वसाधारण महिला राष्ट्रवादीच्या रूक्‍साना बोदले, १६ साठी ओबीसी पुरुषकरिता राष्ट्रवादीचे वसंत तावडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली.

कोणत्याही स्थितीत देवरूख नगरपंचायतीवर काँग्रेस आघाडीचीच सत्ता येणार असा दावा करीत नगराध्यक्षपदावरही आमचाच उमेदवार निवडून येईल, असा विश्‍वास शेखर निकम आणि रमेश कदम यांनी व्यक्‍त केला. आघाडीने निवडणुकीची तयारी एकदिलाने सुरू केली असून आमचा विजय निश्‍चित असल्याचे आर्ते यांनी सांगितले. रिक्‍त नावांची यादी दोन दिवसांत जाहीर करू असेही स्पष्ट करण्यात आले.

Web Title: Ratnagiri News Devrukh Nagarpanchyat election