देवरुखमध्ये नगराध्यक्षपदासाठी पंचरंगी लढत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

देवरूख - जातपडताळणी प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने अपात्र ठरविण्यात आलेल्या नगराध्यक्षपदाच्या दोन उमेदवारांसह एकूण दहा उमेदवारांना आज जिल्हा सत्र न्यायालयाने निवडणूक लढविण्यास हिरवा कंदील दिला. यामुळे देवरूखच्या रणभूमीत आता नगराध्यक्षपदासाठी पंचरंगी लढत रंगणार हे स्पष्ट झाले.

देवरूख - जातपडताळणी प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने अपात्र ठरविण्यात आलेल्या नगराध्यक्षपदाच्या दोन उमेदवारांसह एकूण दहा उमेदवारांना आज जिल्हा सत्र न्यायालयाने निवडणूक लढविण्यास हिरवा कंदील दिला. यामुळे देवरूखच्या रणभूमीत आता नगराध्यक्षपदासाठी पंचरंगी लढत रंगणार हे स्पष्ट झाले. आज संध्याकाळच्या निकालानंतर देवरुखात भाजप-राष्ट्रवादीने फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या (ता. १९) दिवशी दुपारी तीनपर्यंत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याचे कारण देत (ता. २०) झालेल्या छाननीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी आविषकुमार सोनोने यांनी थेट नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेल्या आघाडीच्या सौ. स्मिता संतोष लाड, भाजपच्या सौ. मृणाल अभिजित शेट्ये यांच्यासह नगरसेवकपदासाठी अर्ज दाखल केलेले प्रभाग दोनमधील काँग्रेसच्या वैष्णवी कांगणे, भाजपच्या आश्‍विनी पाताडे, अपक्ष कल्पना केसरकर, प्रभाग ८ मधील काँग्रेसच्या स्नेहा वेल्हाळ, प्रभाग १३ मधील भाजप-आरपीआयचे वैभव कदम, अपक्ष अमोल कडवईकर, प्रभाग १६ मधील भाजपचे राजेंद्र गवंडी, अपक्ष सुरेंद्र पांचाळ, रामदास निवळकर यांचे अर्ज अवैध ठरवले होते. 

त्यानंतर तातडीने या सर्वांनी आपले अपील जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केले होते. यावर दोन दिवस सुनावणी झाली. भाजपतर्फे ॲड जी. एन. गवाणकर, ॲड. अविनाश शेट्ये, राष्ट्रवादीतर्फे ॲड. माधव भाटवडेकर, शिवसेनेकडून ॲड. चंद्रकांत मांगले आणि सरकारी वकील म्हणून श्री. गांधी यांनी काम पाहिले. ता. २६ रोजी याची पहिली सुनावणी घेण्यात आली. यामध्ये दोन पार्टींचे म्हणणे ऐकून घेण्यात आले. सरकारी पार्टी उशिरा आल्याने याचा निर्णय आज जाहीर करण्याचे घोषित करण्यात आले होते. त्यानुसार आज दिवसभर रत्नागिरीत सत्र न्यायालयात ही सुनावणी सुरू झाली. आजच निकाल लागणार या अपेक्षेने अपीलकर्ते, विरोधक, सरकारी अधिकारी आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते रत्नागिरीतच तळ ठोकून होते. संध्याकाळी साडेसहानंतर निकालप्रत टाईपिंगसाठी देण्यात आल्याने या प्रकरणाचा निकाल आजच लागणार हे निश्‍चित झाले.

त्यानुसार सर्वांनाच थांबवून ठेवले. अखेर संध्याकाळी सातनंतर या निकालपत्राचे वाचन करण्यात आले. यामध्ये अपीलकर्त्यांची बाजू रास्त ठरवत दहाही उमेदवारांना ही निवडणूक लढण्यास परवानगी देण्यात येत असल्याचा निर्णय दिला. निकालाची बातमी देवरुखात येताच भाजपच्या तालुका संपर्क कार्यालयात एकच जल्लोष करण्यात आला. भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अखंड शहरात फटाके वाजवून आनंद व्यक्‍त केला.

‘‘निवडणूक अधिकारी आणि प्रशासनाच्या गोंधळी कारभाराचा फटका आणि भुर्दंड सर्व उमेदवारांना बसला. आमचा न्यायालयावर पूर्ण विश्‍वास होता. आमची बाजू ग्राह्य धरण्यात आली. निकालाबाबत आम्ही समाधानी आहोत. आता जनतेच्या दरबारात जाऊन आम्ही बाजू मांडणार आहोत. या सर्व प्रकारात निवडणूक निर्णय अधिकारी यांची भूमिका संशयास्पद वाटली.’’
प्रमोद अधटराव,
तालुकाध्यक्ष, भाजप

लोकशाही तत्त्वाचा फायदा
भाजप आणि राष्ट्रवादीच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादामुळे निवडणूक आयोगाची अधिसूचना ग्राह्य धरण्यात आली. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पावती जोडून चालते, असे त्यांनी दाखवून दिले. ते ही मान्य केले. लोकशाहीमध्ये किरकोळ कारणामुळे कुणालाही निवडणूक लढविण्यापासून रोखू नये, या तत्त्वाचा फायदा घेत या सर्व उमेदवारांना निवडणूक लढविण्यास परवानगी देण्यात आली.

Web Title: Ratnagiri News Devrukh Nagarpanchyat election