देवरूखमध्ये शिवसेनेला नडला फाजील आत्मविश्‍वास

संदेश सप्रे
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

देवरूख - नगरपंचायतीत शिवसेना, राष्ट्रवादीच्या फुग्यातील हवाच गायब झाली. नगराध्यक्ष आणि सात नगरसेवक निवडून देत मतदारांनी भाजपला भरभरून प्रतिसाद दिला. शिवसेना, राष्ट्रवादीला फाजील आत्मविश्‍वास नडला. भाजपने शहरातील आपली ताकद सिद्ध केली. भाजपने स्वतः ७, तर मनसेच्या साथीने ८ नगरसेवक निवडून आणले आहेत.

देवरूख - नगरपंचायतीत शिवसेना, राष्ट्रवादीच्या फुग्यातील हवाच गायब झाली. नगराध्यक्ष आणि सात नगरसेवक निवडून देत मतदारांनी भाजपला भरभरून प्रतिसाद दिला. शिवसेना, राष्ट्रवादीला फाजील आत्मविश्‍वास नडला. भाजपने शहरातील आपली ताकद सिद्ध केली. भाजपने स्वतः ७, तर मनसेच्या साथीने ८ नगरसेवक निवडून आणले आहेत. आरपीआयच्या उमेदवाराने भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवून तो मोठ्या फरकाने विजयी झाला. 

शिवसेनेचे सभागृहातील संख्याबळ सातवरून चारवर आले; तर राष्ट्रवादीचाही एक नगरसेवक यावेळी कमी झाला आहे. काँग्रेसने पुन्हा खाते उघडले. एक अपक्ष बिनविरोध आला. त्याला सत्ताधाऱ्यांनाच साथ करावी लागणार आहे. या स्थितीमुळे देवरुखातील भाजपचे हात आणखी बळकट झाले.
निवडणुकीत शिवसेनेने मोठा लवाजमा मैदानात उतरवला.

पालकमंत्री रवींद्र वायकर, खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख विजय कदम, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, आमदार सदानंद चव्हाण, राजन साळवी, उदय सामंत, रवींद्र माने, सुभाष बने, बाबा कदम अशी दिग्गजांची फौज सेनेच्या प्रचारात होती. तरीही शिवसेनेला नगराध्यक्षपदाच्या लढतीत पराभव पत्करावा लागला. शिवसेना अखेरच्या टप्प्यात एक नंबरचा दावेदार बनल्याची चर्चा सुरू होती. मतदारांनी हा भ्रमाचा भोपळा फोडला.

राष्ट्रवादीकडून शेखर निकम, आमदार भास्कर जाधव, काँग्रेसकडून प्रभारी विश्‍वनाथ पाटील, रमेश कदम, खासदार हुसेन दलवाई प्रचारात उतरले होते. या सर्वांचा काहीच परिणाम झाला नाही. आगामी विधानसभेसाठी शेखर निकम यांनी राष्ट्रवादीकडून जोर लावला होता, मात्र देवरूखचे जनमत राष्ट्रवादीच्या विरोधातच गेले आहे. अखेरच्या टप्प्यात नगराध्यक्षपदी विराजमान होण्याची स्वप्ने बघणाऱ्या राष्ट्रवादीला मतदारांनी तिसऱ्या क्रमांकावर फेकले. आगामी काळातील वाटचालीसाठी या दोन्ही पक्षांना आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. 

एकाच पक्षाची सलग दुसऱ्यांदा सत्ता 
भाजपकडून केवळ राज्यमंत्री रवींद्र चव्हाण देवरुखात आले होते. जिल्हाध्यक्ष बाळ मानेंनीही थोडाफार प्रचार केला. भाजपच्या प्रचाराची सर्व यंत्रणा स्थानिक पातळीवरच राबवण्यात आली होती. प्रभावीपणे कार्यकर्ते आणि पदाधिकारी तसेच निष्ठावान यांचा पुरेपूर उपयोग करीत आजची लढाई जिंकली आहे. देवरूखच्या अलीकडच्या काही वर्षात एकाच ठिकाणी एकाच पक्षाची सलग दुसऱ्यांदा सत्ता येण्याचा हा दुर्मीळ योग जुळून आला आहे. 

विजयी उमेदवार - 

नगराध्यक्षपद निकाल -

मृणाल शेट्ये (भाजप) २४३५

 प्रभागनिहाय निकाल

प्रभाग 1 - प्रकाश मोरे (शिवसेना)१८० 

प्रभाग 2 - आश्‍विनी पाताडे (भाजप)१९०

प्रभाग 3 - रेश्मा किर्वे (भाजप)१७७

प्रभाग 4 -  वैभव पवार (शिवसेना)३१४ 

प्रभाग 5 - संतोष केदारी (भाजप) २६१

प्रभाग 6 -  प्रफुल्ल भुवड (राष्ट्रवादी) २३१ 

प्रभाग 7 -  सुशांत मुळ्ये (भाजप) २४१

प्रभाग 8 - अनुष्का टिळेकर (शिवसेना)१९७ 

प्रभाग 9 - प्रतिक्षा वणकुद्रे (काँग्रेस)१२० 

प्रभाग 10 - उल्हास नलावडे (राष्ट्रवादी) १५०

प्रभाग 11 -  प्रेरणा पुसाळकर (राष्ट्रवादी) १४८

प्रभाग 12 -  दिक्षा शेट्ये (शिवसेना) १५७ 

प्रभाग 13  - वैभव कदम (भाजप)१४४ 

प्रभाग 14 - धनश्री आंबेकर (भाजप)१८५ 

प्रभाग 15 -  निदा कापडी (शिवसेना)२४७ 

प्रभाग 16 -  राजेंद्र गवंडी (भाजप)१०९ 

प्रभाग १७ बिनविरोध - सौ वैभवी पर्शराम 

Web Title: Ratnagiri News Devrukh Nagarpanchyat election