देवरुखात राजकीय ‘दिल दोस्ती दुनियादारी’

संदेश सप्रे
शुक्रवार, 18 मे 2018

देवरूख - नगरपंचायतीच्या पहिल्या टप्प्यात सेनेसोबत युती, दुसर्‍या टप्प्यात काँग्रेस-राष्ट्रवादीशी दोस्ती, दुसर्‍या पर्वाच्या निवडणुकीत मनसे-आरपीआयशी युती आणि निवडणुकीनंतर आता राष्ट्रवादीशीही मैत्री. देवरुखातील राजकीय पक्षांची ‘दिल दोस्ती दुनियादारी’ सध्या चर्चेचा विषय ठरली. 

देवरूख - नगरपंचायतीच्या पहिल्या टप्प्यात सेनेसोबत युती, दुसर्‍या टप्प्यात काँग्रेस-राष्ट्रवादीशी दोस्ती, दुसर्‍या पर्वाच्या निवडणुकीत मनसे-आरपीआयशी युती आणि निवडणुकीनंतर आता राष्ट्रवादीशीही मैत्री. देवरुखातील राजकीय पक्षांची ‘दिल दोस्ती दुनियादारी’ सध्या चर्चेचा विषय ठरली. 

2013 ला पहिली निवडणूक युती करून लढवली. 5 नगरसेवक निवडून आले. पहिल्या अडीच वर्षात उपनगराध्यक्षपद भूषविले. युतीत घटस्फोट झाल्याने काँग्रेस- राष्ट्रवादीला सोबत घेत भाजपने नगरपंचायतीवर ताबा घेतला. गेल्याच महिन्यात दुसर्‍या निवडणुकीत भाजपने मनसे, आरपीआयला जवळ केले. हे राजकीय समीकरण पुढील पाच वर्षे तसेच राहील असे वाटत होते. मात्र उपगनराध्यक्ष, स्वीकृत नगरसेवक पदावरून खटके उडाले. मनसे राष्ट्रवादीच्या गटात गेली. विषय समिती सभापती आणि सदस्य निवडीत भाजपने आरपीआयला चुचकारत मनसेला ठेंगा दाखवला. अडीच वर्षांपूर्वीच्या मैत्रीची परतफेड करीत राष्ट्रवादीला सभापतिपद दिले.

केवळ महिन्यातच देवरुखात दोनदा समीकरणे बदलली . देवरुखात भाजपचे नक्की काय सुरू आहे असा प्रश्‍न आता देवरूखकरांना सतावत आहे. भाजपने बाजूला सारल्याने मनसे वैतागली आहे, तर मनसे स्वतःहून विरोधी गटात गेली असा भाजपचा प्रचार सुरू आहे. यात शिवसेना बाजूलाच राहिली. देवरूखची वाटचाल पुन्हा कडबोळ्याकडे सुरू आहे.

तालुक्यात वेगळी समीकरणे

देवरुखात सुरू असलेले हे विचित्र राजकारण आगामी लोकसभा आणि विधानसभेसाठी निर्णायक ठरणार आहे. या राजकारणातून देवरूखसह संगमेश्‍वर तालुक्यात काही वेगळी समीकरणे निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याच दृष्टीने देवरुखात प्रयोग सुरू असल्याचे आता स्पष्ट होत आहे.

“केवळ स्थानिक पातळीवरील राजकारणामुळे आम्ही भाजपशी युती केली. जिंकल्यावर भाजपने आमचा विश्‍वासघात केला. आम्ही विरोधी पक्षात बसायला तयार आहोत. भाजपचे हे राजकारण योग्य नाही.” 

- अनुराग कोचिरकर, शहराध्यक्ष, मनसे

Web Title: Ratnagiri News Devrukh Nagarpanchyat politics