डिझेलच्या दरावर ठरणार मालवाहतुकीचे दर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

रत्नागिरी - कोकण रेल्वे मार्गावर मालवाहतूक वाढविण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. डिझेल दराच्या चढ-उतारावर मालवाहतुकीचे दर निश्‍चित करण्यात येणार आहेत. गेले काही दिवस दर कमी राहिल्याने त्याचा फायदा कोकण रेल्वेला मिळाला आहे. नुकतेच डिझेलचे दर कमी झाल्याने रो-रोतील वाहतुकीचे दर घटले असून, 4 टक्‍के फायदा वाहतूकदारांना होणार आहे. 

मालवाहतुकीत वाढ करण्यासाठी कोकण रेल्वेचे अध्यक्ष संजय गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरीत खासगी कंपनी चालकांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्या बैठकीला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमधील सुमारे अकरा कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते. गद्रे, जिंदल, आंग्रे पोर्टच्या अधिकाऱ्यांचा त्यात सहभाग होता. रेल्वेच्या रत्नागिरी विभागातून 2016-17 या कालावधीत 38 कोटी रुपयांची मालवाहतूक झाली आहे. त्यात टाइल्स, क्‍वाइल, केमिकल यांचा सर्वाधिक समावेश आहे. यातील सर्वाधिक माल गुजरातकडे रवाना करण्यात आला आहे. कोकण रेल्वेने गेल्या 17 वर्षांत पाच लाख ट्रकांची वाहतूक रो-रो सेवेद्वारे केली. पूर्णपणे भरलेले ट्रक कोलाड ते सूरथकल येथे रेल्वे वॅगन्सवरून नेले जातात. एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांत रत्नागिरी विभागात 9 कोटी रुपयांचा व्यवसाय झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत साडेआठ कोटी रुपये व्यवसाय झाला होता. पन्नास लाखांची अधिक उलाढाल झाली आहे. 

जीएसटीचा फटका 
जीएसटीबाबत संभ्रमावस्था निर्माण झाल्यामुळे पहिल्या पंधरवड्यात मालाच्या वाहतुकीला कोकण रेल्वेला फटका बसला. सुमारे वीस टक्‍क्‍यांनी उत्पन्नात घट झाल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले; मात्र त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. 

डिझेल दरातील घटीचा फायदा महामार्गावरून वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांना होतो. रो-रो सेवा ट्रकचालकांसाठी उपयुक्‍त ठरते. त्याचा फायदा संबंधित कंपनीला होतो. दरांमधील चढ-उतारावर वाहतुकीचे दर ठरवले, तर अधिकाधिक कंपन्या रेल्वेकडे आकर्षित होतील. 
- बाळासाहेब निकम, विभागीय व्यवस्थापक, कोकण रेल्वे

Web Title: ratnagiri news Diesel