एसटी स्थानकावर मिळणार दिवाळीचा खमंग फराळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

रत्नागिरी - दिवाळीचा खमंग फराळ आता राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांवर मिळणार आहे. महामंडळाने प्रथमच ही अभिनव योजना राबवण्याचे ठरवले आहे. महिला स्वयंसहायता बचत गटांकरिता नाममात्र १ रुपये भाडेतत्त्वावर दिवाळी-भाऊबीज भगिनी सन्मान योजना असे योजनेचे नाव असून त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ४ ऑक्‍टोबर आहे. जिल्ह्यातील ७ बसस्थानके, पाली व साखरपा येथे प्रत्येकी १ व रत्नागिरी, चिपळूण स्थानकांवर प्रत्येकी २ स्टॉल मांडले जाणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या योजनेंतर्गत ८ ते २२ ऑक्‍टोबर या कालावधीत महिला बचत गटांनी तयार केलेले दिवाळी फराळ, साहित्य विक्री करता येणार आहे. रत्नागिरी एसटी विभागीय कार्यालयात विहित नमुन्यातील अर्ज, १०० रुपयांच्या बाँडपेपर व कागदपत्रांची पूर्तता करावयाची आहे. अर्जासोबत स्वारस्य असलेल्या ठिकाणांची नावे नमूद करणे आवश्‍यक आहे. त्यानंतर सोडत पद्धतीने महिला बचत गटांची निवड केली जाणार आहे.

बसस्थानकावर ८ ते २२ ऑक्‍टोबर या कालावधीत मंडप, छत्री, मेघडंबरी उभारून तात्पुरत्या स्वरूपात स्टॉल मांडता येणार आहे. कायमस्वरूपी बांधकाम करता येणार नाही. तसेच दिवाळीसाठी उत्पादित केलेल्या वस्तू अर्थात लाडू, अनारसे, चकलीचे तयार पीठ, पणत्या, कंदील, साबण, उटणे याची विक्री करता येईल. कोणत्याही स्थितीत व्यावसायिक संस्थांनी तयार केलेल्या पदार्थांची किंवा वस्तूंची विक्री स्टॉलमधून करता येणार नाही. स्टॉलमध्ये फटाके, दारुगोळा, सिलिंडर आदी ज्वलनशील पदार्थांची विक्री करता येणार नाही, अशी माहिती बारटक्के यांनी दिली.

महामंडळाने प्रथमच अशी योजना राबवण्याचे ठरवले आहे. यामुळे महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळेल. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील नोंदणीकृत महिला बचत गटांनी घ्यावा, असे आवाहन बारटक्के यांनी केले आहे.

Web Title: ratnagiri news Dipawali sweets on ST stand