ज्ञानदा पोळेकर मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय समितीद्वारे चौकशी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

रत्नागिरी - येथे शहरातील पावसकर हॉस्पिटलमध्ये योग्य उपचार न मिळाल्याने व्यवस्थापन आणि डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणाचा बळी ठरलेल्या ज्ञानदा प्रणव पोळेकर यांच्या मृत्यूची कसून चौकशी करण्याचे आश्‍वासन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दूरध्वनीवरून बोलताना दिले.

रत्नागिरी - येथे शहरातील पावसकर हॉस्पिटलमध्ये योग्य उपचार न मिळाल्याने व्यवस्थापन आणि डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणाचा बळी ठरलेल्या ज्ञानदा प्रणव पोळेकर यांच्या मृत्यूची कसून चौकशी करण्याचे आश्‍वासन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दूरध्वनीवरून बोलताना दिले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी आरोग्य सहसंचालकांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमण्यात येणार असून, तिचा अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याशी पत्रकारांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला आणि ज्ञानदा यांच्या मृत्यू प्रकरणाची माहिती दिली. या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त करत डॉ. सावंत यांनी संपूर्ण प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करून सहसंचालकांच्या अध्यक्षतेखालील समिती नेमण्यात येत असल्याचे सांगितले. याचा अहवाल लवकरात लवकर द्यावा, असे आदेशही त्यांनी दिले आहेत. आरोग्य विभागाच्या माता मृत्यूसंदर्भातील समितीद्वारेही या घटनेची चौकशी करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.

सहसंचालकांच्या अध्यक्षतेखालील समिती पावसकर हॉस्पिटलची पाहणी, जिल्हा शल्यचिकित्सकांचा प्राथमिक अहवाल याबाबत चर्चा करून अंतिम अहवाल आरोग्यमंत्र्यांना येत्या आठवडाभरात देणार आहे. याच वेळी जिल्ह्यातील सर्व नर्सिंग होमच्या सद्यःस्थितीचा आढावाही घेण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी गांभीर्याने आणि पारदर्शकपणे व्हावी, अशी मागणी पत्रकारांनी मंत्र्यांकडे केली.

ज्ञानदा पोळेकर यांचा रविवारी (ता. ११) पहाटे मृत्यू झाला. त्यानंतर सर्वसामान्य नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली. रुग्णालयात यापूर्वी अनेक दुर्दैवी घटना घडल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगत आहेत. या संपूर्ण घटनेची, पावसकर रुग्णालय आणि तेथील कर्मचाऱ्यांची चौकशी करून कडक कारवाई करण्याची मागणी पत्रकार प्रणव पोळेकर यांनी केली असून, त्याला अनेक नागरिकांनी पाठिंबा दिला आहे.

या प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली समिती चौकशी करत असून, त्यांचा अहवाल दोन दिवसांत सादर होणार आहे. या समितीने घटनेच्या दिवशीच हॉस्पिटलचा नर्सिंग परवाना पुढील आदेश होईपर्यंत निलंबित केला. तसेच संपूर्ण हॉस्पिटलची पाहणी करून त्याप्रकारचा अंतिम अहवाल ही समिती येत्या दोन दिवसांत देणार आहे.

Web Title: Ratnagiri News Dnynada Polekar Death case