कुडावळेतील देवराईवर तीन भाषांमध्ये माहितीपट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 डिसेंबर 2017

दाभोळ - निसर्गसंपदा अबाधित ठेवणाऱ्या दापोली तालुक्‍यातील कुडावळे गावच्या सुमारे १०० एकरांतील देवराईच्या प्रेमात आता सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ देखील पडले आहे. पुणे विद्यापीठाच्या एज्युकेशनल मल्टिमीडिया रिसर्च सेंटरने या देवराईवर माहितीपट बनवण्याचे काम हाती घेतले आहे. 

दाभोळ - निसर्गसंपदा अबाधित ठेवणाऱ्या दापोली तालुक्‍यातील कुडावळे गावच्या सुमारे १०० एकरांतील देवराईच्या प्रेमात आता सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ देखील पडले आहे. पुणे विद्यापीठाच्या एज्युकेशनल मल्टिमीडिया रिसर्च सेंटरने या देवराईवर माहितीपट बनवण्याचे काम हाती घेतले आहे. हा माहितीपट इंग्रजी, हिंदी व मराठी अशा तीन भाषांमध्ये बनवण्यात येणार आहे.

देश-विदेशांतील अभ्यासकांसाठी एक महत्त्वपूर्ण दस्तावेज हा माहितीपट ठरेल. यामुळे दापोलीतील छोट्याशा कुडावळे गावात जपलं जाणारं जैवविविधतेतील महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित होणार आहे. दापोली-पालवणी मार्गावर कुडावळे हे बारा वाड्यांचे गाव आहे. गावात देवराई असल्याने अर्ध्या गावचा पाणीप्रश्‍न सुटला आहे. पावसाचे धो-धो पडणारे पाणी थेट जमिनीवर न पडता ते देवराईतील उंचच उंच वाढलेल्या झाडांवर पडते. 

यानंतर ते पाणी झाडांवरून ओघळून जमिनीवर येते. देवराईमुळे जमिनीवर मोठ्या प्रमाणात पालापाचोळा पडलेला असतो. ते पाणी या पालापाचोळ्यावर पडते. पाला पाचोळ्यामुळे ते वाहून न जाता जमिनीमध्ये मुरते. तेच पाणी पुन्हा छोट्या छोट्या झऱ्यांच्या माध्यमातून गावकऱ्यांना १२ महिने उपयोगात आणता येते. कुडावळ्यातील देवराईनजीकच छोटी नदी उगम पावते तिला बारा महिने पाणी असते. हे पाणी ग्रॅव्हिटीचा उपयोग करून ग्रामस्थांच्या उपयोगात आणले जाते. या देवराईमुळे गावाला शुद्ध हवेचा २४ तास पुरवठा तर होतोच. शिवाय जेव्हा इतर ठिकाणी सुमारे ३५ अंश सेल्सियस तापमान असते तेव्हा गावात कमी तापमान असते, अशी माहिती ग्रामस्थ देतात. येथे कोणत्याही प्रकाराची जंगलतोड होत नाही. पण जमिनीवर पडलेले लाकूड उचलून ते सरपणाकरिता नेण्यास परवानगी आहे. गावातील पर्यावरणवादी दिलीप कुलकर्णी यांनी सुमारे १२ वर्षांपूर्वी त्यांच्याकडे असणारा गॅस परत देऊन टाकला होता, आता त्यांच्या सरपणाची व्यवस्था देवराई करते, हे ते अभिमानाने सांगतात.

४० पेक्षा अधिक प्रजातींची फुलपाखरे, ७० पेक्षा अधिक प्रजातींच्या पक्षांचा समावेश आहे.  धनेश, स्वर्गीय नर्तक म्हणून ओळखला जाणारा नंदन नाचण,  मोर, राज्य पक्षी पारवा आदी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. प्राण्यांमध्ये साळींदर, बिबट्या, भेकर, विविध प्रकारची माकडं, घोरपडी, मुंगूस तसेच जामिनीवर सरपटणारे व जमिनीच्या खाली रहाणारे अनेक जीव अभ्यासकांनी नोंदवलेले आहे. कोकणातील हीच देवराई आता माहितीपटाच्या माध्यमातून देशाच्या अभ्यासकांना अभ्यासाकरिता लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

४५२ प्रजातींची नोंद...
देवराईमध्ये सुमारे १०० फुटांपेक्षा अधिक उंचीची झाडे आहेत. तसेच येथे गार्बी नावाची वेल असून तिला ४ ते ६ फूट लांब शेंगा येतात. या शेंगा औषधी आहेत. येथे नरक्‍या, ताम्हण, अमृता आदी तब्बल ४५२ प्रकारच्या प्रजातींची नोंद आहे. तसेच झाडांमध्ये राज्य वृक्ष असणार ताम्हण, बकूळ, बेहडा, हेला, पाईन, कनेरी, चिरफळ तसेच आंबा, काजू, फणस आदी फळझाडेदेखील मोठ्या प्रमाणात आहेत. 

देवराई हे गावाचे फुफ्फुस आहे. यामुळे परिसरात चांगला पाउस पडतो, वातावरण नेहमी थंड राहते. ग्रामस्थांची देवराईवर श्रद्धा आहे. तेथील झाडे कोणी तोडत नाही. केवळ सुक्‍या लाकडांचा वापर करतात. गावकऱ्यांना माहीत आहे की देवराई आहे म्हणून नदी आहे, नदी आहे म्हणून आपण आहोत.

- विनय महाजन, उद्योजक व शेतकरी- कुडावळे

आंब्याची इथली झाडे सहज ओळखता येत नाहीत. कारण ती ७०-८० फूट उंच आहेत. त्याला पहिली फांदीच ४० फुटांवर आहे. त्याव्यतिरिक्त, बेहेडा, सप्तपर्णी, नान्या, अमृता, माकड लिंबू, कुंभ, गारबी, पेतुंगली, गुळवेल इत्यादी शेकडो प्रजातींची नोंद केली गेली आहे. माझ्या अभ्यासात मला इथे ४५२ वनस्पती प्रजाती मिळाल्या.

- डॉ. उमेश मुंडले, पर्यावरण अभ्यासक

Web Title: Ratnagiri News documentary on Kudavale Devrai