कांदळवन संवर्धनासाठी ‘कोकण चॅप्टर’ - डॉ. अरविंद उंटवाले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 मार्च 2018

कांदळवनांच्या संवर्धनासाठी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या मदतीने मॅंग्रुव्हज्‌ सोसायटी ऑफ इंडियाने कोकण चॅप्टरची निर्मिती केली आहे, अशी माहिती मॅंग्रुव्हज्‌ सोसायटी ऑफ इंडियाचे कार्यकारी सचिव डॉ. अरविंद उंटवाले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

रत्नागिरी - महाराष्ट्रातील कांदळवन क्षेत्रात ८२ चौरस किलोमीटरने वाढ झाली असल्याचे वनविभागाच्या अहवालातून दिसून येते. कांदळवनांच्या संवर्धनासाठी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या मदतीने मॅंग्रुव्हज्‌ सोसायटी ऑफ इंडियाने कोकण चॅप्टरची निर्मिती केली आहे, अशी माहिती मॅंग्रुव्हज्‌ सोसायटी ऑफ इंडियाचे कार्यकारी सचिव डॉ. अरविंद उंटवाले यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच मुंबईमध्ये सर्वाधिक कांदळवनांची तोड होत असून त्याला वेळीच आळा घातला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. 

‘किनाऱ्यावरील पाणथळ जागा’ याबाबत शनिवारी गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये सुरू झालेल्या राष्ट्रीयस्तरावरील चर्चासत्रासाठी ते रत्नागिरीत आले आहेत. या वेळी संस्थेचे सहसचिव डॉ. विनोद धारगळकर, डॉ. प्रदीप सरमुकादम, प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, डॉ. ए. एस. कुलकर्णी उपस्थित होते. 
डॉ. उंटवाले म्हणाले, ‘‘मॅंग्रुव्हज्‌ सोसायटीतर्फे कांदळवन संवर्धन आणि संशोधन या दोन्ही भूमिका पार पाडल्या आहेत.

संवर्धनासाठी स्थानिक पातळीवरील संस्था, इच्छूक व्यक्‍तींच्या सहकार्याने काम काम चालविले आहे. रत्नागिरीतील शिरगावमध्ये अशाचप्रकारे कांदळवनाची लागवड केली आहे. आता तेथे २ हजार चौरसफूट एवढे कांदळवन तयार झाले आहे. किनारी भागातील औद्योगिक कंपन्यांमुळे कांदवळनाला धोका निर्माण झाला आहे. हा धोका टाळण्यासाठी औद्योगिक कंपन्यांमधील लोकांना एमएसआयची कार्पोरेट मेंबरशीप दिली आहे. त्यांच्यातच संवर्धनाबाबत जागृती झाल्याने वनांच्या तोडीवर निर्बंध येत आहेत. त्यांच्याकडून संवर्धनासाठीही पुढाकार घेतला जात आहे.

रत्नागिरीत १ चौ.कि.मी.ने वाढ
भारतीय वनस्थिती अहवालानुसार २०१५ मध्ये २२२ चौ.कि.मी कांदळवन क्षेत्र होते. ते २०१७ मध्ये ३०४ चौ.कि.मी. इतके झाले. त्यात ८२ चौ.कि.मी ची भरघोस वाढ झाली आहे. कांदळवनक्षेत्राची पुननिर्मिती आणि संगापेनासाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती केली आहे. राज्यात १७ हजार हेक्‍टरचे कांदळवन क्षेत्र शासकीय जमिनीवर, तर १३ हजार हेक्‍टरचे क्षेत्र खासगी जमिनीवर आहे. वाढ झालेल्या ८२ चौ.कि.मी.मध्ये मुंबई उपनगरातील वाढ १६, ठाणे जिल्ह्यातील वाढ ३१, रायगड जिल्ह्यातील वाढ २९, रत्नागिरी जिल्ह्यातील वाढ १, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाढ ५ चौ.कि.मी. इतकी आहे. कांदळवन वाढीत महाराष्ट्रानंतर दुसऱ्या क्रमांकावर आंध्र प्रदेश आहे. तिथे ३७, तर गुजरातमध्ये ३३ चौ.कि.मी.ची वाढ नोंदली गेली आहे.

देशाच्या किनाऱ्यावर पंधरा ठिकाणे कांदळवन संरक्षित म्हणून घोषित केली आहेत. नागरिकांनी टाकलेला कचरा कांदळवनात साचल्याने पूरपरिस्थिती निर्माण होते. मुंबईतील मिठीला आलेला पूर त्याचे उदाहरण आहे. कोकणात तशी परिस्थिती नाही. येथे कांदळवनाबाबत जनजागृती होत असून संरक्षित भागही आहेत.’’

भाट्ये ते काजळीनदीपर्यंत बोटसेवा 
रत्नागिरीत अनेक ठिकाणी कांदळवने आहेत. भाट्ये येथील कांदळवनाचा अभ्यास झाला आहे. भाट्ये खाडी ते काजळी नदीपर्यंत ३२ किलोमीटर अंतरात पर्यटकांना फिरता येईल, अशी बोटसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना दिला असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवल्याची माहिती, डॉ. कुलकर्णी यांनी दिली.

जैवविविधता व्यवस्थापन समिती हवी
कांदळवनाच्या संवर्धनासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावर जैवविविधता व्यवस्थापन समिती स्थापन करणे गरजेचे आहे. गोव्यामध्ये हा प्रयोग यशस्वी झाला आहे. महाराष्ट्रात त्याची प्रकर्षाने अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. समितीमध्ये पर्यावरणप्रेमींना संधी दिली गेली, तर निश्‍चितच फायदा दिसून येईल, असे डॉ. प्रदीप सरमुकादम यांनी सांगितले.

Web Title: Ratnagiri News Dr Arvind Untawale press