लोटे औद्योगिक वसाहतीतील सीईटीपीतून रासायनिक सांडपाणी नाल्यात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 मार्च 2018

लोटे - लोटे औद्योगिक वसाहतीतील सीईटीपीतून सोडण्यात येणारे रासायनिक सांडपाणी शुक्रवारी (ता. २३) रात्रीपासून सकाळी अकरा वाजेपर्यंत सहा तास नाल्यातून वाहत असल्याने नाल्यातील पाणी मोठ्या प्रमाणावर दूषित झाले आहे.

लोटे - लोटे औद्योगिक वसाहतीतील सीईटीपीतून सोडण्यात येणारे रासायनिक सांडपाणी शुक्रवारी (ता. २३) रात्रीपासून सकाळी अकरा वाजेपर्यंत सहा तास नाल्यातून वाहत असल्याने नाल्यातील पाणी मोठ्या प्रमाणावर दूषित झाले आहे. घाणेखुंट-खोंडेवाडी येथील घराशेजारी पाटावाटे रासायनिक सांडपाणी आल्याने येथील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

सीईटीपीतून प्रक्रियायुक्त रासायनिक सांडपाणी कोतवली खाडीमध्ये सोडण्यात आले आहे. रासायनिक सांडपाण्याची पाइपलाइन घाणेखुंट येथील नदीपात्रातून कोतवली खाडीपात्रात सोडली आहे. वारंवार ही पाइपलाइन फुटून रासायनिक सांडपाणी नाल्यात पसरते. गेल्या महिनाभरात तीनवेळा पाइपलाइन फुटून हा प्रकार उद्‌भवला.

शुक्रवारी रात्री चार वाजता सीईटीपीतून सांडपाणी पाइपलाइनमधून सोडण्यात आले असता घाणेखुंट-खोंडेवाडी येथे पाइपलाइनवर असणाऱ्या व्हेन्टमधून सोडण्यात येणारे सांडपाणी बाहेर पडून नाल्यात मिसळले. पहाटे चार ते सकाळी अकरा वाजेपर्यंत हे सांडपाणी नाल्यामार्गे वाहत होते. घाणेखुंट ग्रामस्थांनी सीईटीपीमध्ये जाऊन सांडपाणी त्वरित बंद करण्यास सांगितले.

रासायनिक सांडपाणी उघड्यावर सोडण्याच्या घटना वारंवार का घडतात, असे विचारले असता सीईटीपीच्या अधिकाऱ्यांनी उत्तर देण्याचे टाळले. ग्रामस्थांनी सीईटीपी बंद करा, अशी मागणी केल्यानंतर ग्रामस्थांना लेखी आश्वासन देत यावर मंगळवारी (ता. २७) एकत्र बसून कायमचा तोडगा काढू, असे सांगितले.

या वेळी सीईटीपीचे व्यवस्थापक फौजदार, श्रेयस कंपनीचे व्यवस्थापक सय्यद उपस्थित होते. सीईटीपीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. या वेळी घाणेखुंटचे उपसरपंच महेंद्र मोरे, किशोर धापसे, गणेश धापसे, संदेश माने, गजानन मोरे, अनंत धापसे, राहुल धापसे, कृष्णा खापरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. 

पाण्याचा प्रश्‍न गंभीर
घाणेखुंट-खोंडेवाडी येथील ग्रामस्थांनी श्रमदानाने नाल्यावर कच्चा बंधारा बांधून नाल्यातील पाणी पाटामार्गे वाडीमध्ये नेले होते. खोंडेवाडी येथील ग्रामस्थांना पाण्याचे कोणतेही साधन नसल्याने ग्रामस्थ नाल्यातील पाण्याचा पिण्यासाठी व इतर कामासाठी वापर करीत होते. रासायनिक सांडपाणी नाल्यात पसरल्याने खोंडेवाडी येथील ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे.

Web Title: Ratnagiri News drainage chemical water issue in Lote MIDC

टॅग्स