डामडौल टाळून पर्यावरणस्नेही विवाह सोहळा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

ना विवाहामुळे पर्यावरणाचा ऱ्हास झाला, ना उधळपट्टी. सजावटीसाठी फलकांचा उपयोग करण्याची नामी कल्पना त्यांनी राबवली. शिवाय पाहुण्यांना वेगवेगळ्या प्रकारची रोपे भेट दिली. त्यामुळे एका अर्थाने हा सोहळा पर्यावरणस्नेही विवाह ठरला.

खेड - विवाहाच्या वेळी शाही डामडौल, शिवाय रोषणाई, श्रीमंतीची उधळण किंवा किमान दर्शन नेहमीच पाहायला मिळते. परंतु खेड येथील चिंचघर-दस्तुरी येथील उद्योजक रमेश चव्हाण यांनी आपल्या मुलीच्या विवाह सोहळ्यात पर्यावरणाचा समतोल राखण्याचा संदेश दिला.

ना विवाहामुळे पर्यावरणाचा ऱ्हास झाला, ना उधळपट्टी. सजावटीसाठी फलकांचा उपयोग करण्याची नामी कल्पना त्यांनी राबवली. शिवाय पाहुण्यांना वेगवेगळ्या प्रकारची रोपे भेट दिली. त्यामुळे एका अर्थाने हा सोहळा पर्यावरणस्नेही विवाह ठरला.

लग्नातील भव्यता, आकर्षक रोषणाई, मोठा शामियाना या साऱ्याला फाटा देत लग्नमंडपात विविध पर्यावरणासंदर्भातील विविध विचार पसरवण्यात आले. प्रवेशद्वारावर पर्यावरणाचा संदेश देणारे फलक लक्षवेधी ठरत होते. सजावटीसाठीच त्याचा उपयोग केल्याने एक वेगळाच माहौल आणि वातावरण तयार झाले.

चिंचघर-दस्तुरी येथील उद्योजक रमेश ऊर्फ बावा शेट चव्हाण यांची कन्या प्रणिता हिचा विवाह आंबवली येथील स्वप्नील यादव यांच्याशी झाला. रमेश चव्हाण यांनी जुन्या प्रथा परंपरांना फाटा दिला. आहेराखातर दिखावू श्रीमंती वस्तू वा तत्सम काही देण्याऐवजी आंबा, काजू, पेरू, चिकू, नारळ, सुपारी, बदाम, लिंबू यांची झाडे भेट दिली. सुमारे पाचशे विविध प्रकारची फळझाडांची रोपे पाहुण्यांना वाटली. त्यामुळे हा लग्नसोहळा आगळावेगळा ठरला. राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम, जिल्हा परिषदेचे सभापती चंद्रकांत कदम, योगेश कदम, केशव भोसले, उद्योजक नितीन विचारे यांनी भेटीदाखल रोपे स्वीकारलीच व चव्हाण यांचे कौतुक केले.

पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस ढासळत आहे. मोठ्या प्रमाणात जमिनीची धूप होत आहे. वृक्षतोड थांबविली नाही, तर पुढच्या पिढीला यातना भोगाव्या लागतील. म्हणून विवाहाच्या निमित्ताने पाहुण्यांना पारंपरिक आहेराऐवजी रोपे दिली.
- रमेश चव्हाण

Web Title: Ratnagiri News Eco-Friendly Wedding Function