रत्नागिरीत शिक्षण मेळाव्यात नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमांच्या पध्दती

राजेश कळंबटे
मंगळवार, 27 मार्च 2018

रत्नागिरी - नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ करण्यासाठी राबविलेले उपक्रम सर्व शिक्षकांना पाहता यावेत यासाठी शिक्षण विभागामार्फत तालुकास्तरीय शिक्षण मेळाव्याचे आयोजन रत्नागिरीत करण्यात आले.

रत्नागिरी - नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ करण्यासाठी राबविलेले उपक्रम सर्व शिक्षकांना पाहता यावेत यासाठी शिक्षण विभागामार्फत तालुकास्तरीय शिक्षण मेळाव्याचे आयोजन रत्नागिरीत करण्यात आले. नियमित शिक्षण डिजिटल साधनांच्या वापरासह गणित, मराठी शिकण्यासाठी कृतीयुक्त अभ्यासक्रमांचा आधार घेणारे स्टॉल यामध्ये होते. सुमारे पंधराशे लोकांनी भेट दिली.

उद्यमनगर येथील नाईक सभागृहात तालुकास्तरीय शिक्षण मेळावा आयोजित केला होता. याचे आयोजन जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, जि. प. शिक्षण विभाग व पं. स. शिक्षण विभाग, शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांतर्फे करण्यात आले होते. याचे उद्घाटन जिल्हापरिषद अध्यक्षा स्नेहा सावंत, पंचायत समिती सभापती मेघना पाष्टे, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, वैशाली गावडे, स्नेहा चव्हाण, रेहाना साखरकर, श्री. तोडणकर, सुनील पाटील उपस्थित होते. याप्रसंगी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेत्या मानसी गवंडे यांच्यासह अन्य शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.

संगमेश्‍वर तालुक्यातील पांगरी शाळेला भेट दिली होती. त्यांनी राबविलेला बचत बँकेचा उपक्रम उत्तम आहे. अशाप्रकारचे चांगले उपक्रम विविध शाळांमध्ये राबविणे गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा अशी सूचना सौ. सावंत यांनी केली.

तंत्रज्ञानाच्या वापर केल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये डिजीटल साहित्य वापरले जाते. शाळा डिजीटल झाली म्हणजे जबाबदारी संपली, असे शिक्षकांनी समजू नये. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संवादही तेवढाच महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांचा आत्मविश्‍वास वाढविणे आवश्यक आहे. एखादा अधिकारी शाळाभेटीला गेला तर त्यांच्याबरोबर संवाद साधण्यात विद्यार्थी कमी पडतात. गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे सौ. पाष्टे यांनी सांगितले.

गटविकास अधिकारी जाधव म्हणाले की, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरण अंतर्गत शाळाशाळांमधून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होत आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. शाळांमध्ये भौतिक सुविधा, सजावट करताना विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.  या वारीत विविध उपक्रमांची माहिती देणारे 15 स्टॉल मांडण्यात आले असून, त्याद्वारे नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमावेळी विशेष उल्लेखनीय कार्य करणार्‍या मानसी गवंडे, दीपक माळी, तुजा हिरवे, कशेळी शाळा क्रं.1, नेवरे देवपाट शाळा, कुरतडे शाळा क्र. 1 यांच्या सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर तालुकास्तरावर यशस्वीपणे शिक्षण मेळावा आयोजित केल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी सुनील पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

Web Title: Ratnagiri News Education Rally