कोकण विद्यापीठासाठी सकारात्मक - शिक्षणमंत्री तावडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

रत्नागिरी - स्वतंत्र कोकण विद्यापीठ विद्यार्थ्यांना हवे असल्यास त्या मागणीचा सकारात्मक विचार करू. कोकणातील लोकप्रतिनिधींची बैठक बोलावू. जून २०१८ ला नवे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी निर्णय करू, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी अर्धा तास आग्रही मागणी केली. त्यावेळी तावडे बोलत होते. यामुळे कोकण विद्यापीठाच्या निर्मितीला गती मिळण्याची आशा आहे.

मुंबई विद्यापीठाशी सध्या ७६४ महाविद्यालये संलग्न आहेत. यामुळे प्रशासनावर कमालीचा ताण पडत असून विद्यापीठाच्या कार्यक्षमतेसंबंधी प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या विद्यापीठात गोंधळाचे वातावरण आहे. हजारो विद्यार्थ्यांच्या सोयीबरोबरच रोजगारक्षम अभ्यासक्रम राबविण्यासाठी कोकणात स्वतंत्र  विद्यापीठ स्थापन करण्याची मागणी ॲड. डावखरे यांनी केली.

मुंबई विद्यापीठाचे मुख्यालय कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयासाठी गैरसोयीचे ठरते. सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांना ५५० किलोमीटर अंतरावरून यावे लागते. दूरवरील अंतरामुळे विद्यार्थ्यांबरोबरच प्राध्यापकांचीही गैरसोय होते. कोकण विद्यापीठ झाल्यास प्रवास, वेळ, खर्च वाचून प्रशासनात अधिक कार्यक्षमता निर्माण होईल, याकडे आमदार डावखरे यांनी लक्ष वेधले. महाविद्यालयीन स्तरावर रोजगारक्षम अभ्यासक्रम राबविण्याची आवश्‍यकता आहे.

सोलापूर या केवळ एका जिल्ह्याकरिता ३६ महाविद्यालयांकरिता स्वतंत्र विद्यापीठ होते तर मग कोकणला का नको? म्हणूनच रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करावे, अशी मागणी आमदार डावखरे यांनी केली.

रत्नागिरीतील ४५, सिंधुदुर्गातील ३८ अशा ८३ महाविद्यालयांकरिता स्वतंत्र विद्यापीठाच्या मागणीकरिता कोकणातील सर्व आमदार, शैक्षणिक संस्था, विद्यार्थ्यांनी एकमुखी पाठिंबा दिला आहे. कोकण विद्यापीठात अभ्यासक्रमांची निवड करताना कोकणी संस्कृतीचा, विचारांचा आग्रह आहे. हा प्रश्‍न सर्वत्र चर्चिला जातो आहे. रत्नागिरी उपकेंद्रात को-ऑर्डिनेटर नसल्याने अपेक्षा फोल ठरवल्या आहेत.

कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ झाल्याने स्थानिक गरजेप्रमाणे रोजगारक्षम अभ्यासक्रम तयार करता येतील. यामध्ये समुद्रविज्ञान, प्रक्रिया उद्योग, पर्यटन तसेच टिळक-आंबेडकरांच्या कोकणात कोकण विद्यापीठामुळे हक्काचे शैक्षणिक व्यासपीठ उपलब्ध होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कोकण विद्यापीठ लवकरच दृष्टिक्षेपात येईल असे पाहावे, अशी प्रतिक्रिया कोकण विद्यापीठ कृती समितीचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे यांनी दिली.

Web Title: Ratnagiri News Educational Minister Vinod Tawade comment