ईडूतील गुंतवणुकीमुळे जोडपे घटस्फोटापर्यंत

मुझफ्फर खान
रविवार, 14 जानेवारी 2018

चिपळूण - ईडूने चिपळूणकरांना केले येडू अशा शब्दात गुंतवणूकदारांची सार्थ चेष्टा केली जात आहे. मात्र, पैसे बुडण्याच्या भीतीने फक्त आर्थिकच नव्हे, तर काही जणांसाठी कौटुंबिक समस्याही उभ्या राहिल्या आहेत. काही पत्नी-पत्नींमध्ये, मित्रांमित्रांमध्ये आणि नातेवाईकांमध्ये गैरसमजुतीची किंवा कटुतेची दिवार उभी राहिली आहे.

चिपळूण - ईडूने चिपळूणकरांना केले येडू अशा शब्दात गुंतवणूकदारांची सार्थ चेष्टा केली जात आहे. मात्र, पैसे बुडण्याच्या भीतीने फक्त आर्थिकच नव्हे, तर काही जणांसाठी कौटुंबिक समस्याही उभ्या राहिल्या आहेत. काही पत्नी-पत्नींमध्ये, मित्रांमित्रांमध्ये आणि नातेवाईकांमध्ये गैरसमजुतीची किंवा कटुतेची दिवार उभी राहिली आहे.

पत्नीला किंवा पतीला न सांगता गुंतवलेले पैसे मिळायचे कसे या विवंचनेत काहीजण पडले आहेत. अपवादात्मक कुटुंबात पैसे आणले नाही तर वेगळा होईन अशी धमकी देण्यापर्यंत बाब पोचली आहे. 

ईडूमध्ये पैसे दुप्पट होतील या आमिषाने काहींनी आपल्या मित्रांना गुंतवणूक करण्यास सांगितले. काही महिलांनी पतीला कल्पना न देता, तर काही पुरुषांनी पत्नीला कल्पना न देता दागिने गहाण ठेवून गुंतवणूक केली होती. ईडूच्या संचालकाला अटक झाल्यानंतर गुंतवणूकदारांचे बिंग फुटले.

ईडूमध्ये पैसे अडकल्यानंतर इम्तियाज मुकादम यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर ईडूचा संचालक रविकिरण बटुला याला पोलिसांनी अटक केली. त्याला पाच दिवस पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. त्यानंतर पाचजणांनी ईडूच्या विरोधात पोलिसांशी संपर्क साधला. त्यांची पंचवीस लाखांपर्यंत फसवणूक झाली आहे. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. त्यांचे पती कामानिमित्त परदेशात असतात. त्यांना कल्पना न देता त्यांनी ईडूमध्ये गुंतवणूक केली होती.

ईडूच्या संचालकाला अटक झाल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती फोनवरून परदेशात असलेल्या पतीला दिली. पैसे परत न आल्यास घटस्फोट देण्याचा इशारा त्यांनी पत्नीला दिला आहे. काही स्थानिक पुरुषांनी पत्नीला न सांगता तिचे दागिने गहाण ठेवून यामध्ये गुंतवणूक केली होती. आता दागिने बॅंकेत आणि पैसे ईडूमध्ये गुंतलेले आहेत. घरात पत्नीने दागिने मागितले तर काय सांगू असा प्रश्‍न अनेकांना पडला आहे.

दागिने बॅंकेत असल्यामुळे त्याचे व्याज दरमहा भरावे लागत आहे. पहिल्या टप्प्यात ज्यांचे पैसे दुप्पट झाले त्यांनी आपले मित्र, नातेवाईक यांना ईडूमध्ये पैसे गुंतवण्यास सांगितले होते. नातेवाइकांवर विश्‍वास ठेवून ज्यांनी पैसे गुंतविले त्यांचेही पैसे ईडूमध्ये अडकले आहेत. सप्टेंबरनंतर बटुला याने पैसे देण्यास टाळाटाळ केल्यानंतर अनेकांच्या मैत्रीमध्येही कटुता निर्माण झाली आहे. 

एजंट देतात आश्‍वासन

राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याचे भासवणारे बटुलाचे एजंट आहेत. बटुला याला अटक झाल्यानंतर त्यांनी गुंतवणूदारांमध्ये तक्रारदार इम्तियाज मुकादम यांच्याबद्दल गैरसमज पसरविण्यास सुरवात केली आहे. मुकादम यांनी तक्रार दिल्यामुळे तुमचे पैसे अडकले आहेत. बटुला याची पोलिस कोठडीतून सुटका झाल्यानंतर तुमचे पैसे मिळतील असे आश्‍वासन एजंट देत आहेत. 

चिपळूण पोलिसांनी ईडूचे काविळतळी येथील कार्यालय सील केले आहे. त्याच्या राहत्या घराची तपासणी करून काही कागदपत्रे जप्त करण्यात आली. ज्यांनी ईडूमध्ये पैसे गुंतवणूक करून गैरमार्गाने पैसे कमविले त्यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होणार आहे. काहींना पोलिस साक्षीदार म्हणून घेणार आहेत. ईडूचे संचालक रविकिरण बटुला याच्याकडून काहींनी जबरदस्तीने पैसे वसूल केले अशा लोकांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला जाणार आहे. ज्यांची फसवणूक झाली त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी.'' 

- प्रदीप मिसर, पोलिस निरीक्षक चिपळूण

Web Title: Ratnagiri News Eidu investment issue