एक्‍स्पोर्ट दर्जाच्या मासळीने करोडोंची उलाढाल

राजेश कळंबटे
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

रत्नागिरी -  वातावरणातील बदलांसह डिसेंबर महिन्यात घातलेल्या पर्ससीननेटवरील बंदीचा फायदा मच्छीमारांना वारेमाप मिळत आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांत बंपर मासळीने मच्छीमारांना सुगीचे दिवस आले आहेत. परदेशात निर्यातीला आवश्‍यक अशी दर्जेदार मासळी मिळू लागल्याने मिरकरवाडा बंदरात करोडोंची उलाढाल झाल्याची माहिती पुढे आली आहे.

रत्नागिरी -  वातावरणातील बदलांसह डिसेंबर महिन्यात घातलेल्या पर्ससीननेटवरील बंदीचा फायदा मच्छीमारांना वारेमाप मिळत आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांत बंपर मासळीने मच्छीमारांना सुगीचे दिवस आले आहेत. परदेशात निर्यातीला आवश्‍यक अशी दर्जेदार मासळी मिळू लागल्याने मिरकरवाडा बंदरात करोडोंची उलाढाल झाल्याची माहिती पुढे आली आहे. बांगडी, तार्ली, शिवडसारखी सोनेरी मासळी टनावारी मिळू लागल्याने पर्ससीननेटसह सर्वांनीच दिवाळी साजरी केली.

सप्टेंबर महिन्याच्या मध्यात वादळाने कोकण किनारपट्टीला तडाखा दिला. सलग तीन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसासह वेगवान वाऱ्याने मच्छीमारांची वाट अडवली होती; परंतु त्यानंतर समुद्रातील बदललेल्या प्रवाहांनी मासळी कोकणच्या किनाऱ्याकडे वळू लागली आहे. सप्टेंबरला पर्ससीननेट मच्छीमार समुद्रात सरसावल्यानंतर सुरवातीला मच्छीचे प्रमाण कमी होते.

वादळ गेल्यानंतर मासळी मिळण्यास सुरवात झाली. शासनाने घातलेल्या पर्ससीननेट बंदीचा फायदाही यावेळी मच्छीमारांना झाला. पर्ससीननेटसाठी १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर हा कालावधी मच्छीमारीसाठी दिला आहे. थंड पाण्याचे प्रवाह आणि वादळानंतरचे बदललेले वातावरण बांगडी, शिवड, तार्लीला पोषक असते. त्याचा फायदा मच्छीमारांना झाला आहे. गेले आठवडाभर मिरकरवाडा बंदरासह जिल्ह्यातून तब्बल दोनशे कोटींहून अधिक रुपयांची मासळी परजिल्ह्यात निर्यात करण्यात आली आहे. परदेशी निर्यातीला आवश्‍यक अशी दर्जेदार मासळी मिळू लागल्याने परकीय चलन मच्छीमारांच्या पदरात पडत आहे.

जिल्ह्यात पर्ससीननेटच्या सुमारे दोनशेहून अधिक नौका आहेत. एका नौकेला प्रत्येकी दोन ते तीन टन मासळी मिळत आहे; मात्र मासळी मोठ्याप्रमाणात मिळत असल्याने पुरेसा बर्फ मिळत नाही. समुद्रात मासळी पकडल्यानंतर ठेवण्यासाठी आवश्‍यक बर्फाची गरज असते. पुरेसा बर्फ नसेल तर पकडलेला मासा बंदरावर आणेपर्यंत टिकून राहत नाही. त्याचा दर्जा घसरतो आणि दरही कमी मिळतो. मासळी मिळते, पण दर घसरलेला अशी स्थिती सध्या मिरकरवाडा बंदरावर पाहायला मिळत आहे. बांगडीसाठी ३२ किलोच्या एका डिशला ६०० ते १००० रुपये दर मिळत आहे. बर्फ असेल तर त्याला १२०० ते १५०० रुपयांपर्यंत दर मिळाला असता, अशी तक्रार मच्छीमारांकडून केली जात आहे.

बंपर मासळीमुळे संभ्रमावस्था
अचानक पृष्ठभागावर आलेली बंपर मासळी जाळ्यात सापडू लागल्याने मच्छीमारांमध्ये शंकाकुशंका निर्माण झाल्या आहेत. जपानमध्ये भूकंप झाल्याची पोस्ट सोशल मीडियावर पडल्याने गेले दोन ते तीन दिवस चर्चेला उधाण आले आहे. त्याचबरोबर मच्छीमारांमध्येही समुद्रात हालचाल सुरू झाल्यामुळे मासळी मोठ्याप्रमाणात मिळत असल्याची शंका व्यक्‍त केली जात आहे. 

गेले दोन दिवस धुके पसरले आहे. मासळीची आवकही आठ दिवसांच्या तुलनेत घटली आहे. त्यामुळे बर्फाची अडचण भविष्यात भासणार नाही.
- पुष्कर भुते, मच्छीमार

Web Title: Ratnagiri news Exports-quality fish turnover of crores