रत्नागिरीत १३० एकरांत रात्रीच्या प्रकाशझोतातही शेती कामे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

कळवंडे सात्वीणवाडीतील एक-दोन नव्हे, तर पन्नास शेतकरी मध्यरात्रीदेखील शेतात राबतात. कडाक्‍याच्या थंडीत, अंधारात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दिशांतर संस्था धावून आली. डोमिनियन कंपनीच्या सहकार्याने दिशांतरने या शेतकऱ्यांसाठी शेतात प्रकाश पुरवला आहे.

चिपळूण - वन्य प्राण्यांपासून रक्षण करण्यासाठी शेतकरी रात्रभर शेतात पहारा देण्याचे चित्र आज फारसे दिसत नाही. अशावेळी शेतीच्या कामांना दिवस पुरत नाही म्हणून मध्यरात्रीपर्यंत शेतात राबतो, असे कोणी सांगितले तर कोणाचाच विश्वास बसणार नाही. मात्र कळवंडे सात्वीणवाडीतील एक-दोन नव्हे, तर पन्नास शेतकरी मध्यरात्रीदेखील शेतात राबतात. कडाक्‍याच्या थंडीत, अंधारात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दिशांतर संस्था धावून आली. डोमिनियन कंपनीच्या सहकार्याने दिशांतरने या शेतकऱ्यांसाठी शेतात प्रकाश पुरवला आहे.

दिशांतर संस्थेच्या मार्गदर्शनाखाली तालुक्‍यातील कळवंडे सात्वीणवाडी येथील दत्तकृपा कृषी उद्योग गटाने १३० एकर सामुहिक सेंद्रीय शेती केली आहे. येथे कोबी, मिरची, मेथी, कोथिंबीर, वांगी, फ्लॉवर, भेंडी, चवळी अशा भाजीपाल्यासह झेंडूची लागवड करण्यात आली आहे. सामुहिक सेंद्रीय शेतीसाठी या गटाने स्वतंत्र पाणी योजना राबवली आहे. गटातील सर्व शेतकऱ्यांची वैयक्तिक शेतीदेखील आहे. स्वमालकीच्या शेतीतील भाजीपाला काढणे, तो विक्रीला बाजारपेठेत घेऊन जाणे, स्वत:चे अन्य व्यवसायांमुळे शेतकऱ्यांना सामुहिक शेतातील कामाला दिवसा वेळ मिळत नाही.

१३० एकर शेतीला पाटाने पाणी देण्यासाठी अधिक वेळ लागतो. त्यामुळे या गटातील ५५ शेतकरी कडाक्‍याच्या थंडीतही रात्री १ वाजेपर्यत गटाच्या शेतीला पाणी लावण्याचे काम करतात.  पुरेसा प्रकाश नसल्याने  वेळ लागतो, अन्य अडचणी येतात. ही गोष्ट लक्षात घेऊन दिशांतर संस्थेने डोमिनीयन कंपनीच्या साह्याने शेतकऱ्यांना पॉवर ट्रिलर व जनरनेटरची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.  जनरेटरमुळे १३० एकराच्या शेतीत प्रकाशझोतांची व्यवस्था करण्यात आली.

डोमिनियन डायमंड इंडियाने १ लाख ६५ हजाराचा पॉवर ट्रीलर व ८६ हजाराचा जनरेटर देऊन शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ दिले आहे. संचालक सेन्थिल कुमारन, व्यवस्थापक ओमप्रकाश डोवरा, सचिन वाघमारे, नितीन अहिरे आदींनी  शेतकरी घेत असलेली मेहनत पाहून भारावून गेले.  

गटाचे अध्यक्ष वसंत उदेग यांनी गटशेती कामाची व प्रकल्पाची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिली. यावेळी  संदीप उदेग, संतोष पानगले, संतोष उदेग, यांच्यासह महिला शेतकरी, दिशांतरचे अध्यक्ष राजेश जोष्टे, नितीन यादव उपस्थित होते.

Web Title: Ratnagiri News farm work in high voltage Night lamp