दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना 30 हजार कोटींची कर्जमाफी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 जून 2017

रत्नागिरी - दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना 30 हजार कोटींची कर्जमाफी दिली जाईल, असे सांगतानाच भाजप प्रदेश प्रवक्ते मधुकर चव्हाण यांनी आज येथे मध्यावधी निवडणुकांची शक्‍यता फेटाळून लावली. तसेच शिवसेना आमच्यासोबत सत्तेत आहे. भविष्यातील धोरणासंबंधी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा करू; मात्र द्वेषापोटी बोलणाऱ्या संजय राऊत यांसारख्यांच्या वक्तव्याला कवडीचीही किंमत देणार नाही, असा टोला त्यांनी लगावला.

भाजप जिल्हा संपर्क कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ""ज्याला खरोखरच गरज आहे अशा शेतकऱ्यांचीच कर्जमाफी होईल. यासाठी समिती नेमली आहे. गेल्या वेळच्या कर्जमाफीमध्ये धनिकांचीही कर्जमाफी झाली. शरद पवार यांनी स्वामिनाथन आयोगातील तरतुदी स्वीकारल्या तरी हमीभावाची अट स्वीकारली नाही. शेतीमालाला हमीभाव देताना त्याचा दर वाढला, तर सामान्य ग्राहकांना भुर्दंड बसेल, हे एक दुष्टचक्र आहे. ते भेदण्यासाठी फक्त कर्जमाफी नव्हे, तर शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी पीकविमा, जलशिवार योजना, शेततळे, मातीपरीक्षण अशा विविध योजना राबविल्या जात आहेत.''

शिवसेनेच्या संजय राऊत यांनी मध्यावधी निवडणुकांची शक्‍यता व्यक्त केली होती. त्यासंदर्भात चव्हाण म्हणाले, की पक्षप्रमुख ठाकरे किंवा शिवसेनेच्या सुरवातीपासून ज्यांनी पक्षासाठी कष्ट घेतले असे मनोहर जोशी आदी काही म्हणाले, तर त्याची दखल आमचे वरिष्ठ घेतील; मात्र राऊत यांच्या विधानाला कवडीमोलही किंमत नाही. भाजपने जनताभिमुख शासन राबविल्याने पुढील विधानसभा निवडणुकीत भाजपला जनता स्वीकारेल. भाजप स्वबळावर सत्ता स्थापनेसाठी सज्ज आहे.

Web Title: ratnagiri news farmer strike marathi news maharashtra konkan news