लोकमान्यांवरील चित्रपट ‘स्वराज्य..’रत्नागिरीत प्रदर्शित

मकरंद पटवर्धन
मंगळवार, 31 जुलै 2018

लोकमान्य टिळकांवरील चित्रपट काढण्याचे स्वप्न वास्तवात आणण्यासाठी मी गेली वीस वर्षे प्रयत्न करत होतो. अखेर ‘स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क’ हा चित्रपट सत्यात उतरला आहे

-  विनय धुमाळे

रत्नागिरी - लोकमान्य टिळकांवरील चित्रपट काढण्याचे स्वप्न वास्तवात आणण्यासाठी मी गेली वीस वर्षे प्रयत्न करत होतो. अखेर ‘स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क’ हा चित्रपट सत्यात उतरला आहे.टिळकांच्या जन्मभूमीत हा चित्रपट प्रथम प्रदर्शित व्हावा, अशी मनापासून इच्छा होती. ही इच्छा आता गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचा फिल्म क्‍लब पूर्ण करत आहे. १ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे, अशी माहिती चित्रपटाचे निर्माते, लेखक, दिग्दर्शक विनय धुमाळे यांनी दिली.

टिळकांच्या काळातले काही गंभीर प्रश्‍न या चित्रपटात मांडले आहेत.आजही हे प्रश्‍न ‘जैसे थे’ आहेत. त्यामुळे समाजशास्त्र, राज्यशास्त्राचे विद्यार्थी, समाजातील विचारवंतांना हा चित्रपट दाखवायचा आहे. लोकांनी त्यावर विचार करावा, असा उद्देश चित्रपट काढण्यामागचा आहे. यातून पैसे मिळवणे हा उद्देश नाही. सध्या थोर शास्त्रज्ञ आईनस्टाईन यांच्यावर चित्रपटाचे कामही सुरू आहे. याकरीता ११ देशांचा दौरा नुकताच केल्याचे धुमाळे यांनी सांगितले. टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त फिल्म क्‍लबतर्फे चित्रपटाचे प्रदर्शन होणार आहे.

लोकमान्यांच्या लोकोत्तर व्यक्तिमत्त्वाचे दर्शन या चित्रपटामध्ये घडते. तसेच ते स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी नेते होते. केसरी व मराठामधील त्यांचे स्वराज्य, स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबतच्या निर्भीड विचारांवर प्रकाश टाकला आहे. खगोलशास्त्रज्ञ, गणिती, भारतीय विद्यांचे संशोधक, श्रीमद्‌भगवतगीतेचे समीक्षक असे टिळकांच्या व्यक्तित्त्वाचे आयाम हा चित्रपट उलगडून दाखवतो. यात अमित शंकर यांनी लोकमान्यांची भूमिका केली आहे.

श्रीराम लागू, टॉम अल्टर या दिग्गज कलाकारांबरोबरच जी. के. गोखले, विनोद नागपाल, नागेश भोसले, रवी खरे अभिनेत्यांच्या भूमिका आहेत. श्री. धुमाळे यांनी दूरदर्शनमधील प्रदीर्घ नोकरीत शंभर फिचर फिल्मस व व्यक्तिचित्रे निर्मिली. दूरचित्रवाणीमधील त्यांच्या असाधारण योगदानासाठी त्यांना देशातील पहिला जानकीनाथ गौड पुरस्कार मिळाला आहे.

विनामूल्य पाहण्याची पर्वणी
फिल्म क्‍लबने हा चित्रपट विनामूल्य पाहण्याची पर्वणी टिळकप्रेमी आणि इतिहासप्रेमींना उपलब्ध करून दिली आहे. राधाबाई शेट्ये सभागृहात सायंकाळी ५.३० ते ८ या वेळेत चित्रपट प्रदर्शित होईल.

Web Title: Ratnagiri News films 'Swarajya' displayed in Ratnagiri