फिनोलेक्‍सच्या साह्याने फिरत्या प्रयोगशाळेला गती

फिनोलेक्‍सच्या साह्याने फिरत्या प्रयोगशाळेला गती

रत्नागिरी - जिल्हा परिषदेच्या गुहागरमधील वीस शाळांमध्ये जनकल्याण समितीतर्फे ‘फिरती प्रयोगशाळा’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवला जातो. यात पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण करण्याचे काम गेली दहा वर्षे सुरू आहे. या उपक्रमास आज फिनोलेक्‍स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाऊंडेशनच्या वतीने एक लाखाचे साह्य देण्यात आले. यामुळे फिरत्या प्रयोगशाळेला अधिक गती मिळणार आहे.

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जनकल्याण समिती हा उपक्रम राबवते. त्यातून जिल्हा परिषदेच्या २० शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमातील प्रयोग दाखवले जातात. उपकरणे हाताळायला दिली जातात. यामुळे त्यांना विज्ञानाबद्दल गोडी वाटू लागते. ग्रामीण भागात अपवादानेच विद्यार्थ्यांना अशी उपकरणे पाहायला, हाताळायला मिळत असल्याने त्यांच्यात अधिक कुतूहल निर्माण होते. प्रयोगशाळा कधी एकदा शाळेत येते याकरिता विद्यार्थी आतुरलेले असतात. प्रयोगशाळेला मुकुल माधव फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्‍वस्त रितू छाब्रिया यांच्यामुळे मोलाचे सहकार्य मिळाले आहे, असे प्रकल्पप्रमुख दिनेश जाक्कर यांनी सांगितले.

दरमहा वेळापत्रक देऊन प्रत्येक शाळेत फिरती प्रयोगशाळा नेली जाते. त्या दिवशी शाळेत कोणते प्रयोग दाखवले याचा अहवालही मुख्याध्यापकांकडून घेतला जातो. दापोली, संगमेश्‍वरमध्येही अशी प्रयोगशाळा असून दर तीन महिन्यांनी या सर्वांचा आढावा घेतला जातो.

आज ४५ हजार रुपयांचे प्रयोग साहित्य आणि ६५ हजारांची दुचाकी फिनोलेक्‍सने दिली. या वेळी प्रकल्पाचे मार्गदर्शक अशोक दीक्षित, अशोक आठवले, सुनील लाकडे, प्रकल्प शिक्षक अविनाश म्हातनाक, जिल्हा शिक्षण प्रकल्प प्रमुख मनोहर पवार, फिनोलेक्‍सचे डॉ. आशुतोष मुळ्ये, अभिषेक साळवी उपस्थित होते.

२० शाळांतील ११०० विद्यार्थ्यांना लाभ
वरवेली शिंदेवाडी, पालपेणे नं. १, २, अडूर नं. १, असगोली नं. १, कोंडकारुळ बोऱ्या, पाटपन्हाळे नं. १, पेवे, खामशेत नं. ३, कर्दे नं. २, वेळणेश्‍वर नं. १, नरवणे नं. २, गुहागर नं. १, कोंडकारुळ, अडूर भाटले, वरवेली नं. १, पिंपर नं. १, साखरी आगर नं. १, वेलदूर-नवानगर, धोपावे नं. १, पेवे पारदळेवाडी या वीस शाळांतील ११०० विद्यार्थी फिरत्या प्रयोगशाळेचा लाभ घेतात.

एकदा चुकून रंगपंचमीच्या दिवशी प्रयोगशाळा येणार असल्याचे जाहीर केले; पण सुटी असूनही सर्व विद्यार्थी हजर राहिले. प्रयोगशाळा येण्याच्या दिवशी शाळेत १०० टक्के विद्यार्थी उपस्थित असतात. एकदा विद्यार्थी खेळून आल्यावर त्यांच्या हातावर पाण्याचा थेंब टाकून मायक्रोस्कोपखाली किटाणू दाखवले. त्यामुळे सर्व विद्यार्थी हात धुऊनच जेवायला बसतात. एवढेच नव्हे तर घरच्यांनाही तसे करायला सांगतात, हे प्रकल्पाचे यश आहे.
- अशोक दीक्षित

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com