बारा तास अग्नितांडव; २६ कोटींची हानी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 मार्च 2018

चिपळूण - गाणे-खडपोली औद्योगिक वसाहतीतील कृष्णा ॲन्टी ऑक्‍साईड कंपनीच्या नवीन प्लॅंट आणि गोदामाला शुक्रवारी (ता. २) दुपारी तीनच्या सुमारास आग लागली. यामध्ये कंपनीचे सुमारे २६ कोटी ६२ लाखांचे नुकसान झाले. 

चिपळूण - गाणे-खडपोली औद्योगिक वसाहतीतील कृष्णा ॲन्टी ऑक्‍साईड कंपनीच्या नवीन प्लॅंट आणि गोदामाला शुक्रवारी (ता. २) दुपारी तीनच्या सुमारास आग लागली. यामध्ये कंपनीचे सुमारे २६ कोटी ६२ लाखांचे नुकसान झाले. 

आगीनंतर कंपनीत होणाऱ्या पिंपाच्या स्फोटामुळे गाणे व खडपोली ही दोन्ही गावे हादरत होती. कानठळ्या बसवणारे आवाज सुरू असल्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. अथक परिश्रमानंतर मध्यरात्री तीन वाजता १२ तासांनंतर आग आटोक्‍यात आली. त्यानंतर नागरिकांनी सुटकेचा श्‍वास घेतला.

रत्नागिरी, खेड, चिपळूण पालिकेचे अग्निशमन बंब, जिंदल, पोफळी महानिर्मिती कंपनी आणि लोटे औद्योगिक वसाहतीतील अग्निशामक बंबाच्या साह्याने मध्यरात्री तीनला आग आटोक्‍यात आणण्यात यश आले. तब्बल १२  तास गाणे खडपोली परिसरातील नागरिक भीतीच्या छायेखाली होते. शुक्रवारी शिमगोत्सवाची कंपनीला सुटी होती. त्यामुळे कंपनीतील चाळीस कामगार सुटीवर होते. केवळ सुरक्षारक्षक कंपनीत हजर होते. दुपारी ३ वाजता अचानक कंपनीतून धूर येऊ लागला. त्यानंतर क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले.

कंपनीच्या छतावरील पत्रे उडाले. पिंपात भरलेल्या पॉलीऑल केमिकलने पेट घेतल्यावर स्फोट सुरू झाला. स्फोटाच्या आवाजाने नागरिकांच्या कानठळ्या बसत होत्या. संपूर्ण कंपनी परिसरात आगीचे व धुराचे प्रचंड मोठे लोट तयार झाले होते. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले. धूर येत असल्याचे लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी कंपनीकडे धाव घेतली. यातूनच सुरक्षा अधिकारी व नागरिक यांच्यामध्ये किरकोळ धक्काबुक्की झाली. भीतीपोटी सुरक्षा अधिकारी तेथून पिंपळी येथे निघून गेला.

आग विझविण्यासाठी पोफळी येथील महानिर्मिती कंपनीचे अग्निशामक बंब मागविण्यात आले. कृष्णा ॲन्टी ऑक्‍साईड कंपनीत आग विझवण्यासाठी पुरेशी यंत्रणा नव्हती. त्यामुळे कृष्णा केमिकल कंपनीतील एक हजार लिटर फोमचा आग विझवण्यासाठी वापर करण्यात आला. हा फोमच आग विझविण्यासाठी महत्त्वाचा ठरला. एका बाजूला आग विझविण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू होते, तर दुसऱ्या बाजूने कंपनीत रसायनाने भरलेली पिंपे बाजूला करण्याचे काम सुरू होते.

रात्री ८.३० वाजता कोळसा भरलेल्या बॉयलरचा मोठा स्फोट झाला. त्याचा आवाज काही किलोमीटरपर्यंत गेला. या स्फोटाने परिसर दणाणला. रात्री आठच्या सुमारास रत्नागिरी, खेड नगरपालिका आणि लोटे औद्योगिक वसाहतीतील अग्निशामक बंब मागविण्यात आले. चिपळूण पालिका आणि महानिर्मिती कंपनीचे बंब घटनास्थळी अगोदरच दाखल होते. मध्यरात्री तीन वाजता कंपनीतील आग आटोक्‍यात आली. तत्पूर्वी, कंपनी व गोडाऊनमधील सर्व यंत्रणा जळून खाक झाली होती. 

काळजी घेण्याचे आवाहन
आग आटोक्‍यात येत नसल्याने उपस्थित अधिकाऱ्यांनी कंपनीपासून एक किमीची वस्ती तत्काळ हलवली. घरांमध्ये तसेच शाळांमध्ये असलेले गॅस सिलिंडर बाहेर काढले. स्फोटांमुळे निर्माण झालेला धोका व धुरांच्या लोळामुळे होणारी खवखव आणि डोके दुखण्याचा त्रास नागरिकांमध्ये सुरू झाला. हा धूर आरोग्यासाठी हानिकारक असल्याने कुणीही परिसरात थांबू नये, लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी, असे पोलिसांकडून आवाहन करण्यात आले.

संबंधीत बातम्या

खडपोली आैद्योगिक वसाहतीमध्ये रसायनांच्या गोदामाला भीषण आग 

Web Title: Ratnagiri News Fire In Khadpoli MIDC