सीईटीसाठी रत्नागिरी मत्स्य महाविद्यालय संलग्न

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

रत्नागिरी - शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयाचे स्थलांतर नागपूर येथील महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू) येथे होत असल्याची सध्या चर्चा आहे. मात्र हे स्थलांतरण नाही तर संलग्नीकरण आहे. याचा फायदा सामायिक परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी तसेच मच्छी व्यावसायिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे, असा दावा विद्यापीठातील सूत्रांनी केला आहे.

रत्नागिरी - शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयाचे स्थलांतर नागपूर येथील महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू) येथे होत असल्याची सध्या चर्चा आहे. मात्र हे स्थलांतरण नाही तर संलग्नीकरण आहे. याचा फायदा सामायिक परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी तसेच मच्छी व्यावसायिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे, असा दावा विद्यापीठातील सूत्रांनी केला आहे.

मत्स्य महाविद्यालय दापोलीच्या कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न आहे. राज्यातील सागरी व भूजलीय मत्स्य व्यवसायाचा शाश्‍वत विकासासाठी माफसूची स्थापना झाली. त्यावेळी महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांतर्गत असलेली पशुविज्ञान, मत्स्य विज्ञान व दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालये माफसूमध्ये समाविष्ट केली होती. मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे मत्स्य महाविद्यालय व त्याअंतर्गत येणारी संशोधन केंद्रे माफसूमधून वगळले.

बीएफएससी अभ्यासक्रमासाठी सीईटी परीक्षा शासनाने घोषित केली आहे. सर्व मत्स्य महाविद्यालयांसाठी एकच प्रवेश प्रक्रिया असावी. यासाठी शिरगावचे मत्स्य महाविद्यालय माफसूशी संलग्न करण्याबाबत शासन विचाराधीन आहे. तांत्रिकदृष्ट्या हे योग्य असून विद्यार्थी, पालकांची गैरसोय टळेल. तसेच राज्यातील अभियांत्रिकी, कृषी, मत्स्य व दुग्ध अभ्यासक्रमात एकच प्रवेश प्रक्रिया सोयीची ठरणार आहे.

कृषी विद्यापीठात राहण्याऐवजी मत्स्य महाविद्यालय स्वतंत्र मत्स्य विज्ञान विद्यापीठात समाविष्ट झाल्यास महाविद्यालयाला भरीव आर्थिक निधी प्राप्त होऊ शकेल. ज्यायोगे कोकणाला भेडसावणारे मासेमारीचे संकट आणि मत्स्यशेतीतील पीछेहाट भरून काढण्यास्तव महत्त्वाचे संशोधन व शेतकरी उपयोगी विस्तार उपक्रम राबवता येतील. कोकणच नव्हे तर संपूर्ण राज्याच्या हिताच्या दृष्टीने तसेच या क्षेत्रामध्ये कार्यरत मच्छीमार बांधव, मत्स्य संवर्धक, उद्योजक, संशोधक आणि विद्यार्थी यांना फायद्याचे ठरेल.

केंद्र सरकारच्या पंचवार्षिक व नीलक्रांती योजनाच्या शिफारसीनुसार राज्यातील मत्स्य विकासाला चालना मिळेल. मच्छीमार व सागरी मासेमारी करणाऱ्या मत्स्य व्यावसायिकांचे सबलीकरण होईल. अशा प्रकारच्या संलग्नीकरणामुळे स्वतंत्र मत्स्य विद्यापीठाच्या निर्मितीसाठीसुद्धा भविष्यात चालना मिळेल.

Web Title: Ratnagiri News Fisheries College connected to MAFASU for CET