मुहूर्तालाच कोळंबीसह पापलेटचा बोनस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

शासकीय मुहूर्तावर समुद्रात गेलेल्या नौकांना कोळंबीचा आधार मिळाला. पहिल्या दिवशी नौका लवकर बंदरात दाखल झाल्या. रोज सकाळी या नौका समुद्रात जातील व सायंकाळी बंदरात परततील.
- पुष्कर भुते, मच्छीमार

रत्नागिरी - मच्छीमारीचा मुहूर्त झाला. पहिल्याच दिवशी कोळंबीसह पापलेटने हात दिला. जिल्ह्यात मच्छीमारांनी शासकीय मुहूर्त साधला. मिरकरवाडा बंदरातून सुमारे २५ ते ३० नौका दर्यात गेल्या. प्रत्येक नौकेला सुमारे दीडशे किलो कोळंबीवर समाधान मानावे लागले. काही नौकांना पापलेट सापडल्याने दिलासा मिळाला. हा हंगाम फायदेशीर ठरण्याचा विश्‍वास मच्छीमारांनी व्यक्त केला. 

मत्स्यदुष्काळ लक्षात घेऊन शासनाने १ जून ते ३१ जुलै या कालावधीत मासेमारी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आजपासून मासेमारी सुरू झाली. पाऊस नसल्यामुळे समुद्रही शांत आहे. पाण्याला करंट नसल्याने लाटांचा वेग धोकादायक नाही. त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात जाण्यास कोणतीच अडचण आली नाही. मिरकरवाडा बंदरातील पहिल्या दोन जेटीजवळ गाळ नसल्याने नौकांना भरतीची वाट पाहावी लागली नाही. पूर्णगडपासून काही अंतरावर अनेक नौकांना कोळंबीचा लॉट सापडला. त्यामुळे मिरकरवाड्यासह आजूबाजूच्या बंदरातील नौकांनी तिकडेच डेरा टाकला होता. या नौका दुपारच्या सुमारास बंदरात परतल्या. प्रत्येक नौकेला दीडशे ते दोनशे किलो कोळंबी सापडली होती. सोनेरी मासळी म्हणून ओळखला जाणारा पापलेट मच्छीमारांसाठी बोनस ठरतो. त्याला दरही चांगला मिळतो. सुरवातीलाच पापलेट हाती लागल्याने मच्छीमार  खूश होते. बंदरावर कोळंबीला किलोमागे पन्नास रुपये दर मिळाला. पापलेटलाही चांगला भाव मिळाला.

गेली दोन वर्षे पर्ससीननेटवर शासनाने बंदी घातल्याने अनेक नौका बंदच ठेवण्यात आल्या होत्या. काही नौका चोरून मासेमारी करतात, असा आरोप पारंपरिक मच्छीमारांनी केला. त्यावर मत्स्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला होता. काही प्रमाणात पर्ससीननेटला आळा बसल्याचा फायदा या हंगामात मिळण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: ratnagiri news Fisherman