चिपळूण, खेडच्या खाडीकिनारी स्थलांतरित पक्षी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

चिपळूण - जगभरातून हजारो मैलांचा प्रवास करून काही काळ विसावण्यासाठी विविध पक्ष्यांचे चिपळूण व खेडच्या खाडीकिनारी आगमन झाले आहे. गुहागर, दापोली, मंडणगड तालुक्‍यातील समुद्रकिनारीही विदेशी पक्ष्यांची शाळा भरत आहे. युरोप, सैबेरियातून येणाऱ्या विविध प्रजातींचे पक्षीवैभव येथे पाहावयास मिळत आहे. 

चिपळूण - जगभरातून हजारो मैलांचा प्रवास करून काही काळ विसावण्यासाठी विविध पक्ष्यांचे चिपळूण व खेडच्या खाडीकिनारी आगमन झाले आहे. गुहागर, दापोली, मंडणगड तालुक्‍यातील समुद्रकिनारीही विदेशी पक्ष्यांची शाळा भरत आहे. युरोप, सैबेरियातून येणाऱ्या विविध प्रजातींचे पक्षीवैभव येथे पाहावयास मिळत आहे. 

रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनारे व खाड्या समृद्ध पर्यावरणासाठी ओळखल्या जातात. या ठिकाणी वेगवेगळे आवाजाचे डौलदार पक्षी पर्यटकांसाठी आकर्षण ठरतात. समुद्रावर घिरट्या घालत मासा टिपणारा समुद्री गरूड ‘सी ईगल’ खाडी आणि समुद्रकिनारी दिसू लागला आहे.  त्याला टिपण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. पर्यटकांची सर्वाधिक पसंती दापोलीतील समुद्र किनाऱ्यांना असते. 

हर्णे, केळशी, आंजर्ले, बुरोंडी या भागात पुणे व इतर भागातून सर्वाधिक पर्यटक येतात. सांयकाळची वेळ ते समुद्र किनाऱ्यावर येणारे पक्षी पाहण्यासाठी राखून ठेवतात. 

दापोलीच्या समुद्र किनारी शेकडोच्या संख्याने ‘सी ईगल’ पक्षी घिरट्या मारत असतात. पाणकावळ्या जातीच्या स्नेकबर्ड या पक्ष्यांचे थवे चिपळूणच्या खाडीकिनारी पहायला मिळत आहेत. सापाच्या आकारासारखी मान असल्याने त्यांना मराठीत सापमाने असे म्हटले जाते. या पक्ष्यांचा विहार हा पाहण्यासारखा असतो. हिरव्या रंगाचे पाणीदार डोळे असणारा मालार्ड डक त्याला मराठीमध्ये मोठा बदक असे म्हटले जाते. हा पक्षी गोवळकोटच्या खाडीमध्ये दिसत आहे. सररूची या पक्ष्यासह फावड्यासारखी चोच असणारे शॉवेललर हा पक्षी युरोपमध्ये येतो. तो मालदोली परिसरात आढळतो.

पट्टाकदम, रूडी शेलडक परिसरातून गायब
बारहेडेड गुज- पट्टाकदम असं मराठीत नाव असलेला हा पक्षी परिसरातून गायब झाला आहे. अत्यंत डौलदार हंस प्रजातीचा हिमालयावरून उडतो. त्याची अतीउंच उडण्याची क्षमता हा अभ्यासकांना कोड्यात टाकणारा विषय आहे. सैबेरियातून हा पक्षी येथे येत होता. त्याशिवाय रूडी शेलडक हा बदक प्रजातीतील पक्षीही फारसा दिसत नाही.

गार्गीनी डक - सर्वसामान्य बदकापेक्षा आकाराने लहान असणारा गार्गीन डक येथे पहायला मिळतो. तपकीरी रंगाचे डोके व पिवळसर शेपटी असणारा कॉमन टील हा अत्यंत देखणा पक्षी येथे पहायला मिळतो. थव्याने विहार करताना या पक्ष्यांचा आकार हा विलोभनीय दिसतो. त्यामुळे त्यांच्या फोटोसाठी हौशी छायाचित्रकार समुद्र किनारी वाट पहात असतात. 

कोकणात अलिकडे पावसाचा कालावधी वाढला आहे. उत्तर भारतात पूर्वी तलाव कोरडे पडत होते. अलिकडे या तलावात पुरेशा पाण्यामुळे पक्षी या ठिकाणी विसावतात. कोकणातली समुद्राच्या पाण्यात रासायनिक पाणी सोडले जात असल्यामुळे पक्षी कमी होण्याचा धोका आहे. 
- समीर कोवळे,
पक्षी निरिक्षक . 

Web Title: Ratnagiri News foreign birds on chiplun seashore