मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी जागा मोजणीचे तोंडी आदेश

राजेश शेळके
सोमवार, 12 फेब्रुवारी 2018

रत्नागिरी - मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी होणाऱ्या भूसंपादनाचे काम स्थानिक व्यापारी संघटनांच्या विरोधामुळे थांबले होते. शासन स्तरावरून तसे तोंडी आदेश आले होते. तोंडी आदेशावरून थांबलेली ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे तोंडी आदेश महसूल विभागाला प्राप्त झाले आहेत.

रत्नागिरी - मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी होणाऱ्या भूसंपादनाचे काम स्थानिक व्यापारी संघटनांच्या विरोधामुळे थांबले होते. शासन स्तरावरून तसे तोंडी आदेश आले होते. तोंडी आदेशावरून थांबलेली ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे तोंडी आदेश महसूल विभागाला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे कुवारबाव येथील ३५० मीटर जागेच्या मोजणीसाठी तारीख निश्‍चित करून ही प्रक्रिया केली जाणार आहे. व्यापारी संघटनेचा ४५ मीटरला तीव्र विरोध पाहता भूसंपादनाचा वाद चिघळण्याची शक्‍यता आहे. 

मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी आवश्‍यक जागेच्या भूसंपादनाची जबाबदारी रत्नागिरी प्रांताधिकारी अमित शेडगे यांच्यावर आहे. मिऱ्या ते आंबा घाटापर्यंतच्या भूसंपादनाचे काम सुरू आहे. सरासरी ४५ ते ६० मीटर एवढे भूसंपादन केले जात आहे. यामध्ये कुवारबाव बाजारपेठ पूर्णपणे उद्‌ध्वस्त होणार आहे, असा आक्षेप घेत स्थानिक व्यापाऱ्यांनी याला विरोध केला.

एकदा भूसंपादनाचे काम बंद पाडले. त्यानंतर आमदार उदय सामंत यांच्या मदतीने सार्वजनिक बांधकामंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन व्यापाऱ्यांनी बाजू मांडली. शहराचा विस्तार हातखंबा दिशेने होणार आहे. पश्‍चिमेकडील बाजूला समुद्र आहे. याचा विचार करून कुवारबाव ते हातखंबा या दरम्यान ३० मीटरप्रमाणे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी व्यापाऱ्यांनी व स्थानिकांनी केली. तसे पत्र चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिले होते. 

भूसंपादनाची प्रक्रिया थांबविण्याचे तोंडी आदेश जिल्हा प्रशासनाला होते. त्यामुळे अनेक दिवस ही प्रक्रिया रखडली होती. याबाबत मुंबईत नुकतीच बैठक झाली. शासनाने उर्वरित भूसंपादनाचे काम पूर्ण करण्याचे पुन्हा तोंडी आदेश दिले आहेत. त्यामुळे तारीख निश्‍चित करून जिल्हा प्रशासन ही प्रक्रिया करणार आहे. व्यापारी संघ आणि स्थानिक याविरोधात एकवटले आहेत. ३० मीटरला त्यांचा विरोध नाही. मात्र ४५ मीटरला त्यांनी विरोध केला आहे. पुन्हा भूसंपादनाची कार्यवाही होणार असल्याने व्यापारी संघाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 

स्थगिती मिरज भागापुरतीच
रत्नागिरी-नागपूर प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाला मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. मिरज येथील शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवरून न्यायालयाने हा निर्णय दिला. याचिकेवरील पुढील सुनावणी १४ फेब्रुवारीला होणार आहे. मात्र, ही स्थगिती मिरज भागापुरती मर्यादित असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.  

कुवारबाव येथील ३५० मीटर भागातील भूसंपादनास स्थानिकांचा विरोध असल्याने शासनाने तोंडी आदेश दिल्यामुळे ही प्रक्रिया थांबली होती. शासनाने पुन्हा तोंडी आदेश देऊन भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्याचेही आदेश दिले आहेत. तारीख निश्‍चित करून ही प्रक्रिया केली जाईल.’’
- अमित शेडगे,
प्रांताधिकारी, रत्नागिरी

Web Title: Ratnagiri News four track highway issue