ईडूने बनवले येडू; चिपळुणात कंपनीविरुद्ध तक्रार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जानेवारी 2018

चिपळूण - गुगलवरील जाहिराती पाहून पैसे कमविण्याच्या व्यवहारात ईडू ॲण्ड अर्न कन्सल्टन्सी या कंपनीकडून फसवणूक झाल्याची फिर्याद मंगळवारी (ता. ९) रात्री चिपळूण पोलिस ठाण्यात दाखल झाली. पोलिसांनी संबंधित कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल केला आहे.

चिपळूण - गुगलवरील जाहिराती पाहून पैसे कमविण्याच्या व्यवहारात ईडू ॲण्ड अर्न कन्सल्टन्सी या कंपनीकडून फसवणूक झाल्याची फिर्याद मंगळवारी (ता. ९) रात्री चिपळूण पोलिस ठाण्यात दाखल झाली. पोलिसांनी संबंधित कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल केला आहे.

जिल्ह्यातील नागरिकांचे काही कोटी रुपये या कंपनीत अडकले आहेत. गुंतवणूकदार आपले पैसे घेण्यासाठी कंपनीच्या कार्यालयात खेटे मारत आहेत. पैसे देणे शक्‍य नसल्यामुळे मालकाने काविळतळी येथील कंपनीचे कार्यालय बंद करून पोबारा केला आहे. 

पेठमाप येथील इम्तियाज अ कादीर मुकादम यांनी या संदर्भात तक्रार दिली आहे. श्री. मुकादम यांनी तीन लाख व त्यांची बहीण परवीन शिरोळकर हिने दीड लाखाची गुंतवणूक केली होती. कंपनीकडून गुंतवणूक केलेली रक्कम व नफ्याची रक्कम न मिळाल्यामुळे त्यांनी पोलिस ठाण्यात कंपनीचे मालक रविकिरण बुटाला यांच्या विरोधात फिर्याद दिली. 

गुगलच्या माध्यमातून जाहिराती पाहून लाखो रुपये कमविण्याचे आमिष ईडू ॲण्ड अर्न कन्सल्टन्सी या कंपनीने नागरिकांना दाखविले होते. गुगलवर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आलेल्या दहा जाहिराती पाहिल्यानंतर एका जाहिरातीमागे ७ रुपये मिळतात. दहा दिवस जाहिराती बघितल्यानंतर पुढील दोन ते तीन दिवसांत पैसे आपल्या खात्यावर जमा होतात. दोन नवीन सभासद केल्यानंतर एक हजार रुपये मिळतात. सभासद वाढत गेल्यानंतर गुंतवणूकदाराच्या नफ्यात आणखी वाढ होते, असे कंपनीकडून गुंतवणूकदारांना सांगण्यात आले होते. 

मागील सहा महिन्यापासून सुरू झालेल्या या व्यवसायात जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक, बांधकाम व्यावसायिक, भाजी विक्रेते, राजकीय कार्यकर्ते आदींनी पैसे गुंतविले. गुंतवणूकदारांना केवळ तीन महिन्यात त्यांचे पैसे डबल करून मिळत असल्याचे आमिष दाखविण्यात आल्यामुळे चिपळूणसह जिल्ह्यातील नागरिकांनी या व्यवसायात गुंतवणूक केली होती. सुरवातीला ज्यांनी पैसे गुंतविले होते, त्यांच्या खात्यात कंपनीकडून पैसे जमा करण्यात आले.

मागील दोन महिन्यांपासून कंपनी गुंतवणूकदारांना पैसे देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी कंपनीच्या कार्यालयात खेटे मारण्यास सुरवात केली. मात्र कंपनीकडून गुंतवणूकादारांना आश्‍वासनापलीकडे काहीच मिळाले नाही. सुरवातीला ३ जानेवारीपर्यंत पैसे देण्याचे आश्‍वासन कंपनीकडून देण्यात आले होते. आता ५ फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. कंपनीकडून दिलेले धनादेशही वटले नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली.

गुगलवरील जाहिराती पाहून पैसे डबल होत नाहीत. याबाबत आम्ही नागरिकांमध्ये जनजागृती केली होती. चिपळुणात तीन बैठका घेतल्या. तरीही नागरिकांनी पैसे गुंतविले. ज्यांची फसवणूक झाली आहे, त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी, म्हणजे त्या कंपनीविरोधात कठोर कारवाई करता येईल.
-प्रदीप मिसर, 

पोलिस निरीक्षक, चिपळूण

Web Title: Ratnagiri News fraud complain against Idu consultancy