पुन्हा मोहोर फुटल्याने सुरुवातीच्या कैरींवर गळतीची संक्रांत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जानेवारी 2018

रत्नागिरी - थंडीचा कालावधी लांबल्यामुळे फांदीला पुन्हा मोहोर (रिफ्लॉवरिंग) फुटू लागला आहे. त्याचा फटका त्याच फांदीला लागलेल्या कैरीला बसला असून गळीचे संकट आंबा बागायतदारांपुढे उभारले आहे. मोठ्या झालेल्या कैऱ्या धडाधड गळून पडू लागल्याने बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत.

रत्नागिरी - थंडीचा कालावधी लांबल्यामुळे फांदीला पुन्हा मोहोर (रिफ्लॉवरिंग) फुटू लागला आहे. त्याचा फटका त्याच फांदीला लागलेल्या कैरीला बसला असून गळीचे संकट आंबा बागायतदारांपुढे उभारले आहे. मोठ्या झालेल्या कैऱ्या धडाधड गळून पडू लागल्याने बागायतदार चिंताग्रस्त झाले आहेत.

डिसेंबरच्या मध्यापासून थंडीचा जोर रत्नागिरी जिल्ह्यात वाढला. दोन दिवसांपर्यंत पारा घसरलेलाच होता. दापोली तालुक्‍यामध्ये विक्रमी पारा घसरल्याने ‘थंडा थंडा कुल कुल’ अशीच स्थिती होती. थंड वातावरणामुळे पहिल्या टप्प्यात आलेल्या मोहोराला फळधारणा झाली होती. काही बागांमध्ये मोठ्या कैऱ्या लगडलेल्या पाहायला मिळत आहेत. जास्त काळ थंडी कायम राहिल्याने कैऱ्या लागलेल्या फांदीच्या जुन्या पालवीवर पुन्हा मोहोर धरू लागला आहे. या मोहोरामुळे कैरीला पोषक मूलद्रव्य कमी मिळतात. त्यातच दिवसा कडाक्‍याचे ऊन पडत असल्याने सुकलेली कैरी गळून जात आहे. हे चित्र आंबा बागायतदारांसाठी घातक असल्याचे मानले जात आहे.

कैरी लागलेल्या फांदीला पुन्हा मोहोर येऊ लागल्याने गळ वाढत आहे. थंडीमुळे जुन्या पालवीला मोहोर येत आहे; मात्र नवीन पालवी अजून फुटलेली नाही.
- प्रसन्न पेठे
, बागायतदार

बहुतांश बागांमध्ये मोठ्या प्रमाणात कैऱ्या गळू लागल्याने फेब्रुवारीच्या अखेरीस येणाऱ्या दोन-पाच टक्‍के उत्पादनावर परिणाम होणार आहे.

रविवारपर्यंत (ता. ७) वातावरण थंड होते; परंतु सोमवारपासून त्यात बदल होऊ लागला आहे. हवेत उष्मा वाढला असून उन्हाचा कडाकाही आहे. किनारी भागामध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण दिसत आहे. हवामानातील या बदलाचा परिणाम आंबा पिकावर होऊ शकतो. ही परिस्थिती जास्त काळ टिकली तर, तुडतुड्याचा प्रादुर्भाव होईल अशी भीती बागायतदारांकडून वर्तविण्यात येत आहे. दापोलीमधून पहिली पेटी रवाना झाली असली तरीही यावर्षी पहिल्या टप्प्यात येणारे उत्पादन रिफ्लॉवरिंगच्या तडाख्यात सापडले आहे. त्यातून सावरण्यासाठी बागायतदारांची तारांबळ उडाली आहे.

Web Title: Ratnagiri News fruit drop due to re flowering