गडगडी प्रकल्पाच्या १२० कोटींतून शेतीला थेंबही पाणी नाही

संदेश सप्रे
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

देवरूख - सुमारे १२० कोटी खर्च, तीस वर्षे अखंडित काम सुरू, मुबलक पाणीसाठा, मात्र १२० कोटींच्या खर्चानंतर १२० थेंबाचाही आजवर उपयोग नाही. वर्षागणिक प्रकल्पाच्या खर्चात वाढ, त्यामुळे कोटीच्या कोटी उड्डाणे झाली. दोन कोटीचा गडगडी प्रकल्प १२० कोटींवर पोहोचला.

देवरूख - सुमारे १२० कोटी खर्च, तीस वर्षे अखंडित काम सुरू, मुबलक पाणीसाठा, मात्र १२० कोटींच्या खर्चानंतर १२० थेंबाचाही आजवर उपयोग नाही. वर्षागणिक प्रकल्पाच्या खर्चात वाढ, त्यामुळे कोटीच्या कोटी उड्डाणे झाली. दोन कोटीचा गडगडी प्रकल्प १२० कोटींवर पोहोचला. धरणाला गेले काही दिवस गळती लागली आहे. ती थांबविण्याच्या प्रयत्नांना फारसे यश लाभले नाही. त्यामुळे धरणाला धोका निर्माण झाला आहे. संगमेश्वर तालुक्‍यातील वाशी आणि बोरसुत खोऱ्यात गडगडी पाटबंधारे प्रकल्पाचीही ही कथा. वाशी पंचक्रोशीत हे धरण फुटण्याच्या चर्चा सुरू आहेत. ३० गावांना धोका निर्माण होईल, अशी भीती व्यक्त होत आहे.
दोन कोटींचे धरण १२० कोटींवर

संगमेश्वर तालुक्‍यातील वाशी आणि बोरसूत खोऱ्यातील २० पेक्षा अधिक गावांचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटावा आणि शेतीला बारमाही पाणी उपलब्ध व्हावे यासाठी तालुक्‍याचे तत्कालीन मंत्री (कै.) जगन्नाथराव जाधव यांच्या पाठपुराव्याने १९६८-६९ ला गडगडी मध्यम पाटबंधारे प्रकल्पाला मान्यता मिळाली. त्यावेळी याचे बजेट २ कोटी होते. १९८२ ला अंतिम मंजुरी मिळून १९८७ ला काम प्रत्यक्ष सुरू झाले. २००७ ला धरणावर ५९ कोटी खर्च झाले तर आज ३० वर्षांनी या धरणासाठी १२० कोटी रुपये खर्च होऊनही ते अपुरेच आहे.

धरण पूर्ण... कालवे अपूर्ण
मुख्य धरणाचे काम पूर्ण असून या धरणात १३.५२६ द.ल.घ.मी. (टीएमसी) एवढ्या पाणीसाठ्याची क्षमता आहे. धरणाची भिंत ३३ मीटर उंच असून त्यात दोन वर्षांपूर्वी थोडी वाढ करण्यात आली. भिंतीची लांबी ४१८ मीटर असून याचे १०० टक्के मातीकाम पूर्ण आहे. धरणाचा उजवा कालवा १५ किमी तर डावा ८ किमीचा आहे. दोन्ही कालव्यांची कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे धरणातील पाणी थेंबभरही पुढे सरकत नाही.

पाण्याचा उपयोगच नाही
या धरणात गेले १० वर्षे पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्यात येतो. धरणाचा फायदा कुळ्ये, वाशी, बोरसुत, सोनवडे, मुचरी, काटवली, विघ्रवली, कोसुंबसह १३ गावांना होणार होता. यातून ९९६ हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येणार होते. प्रत्यक्षात या धरणात पुरेसा पाणीसाठा असूनही यातील एकाही थेंबाचा शेतीसाठी उपयोग करता येत नाही.

 पुनर्वसनाची कामेही अपूर्ण
या धरणाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या ५ पेक्षा अधिक गावांचे पुनर्वसन करण्यात आले खरे मात्र तालुक्‍यातील गडनदी प्रकल्पाप्रमाणेच या धरणाच्या पुनर्वसन क्षेत्रातील कामेही अपूर्णच राहिली आहेत. येथील पुनर्वसित आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करतात मात्र त्यांच्या पदरात अद्याप तरी आश्वासनाशिवाय काहीच पडलेले नाही. धरण पूर्ण होत नाही आणि पुनर्वसनही अपूर्ण. त्यामुळे कोट्यवधी पाण्यात गेले की पाण्यात बुडून राहिले असा संभ्रम आहे.

३० गावांना धोका
याच धरणातून सोनवी नदीचा उगम होतो. पावसाळ्यात धरणाचे पाणी नदीत सोडल्यावर नदीला पूर येतो आता तर धरणालाच धोका निर्माण झाला आहे. यामुळे आजूबाजूच्या १३ गावांसह वाशी, बुरंबी, लोवले, शिवने, संगमेश्वर अशा अन्य १७ गावांनाही याचा फटका बसू शकतो, अशी ग्रामस्थांना भीती आहे.

धरणाच्या मुख्य भिंतीला गळती
दोन वर्षांपूर्वी उंची वाढवण्याच्या नावाखाली मुख्य भिंत वाढवण्यात आली. याचा फटका आता बसत आहे. या भिंतीखालून पाणी झिरपू लागले आहे. गेले आठ दिवस हा प्रकार सुरू झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. सुरुवातीला निवळ पाणी खालून झिरपत होते नंतरच्या पाण्याचा रंग गढूळ झाला. त्यानंतर नदीतील पाणीही गढूळ झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. पाण्याचा जोरही वाढत गेल्याने ग्रामस्थांनी याची माहिती पाटबंधारे विभागाला कळवली. यानंतर काही अधिकारी येऊन इथे काम करून गेले. मात्र विश्‍वास घेऊन गावकऱ्यांना काही सांगितले नाही.

गडगडी धरणाबाबतीत स्थानिक ग्रामस्थांनी माहिती दिल्यानंतर काल ग्रामस्थांसह धरणाची पाहणी केली. भिंतीखालून येणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी असले तरी ते धोकादायक ठरू शकते. पाटबंधारे विभागाने याची ग्रामस्थांसह पाहणी करावी आणि धरण सुरक्षित आहे की नाही याची खातरजमा करावी.
- प्रमोद अधटराव 

भाजप, संगमेश्वर तालुकाध्यक्ष

गडनदी धरणाच्या जॅकवेलचा रबर सील गेल्याने तिथे थोडा लिकेज आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या भुकंपाचाही याला फटका बसला आहे. मात्र धरणाला धोका नाही. लिकेजवर उपाय करण्याचे काम सुरू आहे.
-विकास बनसोडे,
सहाय्यक अभियंता, गडगडी प्रकल्प

 

Web Title: ratnagiri news Gadgadi Project issue