त्रुटींत रखडला गणपतीपुळ्याचा विकास

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

रत्नागिरी - आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळ म्हणून ख्याती असलेल्या गणपतीपुळे विकास आराखड्याला मुहूर्त मिळेनासा झाला आहे. जिल्हा प्रशासनाकडून वारंवार त्रुटी काढल्याने तीन वर्षे हा विकास आराखडा लटकला आहे.

रत्नागिरी - आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र आणि पर्यटनस्थळ म्हणून ख्याती असलेल्या गणपतीपुळे विकास आराखड्याला मुहूर्त मिळेनासा झाला आहे. जिल्हा प्रशासनाकडून वारंवार त्रुटी काढल्याने तीन वर्षे हा विकास आराखडा लटकला आहे.

अभ्यागत कराच्या माध्यमातून गणपतीपुळे ग्रामपंचायतीकडे कोट्यवधीचा निधी गोळा झाला. मात्र, विकास आराखड्यामध्ये मूलभूत सुविधांचा अंतर्भाव असल्याने ग्रामपंचायतीला काही करता येत नाही आणि धड जिल्हा प्रशासन आराखडा मंजूर करत नाही, अशा त्रांगड्यात गणपतीपुळ्याचा विकास रखडला आहे. 

तोडगा काढण्याची ग्वाही
वायकर जिल्हा दौऱ्यावर होते. त्यावेळी गणपतीपुळे आराखड्याबाबत ते म्हणाले, विकास आराखड्याचा प्रश्‍न तीन वर्षे रखडला आहे. शासनाने आराखड्याला वारंवार कात्री लावल्याने बदल करावे लागले. आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळाचा विषय असल्याने मी यामध्ये पुढाकार घेतो. ग्रामपंचायतीकडे कोट्यवधीचा अभ्यागत कर गोळा झाला आहे. परंतु जिल्हा प्रशासनाच्या आराखड्यात, रस्ते, वीज, पाणी आदी मूलभूत सुविधांचा समावेश आहे. त्यामुळे गणपतीपुळ्याचा विकास करता येत नाही आणि जिल्हा प्रशासनाकडून आराखडा मंजूर होत नाही. यावर  ते म्हणाले , गणपतीपुळे विकास आराखड्याचे असे त्रांगडे असेल, तर ६ फेब्रुवारीला मी याची बैठक लावून त्यावर तोडगा काढतो.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पाठविलेला ६७० कोटींचा विकास आराखडा गेली चार ते सहा वर्षे झाली शासनस्तरावर लाल फितीत अडकला आहे. पालकमंत्री रवींद्र वायकर आणि आमदारांनी याचा पाठपुरावा केल्यानंतर आराखड्याला कात्री लावण्यात आली. वित्त विभागाने त्यापैकी प्राधान्यक्रम ठरवून ८० कोटींचा आराखडा देण्यास सांगितले. तो आराखडा तयार केल्यानंतर त्यालाही कात्री लागली.

मार्लेश्‍वर, राजापूर गंगातीर्थ या पर्यटनस्थळांसाठी शासनाने निधी मंजूर केला आहे. त्याची कामेही प्रगतिपथावर आहेत. गणपतीपुळे विकास आराखड्याची कोंडी मात्र फुटत नाही. सुरवातीला पाणी योजना आणि दोन उंदीर उभे करण्यावरून आराखड्यात फेरबदल करण्यात आले. जिल्हाधिकारी व तज्ज्ञांच्या मदतीने सार्वजनिक बांधकाम खात्याने विकास आराखडा तयार केला. जिल्हा प्रशासनाने त्यामध्येही त्रुटी काढल्या. आता तिसऱ्यांदा आराखड्यात त्रुटी निघाल्याने पर्यटनस्थळाचा विकास खोळंबला आहे.

Web Title: Ratnagiri News Ganpatipule development plan issue