वेसवीत सिलिंडर स्फोटात सातजण जखमी 

सचिन माळी
बुधवार, 20 जून 2018

मंडणगड - तालुक्‍यातील वेसवी मोहल्ला येथे मंगळवारी (ता.19 जून) रात्री साडेनऊच्या दरम्यान सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात चारजण गंभीर जखमी तर तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. 

मंडणगड - तालुक्‍यातील वेसवी मोहल्ला येथे मंगळवारी (ता.19 जून) रात्री साडेनऊच्या दरम्यान सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात चारजण गंभीर जखमी तर तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. 

स्फोटानंतर मन्सूर अहमद हुसैन लांबे यांच्या घरास आग लागली. या आगीत  चारजण गंभीर जखमी झाले. जावेद मुल्ला, दिलदार लांबे, रईस मरणे, मझहर बेंडुर अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर मसीना हॉस्पिटल मुंबई येथे उपचार सुरू आहेत.

या घटनेत मन्सूर लांबे व खलिल लांबे हेही जखमी झाले. यांच्यावर महाड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. किरकोळ जखमी झालेले मोहीब लांबे यांच्यावर मडंणगड येथील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले. 

वेसवी येथील ग्रामस्थ मन्सूर अहमदहुसैन लांबे (55) यांचा आंबा बाग व मच्छीचा व्यवसाय आहे. मंगळवार (ता. 19 जून) रात्री साडेनऊच्या सुमारास लांबे यांच्या पत्नी आरिफा मन्सूर लांबे (45) या किचनमध्ये दूध गरम करत होत्या. यावेळी शेगडी व गॅसची टाकी यांना जोडणाऱ्या पाईपने पेट घेतला. त्यामुळे त्यांनी आरडाओरडा करून पाईपने पेट घेतल्याचे घरच्यांना सांगितले. त्यानंतर घरातील लहान मुले व महिलांना प्रथम घराबाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवले. पाइप पेटल्याने सिलिंडर टाकीचाही स्फोट होऊन मोठा आवाज झाला. त्यात घराने पेट घेतला. घरातील इन्व्हर्टरनेही पेट घेतला.

सिलिंडर स्फोटाच्या आवाजाने वेसवी व बाणकोट परिसरातील ग्रामस्थ मदतीला धावले. आगीने रौद्ररूप धारण केले होते. ग्रामस्थांनीही मिळेल त्या पाण्याने आग आटोक्‍यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. मंडणगड तालुक्‍यात आगीचा बंब नसल्याने दापोली खेड व श्रीवर्धन तालुक्‍यातील अग्निशमन यंत्रणांना दूरध्वनीवरून पाचरण करण्यात आले. आजूबाजूच्या घरांना आगीची झळ पोहचू न देण्यात ग्रामस्थांना यश आले. सुमारे तासानंतर श्रीवर्धन येथील अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचला. दोन ते तीन तासांनंतर अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

या आगीत घरातील अन्नधान्य, कपडा लत्ता, साठ तोळे सोन्या-चांदीचे दागदागिने जळाल्याने सुमारे अठरा लाखांचे नुकसान, तर  सव्वापाच लाखांची रोकड, पाच फ्रीज, इनव्हर्टरर, वॉशिंग मशीन, टी.व्ही. सोफा, लाकडी फर्निचर, जळून खाक झाल्याने त्यांचे एकूण सुमारे 50 लाखांचे नुकसान झाल्याची माहिती तलाठी श्री. पाटील यांनी बुधवार (ता.20) केलेल्या पंचनाम्यात नमूद केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ratnagiri News Gas Cylinder blast in Vesavi 7 injured