कोकणात सोलकर यांचा गच्चीवर शेळीपालनाचा किफायतशीर व्यवसाय

मकरंद पटवर्धन
बुधवार, 3 जानेवारी 2018

रत्नागिरी - कोकणात शेळीपालन मर्यादितच आहे. मात्र, स्वतंत्रपणे व्यवसाय म्हणून यात यश मिळविता येते आणि त्यासाठी घराची गच्चीही पुरते हे उद्योजक आसिर सोलकर यांनी सिद्ध करून दाखविले आहे. कोकणनगरमध्ये गच्चीवरील बंदिस्त शेळीपालन यशस्वी ठरले आहे. आता त्याचा कित्ता उद्योग पाच ते सहा जणांनी गिरवला आहे.

रत्नागिरी - कोकणात शेळीपालन मर्यादितच आहे. मात्र, स्वतंत्रपणे व्यवसाय म्हणून यात यश मिळविता येते आणि त्यासाठी घराची गच्चीही पुरते हे उद्योजक आसिर सोलकर यांनी सिद्ध करून दाखविले आहे. कोकणनगरमध्ये गच्चीवरील बंदिस्त शेळीपालन यशस्वी ठरले आहे. आता त्याचा कित्ता उद्योग पाच ते सहा जणांनी गिरवला आहे.

राजस्थान, उत्तर प्रदेश येथील व परदेशी जातीच्या संकरित शेळी, बोकडांची उत्तम देखभाल आणि कोणत्याही जातीच्या शेळ्यांचा संकर सोलकर यशस्वीपणे करतात. त्यासाठी त्यांना डॉ. आनंद लळित यांच्या मार्गदर्शनाचा उपयोग झाला. श्री. सोलकर हे मेकॅनिकल ड्राफ्टसमन. मुंबईत दहा वर्षे नोकरी केली. परदेशांत नोकरीची संधी होती. त्याऐवजी ते शेळीपालनाकडे वळले. सुरवातीला त्यांनी शेळीपालनाचे धडे गिरवले.

शेळीपालन हा उत्तम पैसे मिळवून देणारा व्यवसाय आहे. शेतीचे उत्पन्न कमी होत असताना या व्यवसायाकडे शेतकऱ्यांनी वळले पाहिजे. गच्चीवरील बंदिस्त शेळीपालनातून चांगला रोजगार उपलब्ध होऊ शकतो. कोकणनगरमधील शेळीपालकांना लागणारे मार्गदर्शन मी करतो. अशा प्रकारे मिरकरवाडा येथेही शेळीपालन चालू आहे.
- डॉ. आनंद लळित

अपुऱ्या जागेच्या अडचणीवर मात
अपुऱ्या जागेत राहत्या घरी शेळीपालन करण्यातील अडचणीवर मार्गही नामी काढला. त्यांनी गच्चीवर लोखंडी जाळ्या व शेड बांधली. पाचशे चौरस फुटांच्या जागेत सुरवातीला दोन-चार शेळ्यांपासून सुरवात झाली. या प्राण्यांना वेळेवर पाणी, चार-पाच वेळा खाद्य, पाला, औषधे, लसीकरण, जंतांचे औषध सुरळीतपणे करू लागले. याकरिता कुटुंबीयांचे सहकार्य लाभले. ईदला कुर्बानीसाठी बोकडांना बरीच मागणी असल्याने सोलकर यांनी बोकडही आणले. एका वेळी गच्चीत ३५ व घराच्या आवारात ३५ असे ७० बोकड ते ठेवतात. यामध्ये कोटा, जमनापरी, बारबरी, सिओर बोअर, आफ्रिकन बोअर, सोजा, सिरोही अशा अनेक जातींचे बोकड आहेत.

एकटा करतो देखभाल
गच्चीवरील बंदिस्त शेळीपालन सोलकर एकटे करतात. यासाठीच मर्यादित जागेत ५० वा त्याहून अधिक शेळ्यांची देखभाल करता येईल, अशी रचना गच्चीवर केली. बोकडांना उभे राहण्यासाठी लाकडी रिफा, त्याखाली पत्र्यांची रचना व त्यात शेळ्यांचे मूत्र, लेंड्या पडतात. त्यावर पाणी टाकल्यावर ते गच्चीतून खाली झाडांमध्ये जमा होते. यातून झाडांना उत्तम दर्जाचे खतही होते. त्यांच्याप्रमाणे अन्य चार जणांनी कोकणनगरातच अशी रचना करून घेतली. शेळ्यांना पावसाचा त्रास होऊन आजारपण येऊ शकते. थंडीचाही थोडा त्रास जाणवतो परंतु, उष्णता मानवते. तशी व्यवस्था करावी लागते.

रत्नागिरी-पावस मार्गावर कोळंबेनजीक सहा गुंठे जागेत नवीन प्रकल्प लवकरच सुरू करणार आहोत. कोणत्याही शेतकऱ्यांना शेळीपालनाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही उपलब्ध आहोत.
- आसिर सोलकर

बंदिस्त शेळीपालनाचे फायदे
अनेकदा शेळीपालन जमिनीवर केले जाते व शेळ्या चरताना झाडाचा शेंडासुद्धा खातात व झाड वाढत नाही. शेळ्या फिरत्या असल्या तर त्यांचे वजन वाढत नाहीत. त्यावर उपाय म्हणून बंदिस्त शेळीपालन उत्तम पर्याय आहे. त्याचे अनेक फायदे आहेत. बकऱ्यांचे वजन वाढते, संसर्गजन्य रोगांपासून बचाव होतो, बकऱ्या एकाच वेळेला माजावर आणता येतात. एकाच वेळी सर्व करड्यांचे संगोपन योग्य प्रकारे करता येते. पीपीआर तीन वर्षांतून एकदा, एचएस वर्षातून दोन वेळा, आंत्रविषार एसएमडी (पायलाग) यांचे लसीकरण करावे. गाभण शेळ्यांना विण्याच्या आधी १५ दिवस टीटीचे इंजेक्‍शन दिल्याने करड्यांना त्रास होत नाही. बोकडांचे वजन वाढण्यासाठी वेगवेगळी संप्रेरके द्यावी, दर तीन महिन्यांनी पोटातील जंतनाशके देण्यात यावी, असा सल्ला डॉ. लळित यांनी दिला.

मी चार महिन्यांपासून गच्चीवरील शेळीपालन करतोय. सध्या माझ्याकडे कोटा, मालवा, जमनापरी या जातीचे बोकड आहेत. दिवसातून पाच वेळा खाद्य, पाणी, आठवड्यातून एकदा आंघोळ, गुळाचे पाणी नियमितपणे देतो. शेडसाठी सुमारे दीड लाख रुपये खर्च केले आहेत. परंतु विक्रीतून हे पैसे नक्कीच वसूल होतील.
- मुफीद सुवर्णदुर्गकर

चौपट उत्पन्न
पूरक व्यवसाय म्हणून ५ शेळ्या पाळून सुरवात करता येऊ शकते. पूर्ण व्यावसायिक दृष्टीने करायचे असल्यास २० बकऱ्या व २ बोकड हवेत. त्यांचा वर्षाचा खर्च सुमारे लाखभर रुपये करावा लागतो. मात्र त्याच्या चौपट पैसे मिळू शकतात. इतका हा व्यवसाय किफायतशीर ठरू शकतो. शेळ्यांपासून वर्षातून दोन वेळा प्रजोत्पादन, लेंडी मिळते. त्यातूनही उत्पन्न मिळते. जातीनुसार बोकडांची किंमत ठरते. ५० किलोच्या एका बोकडामागे गावरानला ५००० व कोटा जातीला १२ ते १५ हजार रुपये मिळतात.

Web Title: Ratnagiri News Goat farming in Konkan