‘गोगटे’च्या विद्यार्थ्यांनी बनविले जैवप्लास्टिक

शिरीष दामले
शनिवार, 3 मार्च 2018

रत्नागिरी - नेहमीच्या वापरातील प्लास्टिकचे फायदेही मिळतील आणि पर्यावरणाची हानीही टाळता येईल, अशातऱ्हेचे जैवप्लास्टिक बनवण्यात येथील गोगटे महाविद्यालयातील रसायनशास्त्राच्या विद्यार्थ्यांना यश आले आहे. त्यांच्या या प्रकल्पावर मराठी विज्ञान परिषदेने पसंतीची मोहर उमटवली आहे.

रत्नागिरी - नेहमीच्या वापरातील प्लास्टिकचे फायदेही मिळतील आणि पर्यावरणाची हानीही टाळता येईल, अशातऱ्हेचे जैवप्लास्टिक बनवण्यात येथील गोगटे महाविद्यालयातील रसायनशास्त्राच्या विद्यार्थ्यांना यश आले आहे. त्यांच्या या प्रकल्पावर मराठी विज्ञान परिषदेने पसंतीची मोहर उमटवली आहे.

प्लास्टिकला पर्याय शोधण्यासाठी प्रा. अपर्णा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली गेली दोन वर्षे तृप्ती जोशी आणि ओंकार पेंढारकर हे विद्यार्थी संशोधन करीत होते. स्टार्चच्या विविध जैविक स्रोतापासून जैवप्लास्टिक बनवण्यावर त्यांनी काम सुरू केले. बटाटा वापरून बनवलेले प्लास्टिक टिकाऊ नाही हे लक्षात आल्यावर अधिक टिकाऊ स्टार्चचा शोध घेण्यात आला. अंड्याचे कवच वापरूनही प्रयोग करण्यात आला. प्रयोगशाळेत मिळणारे तयार स्टार्च वापरून प्लास्टिकची फिल्म मिळाली, परंतु ती पुरेशी मजबूत नव्हती आणि एकसंघपणाही कमी होता, अशी माहिती तृप्ती व ओंकार यांनी दिली. यानंतर या चमूने स्टार्च म्हणून साबुदाण्याचा वापर केला. तो यशस्वी ठरला.

साबुदाण्यापासून बनवलेली फिल्म पुरेशी बळकट नव्हती. बळकटीसाठी फ्लाय ॲश वापरण्याचा प्रयोग केला. ही राख टाकाऊ असते. तिचा वापर करून बनवलेली फिल्म थोडी अधिक बळकट निघाली. त्यामध्ये पीव्हीए वापरले, ते पाण्यात विरघळते. त्यामुळे ती अधिक चांगली झाली. या टप्प्यावर कॉलेजचे दुसरे वर्ष संपले होते.

प्लास्टिक बनवण्यातील घटक निश्‍चित झाले. मात्र त्यांचे प्रमाण निश्‍चित करण्यासाठी अनेक नमुने बनवले. हळूहळू सध्याच्या वापरातील प्लास्टिकच्या तोडीस तोड आणि तितकेच उपयोगी जैवप्लास्टिक बनवण्यात यश आले. याची मजबुती किती यासाठी विविध चाचण्याही घेतल्या. बटाट्यापासून बनवलेल्या फिल्मशी तसेच सध्याच्या प्लास्टिकबरोबर तुलना केली. यावर्षी मराठी विज्ञान परिषदेतर्फे या प्रकल्पाला प्रथम क्रमांकासह बारा हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविले तेव्हा प्रयत्नांचे सार्थक झाल्याचे वाटले, अशी प्रतिक्रिया या दोघांनी दिली.

भाभा अणुसंशोधन केंद्र, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्‍नॉलॉजी अशा नामांकित संस्थांमधून आलेल्या परीक्षकांनी या विद्यार्थ्यांच्या कामाचे कौतुक केले. काही सुधारणा सुचवल्या. परिषदेतर्फे राज्यस्तरीय विज्ञान संशोधन प्रकल्प स्पर्धेच्या अंतिम फेरीत राज्यभरातील १० संशोधन प्रकल्पांची निवड करण्यात आली. गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे तीन प्रकल्प अंतिम फेरीत होते.

विघटन होऊन मातीत मिसळते
कापडी पिशव्या वापरण्याची लोकांची मानसिकता नाही. त्यामुळे पर्यायी प्लास्टिकचा शोध घेण्यात आला. जैवप्लास्टिक असल्यामुळे ते नष्ट होऊ शकते. यातील राख ही थंड झाल्यानंतरचीच वापरलेली असल्यामुळे तीही मातीत मिसळू शकते. थोड्या काळाने हे प्लास्टिक कुजू शकते. त्यामुळे त्याचे खत होऊ शकते. सर्वसाधारण प्लास्टिकच्या किमतीपेक्षा याची किंमत थोडी अधिक असेल. मात्र प्रदूषणाच्या हानीने मोजाव्या लागणाऱ्या किमतीपेक्षा ती कितीतरी कमी असेल, असे प्रा. कुलकर्णी यांनी सांगितले.

 

Web Title: Ratnagiri News Gogate college students prepare Bio-plastic