दिल्लीत कोकणी मोहर; ईशा पवारला सुवर्ण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

सावर्डे - कोकणातील छोट्या गावातील ईशा पवारने दिल्लीमध्ये ‘खेलो इंडिया’ या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये कोकणची मोहर उमटवली आहे. धनुर्विद्येत तिने सुवर्णपदक मिळवले आहे. १६ राज्यांतील १६० खेळाडूंमध्ये तिने अव्वल कामगिरी केली. 

सावर्डे - कोकणातील छोट्या गावातील ईशा पवारने दिल्लीमध्ये ‘खेलो इंडिया’ या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये कोकणची मोहर उमटवली आहे. धनुर्विद्येत तिने सुवर्णपदक मिळवले आहे. १६ राज्यांतील १६० खेळाडूंमध्ये तिने अव्वल कामगिरी केली. 

कोकणातील ती एकमेव स्पर्धक आहे. सावर्डे (ता. चिपळूण) येथील उद्योजक केतन पवार व कंचन पवार यांची कन्या ईशा डेरवण येथील एसव्हीजेसीटी क्रीडा संकुल व इंग्लिश मीडियम शाळेची खेळाडू. कोकणची सुवर्णकन्या असा लौकिक तिने प्राप्त केला. 

दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये ईशाने धनुर्विद्यामध्ये पाच फेरीत निर्विवाद वर्चस्व मिळवले. सुवर्णपदकाला गवसणी घालताना पहिल्या रॅंक फेरीत 
३२४, ३३६ गुण मिळवत ५ रॅंक मिळवले. पहिल्या बाद फेरीत महाराष्ट्राचे ३२ खेळाडू होते. ईशाची अंतिम लढत ईशिता बन्सल हिच्याशी झाली. ईशाने १४३, तर ईशिताने १२९ गुण मिळवले. दुसऱ्या फेरीत मणिपूरच्या सुचित्रा दळवीवर १४ गुणांच्या फरकाने मात केली. उपांत्यपूर्व फेरीत सौम्या निधीवर ४ गुणांनी विजय मिळवला. उपांत्य फेरीत झारखंडच्या सविता कुमारीवर १० गुणांच्या फरकाने मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला. 
अंतिम फेरीत बबिता कुमारी हिच्याबरोबर झालेल्या सामन्यात 
१८ गुणांची आघाडी घेत सुवर्णपदकावर नाव कोरले. स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू म्हणून तिची निवड करण्यात आली. क्रीडा मंत्रालयाकडून पुढील पाच वर्षांमध्ये प्रत्येक वर्षी ५ लाख रुपये ईशाला दिले जाणार आहेत.

ऑलिंपिकमध्ये सुवर्ण मिळविणारच - ईशा 
‘खेलो इंडिया’मध्ये मिळालेले सुवर्णपदक आत्मबल वाढविणारे आहे. ऑलिंपिकमध्ये देशाला सुवर्णपदक मिळवून देण्याचा विश्‍वास आहे. प्रशिक्षक रणजित चामले, ओंकार घाडगे यांचे मार्गदर्शन, आजोबा बाळकृष्ण पवार यांचा आशीर्वाद पप्पा व मम्मीचे पाठबळ, भावंडांची प्रेरणा, मुख्याध्यापिका शरयू यशवंतराव यांचे प्रोत्साहन यामुळेच हे यश मिळाल्याचे ईशाने दूरध्वनीवरून सांगितले.

Web Title: Ratnagiri News Gold Medel to Isha Pawar