रत्नागिरी जिल्ह्यात माघारी, चिन्हांच्‍या वाटपात गोंधळ

रत्नागिरी जिल्ह्यात माघारी, चिन्हांच्‍या वाटपात गोंधळ

रत्नागिरी -  ग्रामपंचायत निवडणुकीच्या अर्ज मागे घेण्याच्या दिवशीही ऑनलाइनचा गोंधळ सुरूच होता. अर्जमाघारीबरोबर चिन्हवाटप एकाच वेळी असल्यामुळे सायंकाळी उशिरापर्यंत आकडेवारी प्रशासन देऊ शकले नाही. मंडणगड वगळता उर्वरित आठही तालुक्‍यांमध्ये गोंधळ उडाला होता. अधिकारी, कर्मचारीही संभ्रमात होते. याबाबत निवडणूक कक्षाशी संपर्क साधल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांकडून ‘थोडे थांबा, आमचे काम सुरू आहे,’ असे सांगितले जात होते. हाती आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी दुरंगी, तिरंगी लढती होणार आहेत.

राजापूरमध्ये कागदपत्रे घेऊन आलेले काहीजण तहसील कार्यालयात, तर काहीजण पंचायत समितीत बसल्यामुळे समन्वय साधण्याबाबत गोंधळ सुरू होता. जिल्ह्यातील २२२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची धावपळ सुरू आहे. गुरुवारी दुपारी तीनपर्यंत अर्जमाघारीची अंतिम मुदत होती. त्यासाठी विविध पक्षांचे पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक कक्षात उपस्थित होते.

रत्नागिरी तालुक्‍यात २९ ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना-भाजप यांच्यात चुरस आहे. शिवसेनेला शह द्यायला भाजपकडून अनेक ग्रामपंचायतींत गाव विकास पॅनेलच्या मदतीने सरंपच आणि सदस्यपदाच्या जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. शिवसेनेतील नवे-जुने या वादामुळे अनेकांनी पक्षाकडून दिलेल्या उमेदवाराच्या विरोधात अर्ज दाखल केले  आहेत. गुरुवारी दिवसभर अशा उमेदवारांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू होते. तालुक्‍यातील तोणदे, टेंब्ये, चाफेरीसह विविध ग्रामपंचायतींत हा गोंधळ सुरूच होता. त्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांना यश आले नाही.

मालगुंड येथील ग्रामपंचायतीमधील शिवसेनेकडून दाखल केलेल्या उमेदवारांनी प्रत्येकी दोन-दोन अर्ज दाखल केले होते. त्यांतील एक अर्ज मागे घेतला होता. याबाबत विरोधी पक्षाकडून आक्षेप घेण्यात आला. तसे पत्र निवडणूक अधिकाऱ्यांकडे देण्यात आले. त्यावर सायंकाळी उशिरापर्यंत निर्णय झालेला नव्हता. शिवसेनेच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती; मात्र शिवसेनेचे बंड्या साळवी यांनी त्याचे खंडन केले. उमेदवारांचे दोन वेगवेगळे अर्ज भरले आहेत. त्याचे प्रवेश शुल्कही भरले होते. अर्ज मागे घेताना दुसरा अर्ज मागे घेतला होता. त्यामुळे कोणतीही अडचण नाही. याबाबत उशिरापर्यंत निर्णय झालेला नव्हता.

संगमेश्‍वरात भारनियमनामुळे सायंकाळी उशिरापर्यंत आकडे मिळत नव्हते. साडेसातपर्यंत ३६ ग्रामपंचायतींपैकी १९ ठिकाणी आकडे जमा झाले होते. 

शिरबेचा निर्णय ‘जैसे थे’
शिरंबे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा तिढा अद्यापही कायम आहे. सरपंचपदासाठी एकही अर्ज दाखल झालेला नसल्याने येथील निवडणूक पुन्हा घ्यायची की नाही, याबाबत गोंधळ सुरू होता; मात्र यावर अजूनही निर्णय घेण्यात आलेला नसल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.

मंडणगड, दापोली, चिपळूण, गुहागरचे चित्र स्पष्ट
मंडणगड तालुक्‍यातील १३ ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदासाठी अर्ज भरलेल्या १४ जणांनी, तर सदस्यपदासाठी ३६ अर्ज माघार घेण्यात आले. त्यामुळे ३४ उमेदवार सरपंचपदासाठी आणि १६९ अर्ज सदस्यांच्या रिंगणात आहेत. गुहागर तालुक्‍यात सरपंचपदासाठीचे ८ अर्ज मागे घेण्यात आले. त्यामुळे ४१ उमेदवार रिंगणात उरले. सदस्यपदासाठी १५ उमेदवारांनी माघार घेतल्याने २२९ जण निवडणूक लढविणार आहेत. वरवेली सरपंच बिनविरोध निवडून आले. वडदमध्ये सर्व सदस्य बिनविरोध आले. दापोलीमध्ये सरपंचपदासाठी ३० उमेदवारांनी माघार घेतल्याने ५५ रिंगणात उरले, तर सदस्यपदासाठी ५० जणांनी माघार घेतल्याने २९४ जण लढणार आहेत. एकूण १५ ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या. १२ सरपंच बिनविरोध निवडून आले. मात्र, ३ ग्रामपंचायतींत बिनविरोध सरपंच निवडून येऊ शकले नाहीत. चिपळूण तालुक्‍यात सरपंचपदासाठी १७ जणांनी माघार घेतली. यामुळे ५६ जण रिंगणात आहेत. सदस्यपदासाठी ३६ जणांनी माघार घेतली, तर ३२८ जण रिंगणात आहेत. १४ ग्रामपंचायती बिनविरोध आल्या, तर ११ सरपंचांची बिनविरोध निवड झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com