रत्नागिरीत मराठी नववर्षानिमित्त गुढीपाडवा स्वागतयात्रा

मकरंद पटवर्धन
मंगळवार, 13 मार्च 2018

रत्नागिरी - प्रतिवर्षाप्रमाणे मराठी नववर्षानिमित्त गुढीपाडवा स्वागतयात्रेचे आयोजन सलग १४ व्या वर्षी केले आहे. ग्रामदेवता मंदिर श्री देव भैरी ते समाजमंदिर पतितपावन मंदिर या संकल्पनेवर ही यात्रा होते. मारुती मंदिर येथून गेल्या वर्षीपासून यात्रा काढली जाते.

रत्नागिरी - प्रतिवर्षाप्रमाणे मराठी नववर्षानिमित्त गुढीपाडवा स्वागतयात्रेचे आयोजन सलग १४ व्या वर्षी केले आहे. ग्रामदेवता मंदिर श्री देव भैरी ते समाजमंदिर पतितपावन मंदिर या संकल्पनेवर ही यात्रा होते. मारुती मंदिर येथून गेल्या वर्षीपासून यात्रा काढली जाते. ती जयस्तंभापर्यंत येऊन तिथून मुख्य यात्रेत सामील होते. मारुती मंदिर यात्रेत ३० रथ सहभागी होणार असून या दोन्ही यात्रांचे जयस्तंभ येथे जल्लोषी स्वागत करण्याचा सोहळा यंदा प्रथमच रंगणार आहे.

येत्या १८ एप्रिलला गुढीपाडवा असून स्वागतयात्रेच्या नियोजनाची बैठक पतितपावन मंदिरात झाली. मारुती मंदिर येथून गतवर्षी १९ चित्ररथ सहभागी झाले. यंदा ही संख्या ३० होणार आहे. कुवारबावपासून विविध ठिकाणचे समाजांचे, मंदिर संस्थांचे रथ यात असल्याचे कौस्तुभ सावंत यांनी सांगितले.

केरळी, कानडी बांधवही हिंदू संस्कृतीचे दर्शन घडवणार आहेत.
स्वागतयात्रेत गुलाल उधळला जात नाही व फटाक्‍यांची आतषबाजी होत नाही. यात्रेच्या मार्गावर सर्वत्र रांगोळ्यांची सजावट करण्यात येणार आहे. राजकीय प्रचार किंवा वादग्रस्त विषयांवर तसेच अवमान होईल असे रथ नसावेत.

-  ॲड. बाबा परुळेकर, अध्यक्ष, पतितपावन मंदिर

भैरी देवस्थानचे अध्यक्ष रवींद्र तथा मुन्नाशेठ सुर्वे म्हणाले की, रत्नागिरीमध्ये २००५ मध्ये कै. अरुअप्पा जोशी यांनी स्वागतयात्रा सुरू केली. यात्रा नीटनेटकी होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. सकाळी ९ वाजता भैरी मंदिरात गुढी उभी करून आणि गाऱ्हाणे घालून स्वागतयात्रेला सुरवात होईल. खालची आळी, मुरलीधर मंदिर, विठ्ठल मंदिर, गोखले नाका, जयस्तंभ ते पतितपावन मंदिर हा मार्ग आहे. संयोजक अध्यक्ष आनंद मराठे यांनी सूचना केली की, वाहतुकीला अडथळा होईल असे उंच व लांब रथ ठेवू नये. पारंपरिक वेषामध्ये जास्तीत जास्त युवक, लहान मुलांनाही सहभागी करून घ्यावे. सभेला १५० हून अधिक लोक उपस्थित होते. 

१६ ला दुचाकी फेरी
गुढीपाडवा स्वागतयात्रेच्या प्रचारासाठी आणि वातावरण निर्मितीसाठी १६ मार्चला सायंकाळी ५ वाजता पतितपावन मंदिरापासून शहर परिसर आणि मुख्य रस्ते, साळवी स्टॉप ते पुन्हा पतितपावन मंदिरापर्यंत काढण्यात येणार असून त्याचे नियोजन केल्याची माहिती राजेश आयरे यांनी दिली.

Web Title: Ratnagiri News Gudhipadava Swagatyatra