गुहागर, चिपळूण, राजापुरात विद्यमानांची ‘सत्त्वपरीक्षा’

गुहागर, चिपळूण, राजापुरात विद्यमानांची ‘सत्त्वपरीक्षा’

रत्नागिरी - विधानसभा निवडणुकीला सव्वा वर्ष राहिले असतानाच जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती दिवसागणिक नवी वळणे घेत आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ वगळता दापोली, गुहागर, चिपळूणसह राजापूरमध्ये विद्यमान आमदारांना विविध आव्हानांना तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र आहे. यामध्ये शिवसेना-राष्ट्रवादीच्या प्रत्येकी दोन आमदारांचा समावेश आहे. स्थानिक परिस्थिती हाताळून विरोधकांना धक्‍का देण्यासाठी विधानसभा निवडणुकीत टिकून राहण्यासाठीचा फंडा त्या त्या आमदारांना अवलंबावा लागणार आहे.

गुहागर, देवरूख नगरपंचायत निवडणुकीत भल्या भल्या राजकीय मंडळींना धक्‍का बसला आहे. त्यामुळे चिंतन करून झालेल्या चुकांवर पांघरुण घालण्यासाठी त्यांना किल्ले बांधावे लागणार आहेत. गुहागरात कुणबी समाजाशी केलेली आघाडी शिवसेनेच्या पथ्थ्यावर पडली. राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव यांचा आतापर्यंतचा विधानसभेचा प्रवास कुणबी समाजाच्या याच ताकदीवर उभा होता. गुहागरमध्ये भास्कर जाधव यांनी बस्तान मांडले होते. पण त्याला खिंडार पडले आहे.

अशीच काहीशी परिस्थिती चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण यांची आहे. चिपळूण पालिकेपाठोपाठ देवरूख नगरपंचायतीत शिवसेनेला भाजपकडून बसलेला धक्‍का जबरदस्त आहे. या मतदारसंघात शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीने पाय पसरण्यास सुरवात केली होती. या दोघांवर मात करीत भाजपची सरशी झाल्याने शहरातील हा मतदार आपलासा करण्यासाठी आमदार चव्हाण यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. ग्रामीण भागातील शिवसेना स्थिर असली तरीही भाजपचा आत्मविश्‍वास धोक्‍याचा इशारा ठरू शकतो.

राजापूर मतदारसंघ रिफायनरीमुळे देशपातळीवर गाजत आहे. सर्वच पक्षांचे याकडे लक्ष लागले आहे. प्रकल्पविरोधी लढ्यात पोळी भाजून घेण्यासाठी सर्वच पक्षांनी आंदोलनकर्त्यांना पाठबळ देण्याचा फंडा अवलंबला आहे. आमदार राजन साळवी यांना रिफायनरीचे वादळ घातक ठरू शकते. त्यातच राष्ट्रवादीचे अजित यशवंतराव यांच्यासह काँग्रेस, भाजपही येथे पाय रोवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. स्वपक्षातील विरोधकांचे छुपे आव्हान मोठे आहे. लांजा, राजापूर शहरात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींबरोबरच ग्रामीण भागातही त्यांना लक्ष ठेवावे लागणार आहे. हा मतदारसंघ भविष्यात निश्‍चितच हाय होल्टेज ठरू शकतो.

सामंत यांचा जनसंपर्क
रत्नागिरी मतदारसंघात आमदार उदय सामंत यांनी जम बसविला आहे. जयगड ते दाभोळ गॅस पाईपलाईनचे वादळ त्यांच्यावर घोंगावत असले तरीही त्याची व्याप्ती मोठी नाही. सामंत यांनी काही दिवसांमध्ये विकासकामांसह प्रत्येक जिल्हा परिषद, पंचायत समिती क्षेत्रात जनसंपर्क ठेवला आहे. खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली गावागावामध्ये ते फिरत आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ सुरक्षित ठरण्याची शक्‍यता आहे. दापोली-खेड-मंडणगडमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा असला, तरीही तेथे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचा मुलगा योगेश कदम यांनी कार्यक्रमांचा धडका लावला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com