महामार्ग रुंदीकरण विरोधात संघर्ष समित्यांचे पीक

मुझफ्फर खान
सोमवार, 1 जानेवारी 2018

गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण सुरू झाले आहे. त्याविरोधात ठिकठिकाणी संघर्ष समित्या स्थापन झाल्या आहेत. अनेक गावांतील बाधित लोक आणि दुसऱ्या फळीतील सर्वपक्षीय कार्यकर्ते एकवटले आहेत. रुंदीकरणाला विरोध सुरू आहे. परंतु या लढ्याला सामूहिक स्वरूप येण्याची गरज आहे.

चिपळूण - गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण सुरू झाले आहे. त्याविरोधात ठिकठिकाणी संघर्ष समित्या स्थापन झाल्या आहेत. अनेक गावांतील बाधित लोक आणि दुसऱ्या फळीतील सर्वपक्षीय कार्यकर्ते एकवटले आहेत. रुंदीकरणाला विरोध सुरू आहे. परंतु या लढ्याला सामूहिक स्वरूप येण्याची गरज आहे. पहिल्या फळीतील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा सहभाग आवश्‍यक असून रुंदीकरणाच्या विरोधात संघटितपणे लढा उभारण्याची गरज आहे. 

गुहागर-विजापूर हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून सरकारकडून मान्यता मिळाली. त्याचे स्वतंत्र कार्यालय कोल्हापूरला सुरू झाले. रुंदीकरणाची निविदा प्रक्रिया सुरू झाल्यानंतर गुहागर व चिपळूण तालुक्‍यातील नागरिक जागरुक झाले. रुंदीकरणात चिपळूण व गुहागर मार्गावरील मुख्य बाजारपेठा, घरे बाधित होणार आहेत. अनेकांच्या व्यवसायांवर गदा येणार आहे. काहीजण बेघर होणार आहेत. रुंदीकरणाची महामार्गावरील गावांना साधी कल्पनाही देण्यात आली नाही. 

ग्रामपंचायत स्तरावरही पत्रव्यवहार करण्यात आला नाही. मिरजोळी ते गुहागर या दरम्यानचे नागरिक प्रथम एकत्र आले. बैठका घेऊन सर्वपक्षीय अन्याय निवारण समिती स्थापन करण्यात आली. या समितीने शासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. निवेदनाद्वारे इशारेही दिले. 

चिपळूण तालुक्‍याच्या पूर्व विभागातील शिरगाव, पोफळी गावाचे रुंदीकरणात मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे शिरगाव बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी बैठक घेऊन रुंदीकरणाच्या विरोधात संघर्ष समिती स्थापन केली. 

ही समिती स्थापन झाल्यानंतर एका स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेऊन शिरगावमध्ये पुन्हा बैठकीचे आयोजन केले. त्याला सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित राहिले. याही बैठकीत रुंदीकरणाच्या विरोधात संघर्ष समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला. शिरगावमधील व्यापाऱ्यांची संघर्ष समिती या सर्वपक्षीय समितीमध्ये विलीन करण्याचा निर्णय झाला. 

रुंदीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्यापासून केवळ संघर्ष समित्या स्थापन केल्या जात आहेत. ठराविक लोक बैठकांमध्ये चमकुगिरी करीत आहेत. भाषणे ठोकून आपली हौस भागवली जात आहे. दुसरीकडे रुंदीकरणाचे कामही अडथळ्याविना जलदगतीने सुरू आहे. बाधित लोक केवळ संघर्ष समित्या आणि बैठकांमध्ये गुरफडून राहिले, तर रुंदीकरण केव्हा पूर्ण होईल याचा थांगपत्ता लागणार नाही. बाधितांचा आवाज सरकारी दरबारी पोचवायचा असेल, तर या लढ्याला संघटित रूप येणे गरजेचे आहे. दोन्ही तालुक्‍यातील लोकप्रतिनिधींना या लढ्यात सामील करून घेण्याची गरज आहे. 

लोकप्रतिनिधींकडून एकही लक्षवेधी नाही
मागील सहा महिन्यांपासून रुंदीकरणाचा विषय चर्चेत आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनात या विषयावर एकाही लोकप्रतिनिधीने लक्षवेधी मांडली नाही किंवा तारांकित प्रश्‍न उपस्थित केला नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या दृष्टीने हा प्रश्‍न लोकहिताचा नाही का, असा प्रश्‍न नागरिकांमधून विचारला जात आहे. 

गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणाविरोधात सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्र आहेत. हा राजकारणविरहित लढा सर्वांच्या सहकार्याने यशस्वी व्हायला हवा. त्यामध्ये कोणतेही राजकारण येता कामा नये. या लढ्याचे नेतृत्व करण्यासाठी कोणीही पुढाकार घ्यावा. लोकहितासाठी आम्ही त्यांच्याबरोबर असू.
- जयंत शिंदे,
शिरगाव 

गुहागर आणि चिपळूणचे आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, प्रत्येक गावचे सरपंच, उपसरपंच, विविध पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी यांनी एकत्र येऊन रुंदीकरणाच्या विरोधात संघर्ष उभारण्याची गरज आहे.
-अब्बास सय्यद,
पोफळी

नागरिकांच्या मागण्या 

  • मालमत्तेचा योग्य मोबदला मिळाला 
  • रुंदीकरणाची परिपूर्ण माहिती मिळावी 
  • प्रकल्पग्रस्त म्हणून दाखला मिळावा
  • घर आणि व्यवसायासाठी बदली जागा मिळावी
     
Web Title: Ratnagiri News Guhagar-Vijapur highway Widening issue