मूकबधिर विद्यार्थ्यांच्या कलाभानाची अनुभूती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

रत्नागिरी - दीपावलीसाठी लक्ष्मीचौक येथील (कै.) केशव प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण व आकर्षक नवनवीन वस्तूंची निर्मिती केली आहे. जाड व गोल पुठ्ठा, रद्दी पेपर, वाया गेलेले कागद, करवंटी, कापलेले छोटे लाकडी तुकडे वापरून आकर्षक शोभेच्या वस्तू साकारल्या आहेत. हस्तकला प्रदर्शनात या वस्तू पाहायला मिळतील.

रत्नागिरी - दीपावलीसाठी लक्ष्मीचौक येथील (कै.) केशव प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण व आकर्षक नवनवीन वस्तूंची निर्मिती केली आहे. जाड व गोल पुठ्ठा, रद्दी पेपर, वाया गेलेले कागद, करवंटी, कापलेले छोटे लाकडी तुकडे वापरून आकर्षक शोभेच्या वस्तू साकारल्या आहेत. हस्तकला प्रदर्शनात या वस्तू पाहायला मिळतील. शुभेच्छापत्रं, कापडी पिशव्या, लाकडी शो पीस, छत्रपती शिवरायांची मातीची मूर्ती आणि मावळ्यांची फौज तसेच आकाशकंदिल बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

विद्यालयातर्फे ११ ऑक्‍टोबरपासून ३४ वे हस्तकला प्रदर्शन सुरू होणार आहे. सकाळी ११ वाजता आसमंत बेनोव्हलन्स फाउंडेशनचे अध्यक्ष तथा उद्योजक नंदकुमार पटवर्धन यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‌घाटन होणार आहे. १३ ऑक्‍टोबरपर्यंत दररोज सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत शाळेत टाकाऊ वस्तूंपासून उपयुक्त वस्तू बनवण्यात येतात. बोलता किंवा ऐकायला न येणारी ही मुले मन लावून काम करतात. अन्य विद्यार्थ्यांपेक्षा त्यांची आकलनशक्ती चांगली असते. कलात्मक शुभेच्छापत्रे करण्यात या विद्यार्थ्यांचा हातखंडा आहे. पेपर क्विलींग व ओआयजी शिटवरील शुभेच्छापत्रेही त्यांनी बनवली आहेत.

कलात्मकता आणि व्यवसायाची ओळख करून देण्याच्या उद्देशाने ३३ वर्षे हस्तकला प्रदर्शन भरवण्यात येते. यामध्ये मातीचे मावळे, पणत्या, रंगीबेरंगी आकाशकंदिल, लहान मुलांचे कपडे, कापडी पिशव्या, शो-पीस आदी वस्तूंचा समावेश आहे. प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थी लोकांशी संवाद साधतात व त्यातून त्यांच्या पुनर्वसनासाठी उपयोग होतो.

मूकबधिर विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी दि न्यू एज्युकेशन सोसायटी व शाळेकडून नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली जाते. विद्यार्थ्यांना शिवणकाम, लाकूडकाम, स्क्रीन प्रिटिंग, मातीकाम, संगणक शिक्षण दिले जाते, असे मुख्याध्यापिका सौ. अनुराधा ताटके यांनी सांगितले.

Web Title: Ratnagiri news handicap students prepare dipawali Ornamental item