तापमान वाढल्याने मासळी तळाला, २० टक्केच मासेमारी सुरू

राजेश शेळके
सोमवार, 5 मार्च 2018

रत्नागिरी - वातावरणातील बदलाचा परिणाम थेट मासेमारीवर झाला आहे. तापमान वाढल्याने मासळी तळाला आणि खोल समुद्रात गेल्याचे मच्छीमारांचे मत आहे. त्यामुळे २० टक्केच मासेमारी सुरू असून ८० टक्के बंद असल्याचा दावा त्यांनी केला. मासेमारी बंद असल्याने दरावरही परिणाम झाला आहे.

रत्नागिरी - वातावरणातील बदलाचा परिणाम थेट मासेमारीवर झाला आहे. तापमान वाढल्याने मासळी तळाला आणि खोल समुद्रात गेल्याचे मच्छीमारांचे मत आहे. त्यामुळे २० टक्केच मासेमारी सुरू असून ८० टक्के बंद असल्याचा दावा त्यांनी केला. मासेमारी बंद असल्याने दरावरही परिणाम झाला आहे. किलोमागे पन्नास रुपये दरवाढ झाली आहे. उपरती वाऱ्याऐवजी पावसाळी दक्षिणेकडील वारे वाहू लागल्याने समुद्रातील अंतर्गत बदल झाल्याचे जुन्या मच्छीमारांचे मत आहे. 

मासेमारी या कोकणातील प्रमुख व्यवसायावरील नैसर्गिक दुष्टचक्र काही संपता संपेना. मच्छीमारांपुढे नवा पेच आहे तो वारंवार बदलणाऱ्या हवामानाचा. थंडी संपली तरी अचानक प्रचंड उष्मा आणि अचानक थंडी पडत आहे. काही दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. उष्म्याच्या लाटेमुळे समुद्राच्या पृष्ठभागावर फिरणारी मासळी सुरक्षेच्या दृष्टीने तळाला गेली आहे. दुसरा परिणाम म्हणजे दर्जेदार मासळी तर खोल समुद्रात गेली आहे. त्यामुळे मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांना रिपोर्टच (मासळी) मिळत नाही. धुके पडत असल्याने मासेमारीवर त्याचा परिणाम होत आहे. वातावरणातील या बदलाने जिल्ह्यातील ८० टक्के मासेमारी बंद आहे, असे अनेक मच्छीमारांनी सांगितले.

वातावरणामध्ये मोठा बदल झाला आहे. उपरती वाऱ्याऐवजी पावसाळी दक्षिणेचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे गेली काही दिवस मासळीच मिळत नाही. म्हणून ८० टक्के मासेमारी बंद आहे. 
-सुधाकर मोंडकर, 

मच्छीमार, रत्नागिरी

मासेमारी बंदीतून सावरण्याच्या प्रयत्न मच्छीमार करीत आहेत. त्यात पारंपरिक आणि पर्ससीन मासेमारीच्या वादाने डोके वर काढले. तो वाद काही मिटलेला नाही. या चढ-उतारामुळे व्यवसाय आतबट्ट्यात आला आहे. ही तोट्याची दरी भरून काढण्यासाठी मच्छीमारांनी अत्याधुनिकतेची कास धरली आहे. त्यामध्ये बुलनेट हा नवा प्रकार आला. दोन्ही बोटींच्या साह्याने जाळे ओढले जाते. त्यांच्या परिघात येणारे सर्व मासळी त्या जाळ्यात सापडते. मात्र याला कायद्याने बंदी आहे. आता एलईडी हा या व्यवसायातील नवीन फंडा.

लाखो रुपये खर्च करून एलईडीच्या प्रकाश झोतात मासेमारी करण्याची पद्धत आहे. मासेमारी नौकेबरोबर एलईडीची यंत्रणा असलेली छोटी नौका असते. पाण्यात प्रखर प्रकाशझोत टाकल्यानंतर त्याला मासे आकर्षित होऊन एका ठिकाणी गोळा होतात. तेव्हा अन्य नौकेद्वारे जाळे टाकून ही मासेमारी केली जाते. एलईडीद्वारे मासेमारी करण्यास कायद्याने बंदी आहे की परवानगी याबाबत अजून संभ्रम आहे. यावरून मच्छीमारी संघटनांमध्ये विवाद चालू आहेत. यात वातावरणातील बदलाची भर पडली.

माशांची आवक घटल्याने दर वधारले आहेत. सुरमई, पापलेट, सरंगा आदी मासळीच्या दरामध्ये ५० ते १०० रुपयांनी वाढ झाली आहे. पावसाळी वातावरण बदलण्याची आम्ही वाट पाहात आहोत, असेही मच्छीमारांनी सांगितले. त्यामुळे अनिश्‍चित कालावधीसाठी मासेमारी बंद राहणार आहे. 

एलईडी मासेमारी मेहरनजर?
जिल्ह्यात एलईडी मासेमारी आणि घुसखोरी करून केल्या जाणाऱ्या बेकायदेशीर मासेमारीवर कारवाई सुरू आहे. काही दिवसांपूर्वी देवगड येथे रत्नागिरीतील नौकांवर कारवाई झाली. परंतु वस्तुस्थिती वेगळीच आहे. नाटे येथे देवगड येथील मच्छीमार बिनधास्त मासेमारी करीत असल्याचे समजते. ती  कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, असा सवाल मच्छीमारांनी व्यक्त केला आहे. या हद्दीतील अधिकारी रत्नागिरीत येऊन कारवाई करतात. मग त्यांच्या हद्दीतील बेकायदेशीर मासेमारीवर मेहरनजर का? इथे कसले पाणी मुरते, असा आरोप मच्छीमार करीत आहेत.

Web Title: Ratnagiri News Heat affects on Fishing and Mango production