राजापुरात सर्वाधिक 264 मिमी पाऊस

राजेश कळंबटे
गुरुवार, 21 जून 2018

रत्नागिरी - जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. राजापूर तालुक्याला सर्वाधिक तडाखा बसला आहे. पावसामुळे रत्नागिरी शहरात गोखले नाका परिसरात पाणी साचल्याने व्यापार्‍यांची तारांबळ उडाली होती. दुपारी जोर ओसरल्यानंतर पाण्याचा निचरा झाला. राजापूरात राजवाडी येथील साकवावरील स्लब वाहून गेला आहे. 

जिल्ह्यात गुरुवारी (ता. 21) सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या चोवीस तासात 82.11 मिमी सरासरी पाऊस झाला. त्यात मंडणगड 3, दापोली 7, खेड 84, गुहागर 148, चिपळूण 45, संगमेश्‍वर 62, रत्नागिरी 85, लांजा 41, राजापूर 264 मिमी पाऊस पडला आहे. सर्वाधिक पावसामुळे राजापुरात मोठे नुकसान झाले आहे.

पावसामुळे झालेली समस्या...

  • राजापूर दुर्गवाडी येथे बंधारा आणि रस्ता वाहून गेला.
  • राजवाडी येथील छोट्या वहाळावरील साकवाचा स्लॅबच वाहून गेल्याने वाहतुकीला अडथळा.
  • चिपळूण शिवाजीनगर येथे सुरेंद्र कदम यांच्या घराचे 57 हजार 400 रुपयांचे, सरंक्षण भिंत कोसळल्याने 7 लाख 60 रुपयांचे नुकसान.

कुर्धे येथे कातळावरील पर्‍याला आलेल्या पाण्याने अनेकांची वाट अडवली. गुडघाभर पाणी वेगाने वाहत असल्यामुळे त्यातून रस्ता पार करणेही ग्रामस्थांनी टाळले. जोर ओसरल्यानंतर साचलेले पाणी वाहून गेले. बाजारपेठ परिसरात गोखले नाका येथे काल रात्री पावसाचे पाणी साचल्याने वाहतूकीला अडथळा होत होता.

हवामान खात्याकडून प्राप्त संदेशानुसार रत्नागिरी जिल्ह्यात 24 जूनपर्यंत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. जनतेने सावध व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. समुद्र खवळलेला असल्याने मच्छीमारांनी मासेमारीसाठी जाऊ नये.

Web Title: Ratnagiri News Heavy Rains in Rajapur