वानरांना पळवून लावणारे घरगुती उपकरण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

लांजा - वानर आणि माकडांपासून शेतीचे अतोनात नुकसान होते. त्यावर वानरांना पळवून लावणारे घरगुती उपकरण सूर्यकांत गणेश पंडित ऊर्फ राजू पंडित या साटवली (ता. लांजा) येथील तरुण शेतकऱ्याने तयार केले आहे. घरच्या घरी उपकरण बनविता येते. त्याचा चांगला फायदा झाल्याचा अनुभव आला आहे.

पाणीपुरवठ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पीव्हीसी पाईपचा वापर करून ते तयार केले आहे. या पाईपची बंदुकीसारखी विशिष्ट रचना केली आहे. त्याला घरगुती गॅस पेटविण्याचा लायटर बसविण्यात आला आहे. बंदुकीच्या नळकांड्याच्या बाजूने कांदा किंवा बटाटा आत खोलवर बसवायचा. त्यानंतर लायटरची ठिणगी जेथे पडते, तेथे परफ्युमसारख्या गॅसच्या बाटलीतून थोड्याशा गॅसची फवारणी करायची आणि तो कप्पा बंद करून बंदूक दूरवर रोखायची.

त्यानंतर लायटरचे बटन दाबून ठिणगी पाडायची. ठिणगी पडताच कांदा-बटाटा साधारणतः तीस मीटर अंतरापर्यंत दूरवर उडून जातो. जाताना तो मोठा आवाज करतो. या आवाजाने वानर पळून जातात. काही तास तरी ते परत येत नसल्याचा अनुभव पंडित यांनी घेतला आहे. हे उपकरण तयार करायला एक हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. वानरांना मारणे हा गुन्हा आहे. त्यामुळे त्यांना हाकलण्यासाठी हे उपकरण परिणामकारक ठरू शकते.

मोठ्या आवाजाला वानरे घाबरतात, हे लक्षात घेऊन हे उपकरण तयार केले आहे. वानरांना पळवून लावण्यासाठी आवाज करणारे एक यांत्रिक उपकरण एका प्रदर्शनात पाहिल्यानंतर असे उपकरण स्वतःच तयार करण्याची कल्पना सुचली. तंत्रज्ञानाचा योग्य वापर केला, तर घरच्या घरी हे उपकरण तयार करता येऊ शकते.
राजू पंडित,
शेतकरी.

Web Title: Ratnagiri News Household appliances that Abduct monkeys