आंगले येथे सापडलेले मानवाकृती असलेले कातळशिल्प

राजेंद्र बाईत
गुरुवार, 22 मार्च 2018

आंगले ग्रामपंचायत कार्यालयाचे आवार, बाकाळे, शहरानजीक रानतळे येथे नव्याने सापडलेल्या कातळशिल्पाची भर पडली आहे. या कातळशिल्पांमध्ये सुमारे 17 फूट उंच, 16.7 फूट रूंद मानवाकृती चित्रासह , 9 फूट लांब, 8 फूट उंच एक शिंगी गेंडा आदी चित्रांचा समावेश आहे. आंगले येथे सापडलेले मानवाकृती चित्र असलेले कातळशिल्प आजपर्यंत शोधमोहिमेमध्ये सापडलेल्या चित्रांमध्ये सर्वाधिक मोठे आहे. 

राजापूर - हजारो वर्षापूर्वीच्या मानवी जीवनाच्या पाऊलखुणा सांगणारी कातळशिल्प गेल्या काही वर्षामध्ये तालुक्‍याच्या विविध भागांमध्ये आढळली आहेत. त्यामध्ये आंगले ग्रामपंचायत कार्यालयाचे आवार, बाकाळे, शहरानजीक रानतळे येथे नव्याने सापडलेल्या कातळशिल्पाची भर पडली आहे. या कातळशिल्पांमध्ये सुमारे 17 फूट उंच, 16.7 फूट रूंद मानवाकृती चित्रासह , 9 फूट लांब, 8 फूट उंच एक शिंगी गेंडा आदी चित्रांचा समावेश आहे. आंगले येथे सापडलेले मानवाकृती चित्र असलेले कातळशिल्प आजपर्यंत शोधमोहिमेमध्ये सापडलेल्या चित्रांमध्ये सर्वाधिक मोठे आहे. 

पर्यावरणप्रेमी सुधीर रिसबुड, धनंजय मराठे आणि अन्य सहकाऱ्यांच्या प्रयत्नातून कातळशिल्पांच्या संवर्धनासाठी नुकत्याच मंजूर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद होवून मंजूरीही मिळालेली आहे. अशा स्थितीमध्ये नव्याने कातळशिल्प सापडल्याने कातळशिल्पांची गेल्या काही वर्षापासून सातत्याने शोधमोहीम राबवून त्यांच्या सवर्धनासाठी प्रयत्नशील असलेल्या संशोधकांच्या आनंदामध्ये भर पडली आहे.

सुधीर रिसबूड, धनंजय मराठे आणि सहकारी कातळशिल्प संशोधकांनी सुमारे तीनशेहून अधिक कातळशिल्पांचा शोध लावला आहे. त्यामध्ये विविध प्राणी, भौमितिक रचना, मनुष्याकृती, चित्रकृती व दिशादर्शक खुणा आदींचा समावेश आहे. संशोधकांच्यादृष्टीने अभ्यासासह एक औत्स्युक्‍याचा विषय बनलेल्या या कातळशिल्पांमध्ये आंगले, रानतळे आणि बाकाळे येथे सापडलेल्या कातळशिल्पांचा आता नव्याने भर पडली आहे. 

तालुक्‍यातील आंगले येथील ग्रामस्थ शशिकांत काकीर्डे यांच्या आंगले ग्रामपंचायतीच्या आवारातील जमिनीमध्ये मानवाकृती कातळशिल्प सापडले आहे. काहीप्रमाणात झीज झालेले हे कातळशिल्प आंगले येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यानी या कातळशिल्पाची तातडीने साफसफाई केली.

त्यामध्ये उपसरपंच सुरेश सरवणकर, ग्रामसेवक श्री. पांचाळ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नितीन शिंदे, ग्रामस्थ मनोज सौंदळकर, दिलीप बावकर, गंगाराम सौंदळकर, शिवराम शिंदे, शिक्षक विश्‍वास प्रभूदेसाई, रविंद्र वणजू, गुरूदत्त कांबळे आदी ग्रामस्थही साफसफाई मोहिमेत सहभागी झाले होते. तर, रानतळे येथे हर्डी येथील महेश जड्यार यांना एक शिंगी गेंड्याचे कातळशिल्प सापडले.बाकाळे येथे मंदार परांजपे यांच्या जागेमध्ये कातळशिल्प सापडले आहे.

इ.स.पूर्व पाच हजार वर्षापूर्वीची असलेली कातळशिल्प इतिहासकालीन कलेचा पुरातन ठेवा म्हणून त्याचे जतन आणि संवर्धन होणे गरजेचे आहे. पर्यावरणप्रेमींसह कातळशिल्प संशोधक सुधीर रिसबूड आणि सहकारी कातळशिल्पांच्या खजिन्याचे संवर्धन होण्याच्यादृष्टीने प्रयत्नशील असून त्याला लोकप्रतिनिधींसह स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासन यांची साथ मिळणे गरजेचे आहे. गेल्या काही वर्षामध्ये कातळशिल्पाकडे पर्यटकांसह लोकांचा बघण्याचा बदललेला दृष्टीकोन निश्‍चितच आशादायी म्हणावा लागेल. 

- धनंजय मराठे, कातळशिल्प अभ्यासक

Web Title: Ratnagiri News Human Sculpture found in Angale