जमिनीखाली दबलेले नैसर्गिक स्रोत दुर्लक्षित

जमिनीखाली दबलेले नैसर्गिक स्रोत दुर्लक्षित

चिपळूण - चिपळूण शहरातील अनेक भागांत दहा-बारा फूट खाली खोदले की, पाण्याचा मुसंडा बाहेर पडतो. काळाच्या ओघात दबून टाकलेले हे पाणी उसळी मारून वर येते, अशी परिस्थिती आहे. तरीही शहरातील नागरिकांना पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नाही. शहरात दबलेल्या पाणीसाठ्याचा वापर करण्याची गरज आहे. निसर्गाने दिलेल्या पाण्याचा उपयोग शहरात होत नाही हे शहराचे मोठे दुर्दैव आहे.  

पालिकेकडून एक दिवस पाणी पुरवण्यात खंड पडला, तर पाण्यासाठीही दाहीदिशा करावी लागते. त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून ग्रॅव्हिटीची पाणी योजना करण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. ही योजना झाली तर १९५२ पर्यंत शहरातील पाणीटंचाईचा प्रश्‍न मिटणार आहे. तसेच नागरिकांच्या दैनंदिन गरज भागवू शकतील, असे नैसर्गिक जलसाठे शहरात आहेत. ते खुले करता येणे शक्‍य आहे.

पूर्वी शहर लहान होते, तेव्हा कापसाळच्या धरणातून पाणी मिळत होते. त्यापूर्वी, हे शहर नैसर्गिक पाणी साठ्यावरच जगले हे वास्तव आहे. ज्या जलसाठ्यांचा वापर शहरात होत होता, त्याचे पुढे जतन झाले नाही. शहरातील नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी देताना जलशुद्धीकरण प्रकल्प आवश्‍यक आहे. शहराचा विस्तार वाढला आहे. घरांची जागा अर्पाटमेंटने घेतली आहे.

प्रत्येकाला पुरेसे पाणी देण्यासाठी पाणी योजना अत्यावश्‍यक बाब बनली. परंतु शहराचा विस्तार वाढल्यावर अनेक ठिकाणची तळी बुजविली गेली. त्याठिकाणी उंच इमारती उभ्या राहिल्या. सार्वजनिक विहिरींचा खासगी वापर सुरू झाला. बांधकामाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी नव्या विहिरी बांधल्या गेल्या. शहरातील नैसर्गिक जलस्रोत थेट गटाराला मिळू लागले आणि ‘काखेत कळसा गावाला वळसा’ म्हण साक्षात अनुभवण्याचे दिवस चिपळूण शहरातील नागरिकावर आले. 

शहराच्या जमिनीत दबलेले पाणी पिण्यासाठी नको परंतु इतर कारणासाठी वापरले तरी त्या पाण्याला वाट मिळणार आहे. चिपळूण शहराला सध्या १२ लाख लिटर पाणी दररोज लागते. वाशिष्ठी नदीच्या पाण्यावर शहराची तहान भागवली जाते. नळपाणी योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या या पाण्याचा उपयोग केवळ पिण्यासाठी नव्हे तर कपडे धुणे आणि घरासमोरील बाग फुलविण्यासाठी सुद्धा होतो.

शहरात अनेक ठिकाणी पाणी चोरी होते. बांधकामासाठीही योजनेच्या पाण्याचा वापर होते. नैसर्गिक जलस्रोतांवर बाग फुलवली. तेच पाणी कपडे धुण्यासाठी तसेच बांधकामासाठी वापरले तर पाणी योजनेवरील ताण कमी होऊन कमी दाबाच्या पाण्याचा प्रश्‍न निकाली निघेल. शहरात २३ ठिकाणी सार्वजनिक नळ कनेक्‍शन आहेत. तेथील पाण्याच्या वापरावरही मर्यादा घालण्याची गरज आहे.

चिपळूण बाजारपेठेतील सार्वजनिक विहिरींचा खासगी वापर सुरू आहे. काही व्यापाऱ्यांनी सार्वजनिक विहिरीवर अनधिकृत ताबा मिळवला आहे. ज्यावेळी नळाला पाणी येत नाही अशावेळी विहिरींच्या पाण्याने तूट भागवणे सहज शक्‍य आहे. पालिकेने शहरातील सार्वजनिक विहिरींची दुरुस्ती करून त्या खुल्या केल्या पाहिजेत.
- समीर कोवळे, 

चिपळूण

तळी बुजवून उंच इमारती
तळ्यांचे शहर म्हणून ओळख असलेल्या चिपळूण शहरातील अनेक तळी बुजवून तेथे आता उंच उंच इमारती उभ्या राहिल्या आहेत. तरीही काविळतळी, मार्कंडी, बुरुमतळी, पाग, रावतळे, गोवळकोट, खेंड भागात नैसर्गिक जलस्रोत जिवंत आहेत. त्यांचा वापर होण्याची गरज आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com