रत्नागिरी जिल्ह्यातील नाट्यगृहांचा पडदा पडलेलाच...

रत्नागिरी जिल्ह्यातील नाट्यगृहांचा पडदा पडलेलाच...

देवरूख - झापांच्या थिएटरपासून सुरू झालेली कोकणची नाट्यसंस्कृती बदलत्या काळात बंदिस्त नाट्यगृहात येऊन उभी राहिली खरी; मात्र आता या नाट्यगृहांना नाटकांची प्रतीक्षा असल्याची परस्पर विरुद्ध परिस्थिती निर्माण झाली आहे. 

जिल्ह्यातील रत्नागिरी व दापोली वगळता इतरत्र नाट्यगृहांची अवस्था वाईटच आहे. संगमेश्‍वर येथील रंगमंदिरात गेल्या ५ वर्षांत नाटकासह अन्य करमणुकीचा एकही कार्यक्रम पार पडलेला नाही.

मराठी रंगभूमीसाठी कोकणने अनेक कलाकार दिले. कोकणात नाटक हेच मनोरंजनाचे साधन असल्याने १९६० ते ९० च्या तीन दशकांत संगीत नाटकांचा मोठा गाजावाजा होता. बदलत्या काळात मनोरंजनाच्या साधनांचा प्रसार झाला. आणि नाटकांची जागा पडद्यावरील चित्रपटांनी घेतली. याचा परिणाम संगीत नाटकांवर झाला. याच सुमारास नामवंत कंपन्यांची प्रसिद्ध नाटक तात्पुरत्या उभारलेल्या नाट्यगृहात आली आणि त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला.  

या नंतरच्या कालखंडात पूर्वीची कमी बजेटची नाटकं दुप्पट बजेटची झाली. कलाकारांचे मानधनही कित्येक पटीने वाढले. या सर्वांचा परिणाम नाटक प्रयोगाच्या तिकीट दरांवर झाला. याचबरोबर नाट्य ठेकेदारांना येणारे अन्य खर्चही कमालीचे वाढल्याने नाटक दौरा आणणे परवडेनासे झाले आणि बंदिस्त नाट्यगृह असूनही नाटकांची प्रतीक्षा करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

संगमेश्‍वर येथील व्यापारी पैसाफंड संस्थेने १९६८ साली पैसाफंड हायस्कूल येथे रंगमंदिराची उभारणी केली. डिसेंबर १९६८ ला येथे नाटकाचा पहिला प्रयोग झाला. गेल्या ४६ वर्षांत या रंगमंदिरात नाटक कंपन्यांची असंख्य नामवंत नाटकं सादर करण्यात आली. मात्र, नोव्हेंबर २०११ पासून डिसेंबर २०१७ पर्यंत या रंगमंदिरात एकही नाटक वा अन्य मनोरंजनाचा एकही कार्यक्रम झालेला नाही. अशीच स्थिती अन्य तालुक्‍यांत असून, नाटकांच्या भवितव्याच्या दृष्टीने ही गोष्ट शोचनीय आहे. 

जिल्ह्यातील चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र आणि खेड येथील मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्र यांची अवस्था न बोलण्यासारखी आहे. राजापूर आणि लांजातही असाच प्रकार असून, केवळ दापोली आणि रत्नागिरी या दोनच ठिकाणचे रसिक गेले दोन वर्षे नाटकांच्या दृष्टीने भाग्यवान 
ठरले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com