निधी खर्चाची माहिती आता एका क्‍लिकवर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

रत्नागिरी - ग्रामीण भागात होणाऱ्या कामांचा लेखाजोखा अनेक वेळा मिळत नाही. त्यात अनियमिततेच्या तक्रारी होतात. चौदाव्या वित्तमधून लाखो रुपयांचा निधी थेट ग्रामपंचायतींना दिला आहे. त्यात पारदर्शीपणा येण्यासाठी मंजूर आराखड्यापासून ते काम पूर्ण होईपर्यंतची माहिती वेबसाईटवर उपलब्ध करून दिली आहे.

रत्नागिरी - ग्रामीण भागात होणाऱ्या कामांचा लेखाजोखा अनेक वेळा मिळत नाही. त्यात अनियमिततेच्या तक्रारी होतात. चौदाव्या वित्तमधून लाखो रुपयांचा निधी थेट ग्रामपंचायतींना दिला आहे. त्यात पारदर्शीपणा येण्यासाठी मंजूर आराखड्यापासून ते काम पूर्ण होईपर्यंतची माहिती वेबसाईटवर उपलब्ध करून दिली आहे. एका क्‍लिकवर मंजूर रक्‍कम, झालेली कार्यवाही आणि खर्ची पडलेला निधी ही माहिती पाहता येते. २०१६-१७ मधील कामांची माहिती भरण्याचे काम सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ८४५ पैकी ५२३ ग्रामपंचायतींचे आराखडे वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

ग्रामपंचायतीत १४ व्या वित्त आयोगाचा किती निधी आला, किती खर्च केला गेला हे जाणून घेण्यासाठी शासनाने लिंक तयार केली आहे. गावात खर्च प्रामाणिकपणे होतो का ते पाहण्यासाठी हा प्रयत्न केला गेला आहे. गावातील २०१६-१७ या वर्षाची (संपूर्ण भारतात) कामे त्यामध्ये पाहता येणार आहेत. अनेक वेळा रस्त्याचे काम मंजूर होते; परंतु त्यावर किती निधी खर्च झाला याची माहिती मिळत नाही. काही वेळा निधी खर्च होतो, प्रत्यक्षात तिथे कामच झालेले नसते अशा अनेक तक्रारी दाखल होतात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. त्यामुळे हा निधी खर्ची पडताना भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे.

दृष्टिक्षेपात

 •  पारदर्शकतेसाठी पाऊल

 •  लांजाचे शंभर टक्‍के काम पूर्ण

 •  खेड, रत्नागिरी कुर्मगतीने

 •  अनियमिततेला बसणार आळा

ग्रामपंचायती सक्षम करण्यासाठी केंद्र शासन प्रयत्नशील आहे. जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात चौदाव्या वित्ततून ३६ कोटी निधी प्राप्त झाला होता. त्याचे वाटप लोकसंख्येनुसार ८४५ ग्रामपंचायतींना करण्यात आले. रत्नागिरी तालुक्‍याला सर्वाधिक ६ कोटी १० लाख रुपये निधी मिळाला. आमचं गाव, आमचा विकास ग्रामपंचायत आराखडे तयार करण्यात आले.

जिल्ह्यातील ५२३ ग्रामपंचायतींनी आराखडे तयार करून ते वेबसाईटवर भरले. त्यातील ६२ आराखडे प्रलंबित असून ४६२ आराखडे वेबसाईटवर आहेत. २०१७-१८ या आर्थिक वर्षातील १३० ग्रामपंचायतींचे आराखडे वेबसाईटवर आहेत. १५.३८ टक्‍के काम पूर्ण झाले आहे. शंभर टक्‍के माहिती भरली जावी, असे आदेश आहेत. लांजा तालुक्‍याने शंभर टक्‍के काम पूर्ण केले आहे, तर रत्नागिरी व खेड तालुक्‍याने सर्वात कमी वीस टक्‍केच माहिती भरली आहे.

अशी माहिती पाहाल
चौदाव्या वित्ततील निधीची माहिती पाहण्यासाठी www.planningonline.gov.in  ही वेबसाईट तयार केली आहे. त्यामध्ये ReportData.do, ReportMethod=getnualPlanReport या पद्धतीने कोणाही नागरिकाला माहिती पाहता येऊ शकेल.

 ग्रामपंचायतींची तालुकानिहाय आकडेवारी
   तालुका     १६-१७      १७-१८ 

 • चिपळूण       ९५           ०
 • दापोली        ९४           ०
 • गुहागर         २९           ०
 • खेड            २३          ०
 • लांजा          ६०          २०
 • मंडणगड       ४४           ०
 • राजापूर        ५५          २५
 • रत्नागिरी      १९            ४
 • संगमेश्‍वर       ४३          ३८
Web Title: Ratnagiri News Information on fund expenditure is now available in one click