एक लाख रुपयांची बॅग वाहकाकडून परत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

दाभोळ-  दापोली-बोरिवली एस.टी. घेऊन जाणाऱ्या एका वाहकाने प्रवाशाची १ लाख २७ हजार रुपये असलेली बॅग परत देऊन प्रामाणिकपणा दाखविला.

दाभोळ - दापोली-बोरिवली एस.टी. घेऊन जाणाऱ्या एका वाहकाने प्रवाशाची १ लाख २७ हजार रुपये असलेली बॅग परत देऊन प्रामाणिकपणा दाखविला. 

दापोली आगारातील वाहक एकनाथ लिंगायत हे शुक्रवारी (ता. ३) दुपारी १ वाजता सुटणारी दापोली-बोरिवली बस घेऊन चालले होते. ही बस रामवाडी येथे चहापानासाठी थांबली होती; मात्र त्यानंतर १५ मिनिटे झाली, तरी या बसमधील एक प्रवासी या बसमध्ये परतला नसल्याने याबाबत लिंगायत यांनी रामवाडी येथील वाहतूक नियंत्रकांना याची माहिती दिली व बस पुढे मार्गस्थ झाली. ही बस पनवेल अगोदर आल्यावर रामवाडी येथे राहिलेल्या प्रवाशाशेजारी बसलेले प्रवासी दत्ताराम मोरे (रा. शिवतर, खेड) यांनी त्यांची बॅग वाहक लिंगायत यांना दिली. या बॅगेत १ लाख २७ हजार व २७ हजार रुपयांचे चेक असा ऐवज होता. त्यानंतर मागे राहिलेला प्रवासी दुसऱ्या दापोली बसने पनवेल येथे पोचला.

तोपर्यंत लिंगायत यांनी हा ऐवज असलेली बॅग पनवेल बस स्थानकातील वाहतूक नियंत्रक निकाळजे यांच्याकडे सुपूर्द केली होती. या प्रवाशाचे नाव महेश बाबूराम कुमार (रा. सबना, ता. मनकापूर, जिल्हा गोंडा, उत्तर प्रदेश) असे होते. 
ते पनवेल बस स्थानकात पोचताच लिंगायत यांनी पनवेल बस स्थानकातील वाहतूक नियंत्रकांशी त्यांची भेट घालून दिली व महेश कुमार यांनी ओळख पटवून देताच त्यांची पैसे व चेक असलेली बॅग सुपूर्द करण्यात आली. महेश कुमार यांनी आपली पैसे असलेली बॅग पुन्हा आपल्याला परत मिळाल्याबद्दल आनंद व्यक्‍त केला व वाहक लिंगायत यांचे आभार मानले.

 

Web Title: Ratnagiri News Innocent Bus conductor