कोकणात प्रथमच केळीला विमा कवच 

राजेश कळंबटे
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

रत्नागिरी -  प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत हवामानावर आधारित पीक विमा योजना रत्नागिरीतील कळकवणे, तर सिंधुदुर्गतील चार महसुली मंडळातील केळी पिकांसाठी योजना लागू करण्यात आली आहे. या आधी आंबा, काजू पिकांना ही योजना लागू आहे. या वर्षी विमा भरपाईही घेणाऱ्यांची संख्या व रक्कम दोन्ही वाढली आहे.

रत्नागिरी -  प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत हवामानावर आधारित पीक विमा योजना रत्नागिरीतील कळकवणे, तर सिंधुदुर्गतील चार महसुली मंडळातील केळी पिकांसाठी योजना लागू करण्यात आली आहे. या आधी आंबा, काजू पिकांना ही योजना लागू आहे. या वर्षी विमा भरपाईही घेणाऱ्यांची संख्या व रक्कम दोन्ही वाढली आहे. 

गेली दोन वर्षे येथील केळीचे उत्पादन वीस हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्रावर असल्यामुळे कृषी विभागाकडून प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याला या वर्षी मान्यता देण्यात आली आहे. कृषी विभागाच्या मागण्यानुसार या वर्षी केळी पिकासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील कळकवणे (चिपळूण) महसुली मंडळाची निवड करण्यात आली आहे.

या मंडळातील काही गटांनी केळीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले आहे. वीस हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्रावर येथील महसुली मंडळातून केळीचे पीक घेतले जाते. गेली दोन वर्षे अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांनी केळी पिकाचे मोठे नुकसान झाले होते. त्याची नुकसानभरपाई मिळालेली नव्हती. त्यासाठी कृषी विभागाने शासनाकडे केळी पिकासाठी या महसुली मंडळाचा विचार केला जावा, अशी मागणी केली होती.

त्याला हिरवा कंदील मिळाला व या मंडळाचा समावेश झाला. त्याचे निकष उर्वरित 33 जिल्ह्याप्रमाणेच निश्‍चित केले आहेत. रत्नागिरीबरोबरच सिंधुुदुर्ग जिल्ह्यातील बांदा, मडुरा (सावंतवाडी), तळकट, भेडसी (दोडामार्ग) या महसुली मंडळातील केळी पिकांसाठी पीक विमा योजना लागू केल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने सांगितले. 
गेली पाच वर्षे आंबा, काजूसाठी ही विमा योजना लागू आहे. त्याचे निकष निश्‍चित करण्यासाठी शासनाकडून विशेष समितीही नेमण्यात आली होती. दरवर्षी त्यात बदल केले जात होते. 

बागायतदारांना पुरेसा वेळ 
2017-18 या आर्थिक वर्षासाठी योजनेचे निकष बदललेले नाहीत. हंगाम सुरू होण्यापूर्वी दोन महिने आधी शासन निर्णय जाहीर केल्यामुळे जास्तीत जास्त आंबा बागायतदारांना याचा लाभ घेता येईल. बॅंका आणि विमा कंपनी यांच्याकडून योग्य पध्दतीने नियोजन करण्याची गरज आहे. मागील वर्षी 17 कोटी रुपये विक्रमी पीक विमा प्राप्त झाला होता. त्यामुळे या वर्षी आंबा बागायतदारांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. 

हवामानाचे निकष आणि लाभ 
- केळी पिकासाठी कमी तापमान 1 नोव्हेंबर ते 30 एप्रिल कालावधी आहे. सलग 3 दिवस किमान तापमान 8 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास 30 हजार रुपये लाभ मिळेल.

- वेगाचा वारा - 1 मार्च ते 31 जुलै - 40 किलोमीटर प्रति तास किंवा त्यापेक्षा जास्त वेगाने वारे वाहिल्याची नोंद राहिल्यास 60 हजार रुपये लाभ.

- जास्त तापमान - 1 मार्च ते 31 मे मार्च - 40.5 अंश सेल्सिअस, मेमध्ये 44 अंश सेल्सिअस सलग तीन दिवस राहिल्यास 12 हजार रुपये, सलग चार दिवस राहिल्यास 18 हजार रुपये, सलग पाच दिवसांसाठी 30 हजार रुपये लाभ मिळणार आहे.

- केळीसाठी एक लाख 20 हजार रुपये हेक्‍टरी विमा संरक्षित रक्‍कम लाभार्थ्यांना मिळणार आहे.

- 1 जानेवारी ते 30 एप्रिल या कालावधीत गारपीट झाल्यास 40 हजार रुपये लाभ दिला जाणार आहे. यासाठी शेतकऱ्याला हेक्‍टरी 2 हजार रुपये द्यावे लागतील. केंद्र व राज्य शासन हेक्‍टरी 4,600 रुपये भरणार आहे. 

Web Title: ratnagiri news insurance to Banana