संगमेश्वर तालुक्यात सिंचन योजनेद्वारे सव्वाशे हेक्‍टरला पाणी

संदेश सप्रे 
बुधवार, 9 मे 2018

कमी शेतजमीन व आर्थिक दुर्बलता यामुळे काही वेळा उपलब्ध पाणीसाठा वापरता येत नाही. त्यामुळे कोकणात जमीन बारमाही ओलिताखाली आणता येत नाही. मात्र राजवाडी, धामणी व चिखली येथील बचत गटांनी कंबर कसून सव्वाशे हेक्‍टर क्षेत्र बारमाही ओलिताखाली आणले आहे.

कमी शेतजमीन व आर्थिक दुर्बलता यामुळे काही वेळा उपलब्ध पाणीसाठा वापरता येत नाही. त्यामुळे कोकणात जमीन बारमाही ओलिताखाली आणता येत नाही. मात्र राजवाडी, धामणी व चिखली येथील बचत गटांनी कंबर कसून सव्वाशे हेक्‍टर क्षेत्र बारमाही ओलिताखाली आणले आहे. या सिंचन योजनेत शेतकऱ्यांचा वाटा २० ते २५ टक्के असतो. देखभाल आणि दुरुस्तीसह वीज बिलही तेच भरतात. अल्पभूधारक लाभार्थी असल्याने सुमारे १०० हून अधिक कुटुंबांचा यामध्ये सहभाग आहे. उत्पादित माल विक्रीसाठी ॲपद्वारे भाजीविक्री सारखे उपक्रमही राबवले जातात. शेततळ्याद्वारे पाणीसाठा करून उन्हाळ्यात शेती करता येते हा धडा या तीन गावांनी घालून दिला आहे.  

राजवाडीत शेततळ्यात 35 लाख लिटरचा पाणीसाठा

 संगमेश्‍वर तालुक्‍यातील राजवाडी, धामणी आणि चिखली या तीन गावांमधील मिळून सुमारे सव्वाशे एकर जमीन बारमाही ओलिताखाली आणण्यात यश आले. उपलब्ध पाणीसाठ्यापासून सिंचन व्यवस्था निर्माण केल्याने अवघ्या चार वर्षांत हा टप्पा गाठला. पुण्याच्या ॲलिकॉन कॅस्टलॉय लिमिटेड या कंपनीचे कार्यवाह भागीदार बासुरी फौंडेशनने यासाठी मदत केली.

२०१४ च्या नोव्हेंबरात राजवाडीतील कृषिरत्न पुरुष बचत गटाच्या १५ शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला. स्थानिक नदीवरील बंधाऱ्यातून पाणी उचलण्याची सुमारे साडेचार लाखांची योजना बनवली. गटाने १ लाख रुपये उभे केले. शेतकऱ्यांनी नदीपासून एक किलोमीटर लांब त्यांच्या शेतापर्यंत पाईपलाईन टाकली. २० एकरात उन्हाळी कडधान्य, भाजीपाल्याचे  उत्पादन सुरु केले.

पुढील वर्षी आणि १० शेतकरी सामील झाले. पाइपलाईन वाढवून आणि १० एकर क्षेत्र ओलिताखाली आणली. डोंगरमाथ्यावर ३० मीटर बाय ३० मीटर बाय ३ मीटरचे शेततळे खोदून गेल्या पावसाळ्यात तेथे सुमारे ३५ लाख लिटर पाणी साठवले. यंदाच्या उन्हाळी हंगामात डोंगर उतारावरून पाइपद्वारे पाणी २५ एकर शेतांपर्यंत आणले. राजवाडीतील ब्राह्मणवाडीमध्येही जवळच्या नदीचे पाणी उचलून बारमाही सिंचन योजना राबवल्याने २५ एकर क्षेत्र असे एकूण ८० एकर क्षेत्र ओलिताखाली आले. संतोष भडवळकर, सुहास लिंगायत, मांजरेकर, गणेश सुर्वे, राऊत, मनोहर सुर्वे, सुरेश भडवळकर, सीताराम बाईत, जयराम भडवळकर, गंगाराम भडवळकर, सुरेश भडवळकर आदींचा सहभाग आहे.

उन्हाळी शेती करू न शकणाऱ्या शेतकऱ्याला सिंचन सुविधा निर्माण करण्याचे हे प्रयोग आहेत.यातून स्थानिक पातळीवर सिंचनक्षमता आणि कृषी उत्पादन वाढते असे सिद्ध झाले आहे.
- सतीश कामत, अध्यक्ष, पेम

धामणीत अडीच किलोमीटर चर खोदत शेतापर्यंत पाणी

राजवाडीतील सिंचन योजनांपासून प्रेरणा घेऊन धामणीतील १५ शेतकऱ्यांनी श्री गणेश शेतकरी उत्पादक बचत गट स्थापन केला. गावाजवळून वाहणाऱ्या नदीचे पाणी उचलून या गटाने तीन वर्षांपूर्वी भाडेतत्त्वावर घेतलेल्या पाच एकर क्षेत्रावर केळीची बाग फुलवली. जोडीला भाजीपाल्याचेही उत्पादन सुरू केले. यंदा या गटाने पाणी योजनेची पाईपलाईन डोंगरातून सुमारे अडीच किलोमीटर चर खोदत त्यांच्या शेतापर्यंत नेली.  सुमारे २५ एकर क्षेत्र बारमाही ओलिताखाली आणले. तसेच गटाची सदस्यसंख्या २५ वर गेली आहे. गटाचे अध्यक्ष धाकटू बांबाडे, उपाध्यक्ष अमोल लोध, सचिव आणि या सर्व उपक्रमांचे समन्वयक प्रकाश रांजणे, शांताराम बडद, हरिश्‍चंद्र बडद, प्रकाश बसवणकर आदींचा सहभाग आहे. केळी आणि भाजीपाला उत्पादनानंतर येथील नवलाई महिला बचत गटाने प्रत्येकी ३ संकरित आणि देशी गाईंच्या दुधाचे उत्पादन आणि विक्री प्रायोगिक पातळीवर सुरू केली आहे.

चिखलीनेही सिंचनाचा कित्ता गिरवला. नुकतेच तेथे सुमारे २० एकर क्षेत्र बारमाही ओलिताखाली आले. येथील १८ शेतकऱ्यांच्या भूमिरत्न पुरुष बचत गटाचे अध्यक्ष बाळकृष्ण धनावडे, सचिव सरपंच रवींद्र कानाल, भिकाजी धनावडे, श्रीकांत पाल्ये, विजय धनावडे, शशिकांत डिंगणकर आदींचा सक्रिय सहभाग आहे. या सर्व उपक्रमांमध्ये राजवाडीची पीपल्स एम्पॉवरिंग मुव्हमेंट (पेम)  संस्था समन्वयाची भूमिका पार पाडत आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक प्रा. डॉ. पराग हळदणकर यांचे नियमित मार्गदर्शन शेतकरी घेतात.

 

Web Title: Ratnagiri News irrigation scheme in Sangmeshwar Taluka