कल्पकतेमुळेच गणपतीपुळे देवस्थानला आयएसओ मानांकन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जानेवारी 2018

गणपतीपुळे देवस्थान ट्रस्टींची कामाची कल्पकता कौतुकास्पद आहे. त्यामुळेच आयएसओ मानांकन मिळवता आले, असे गौरवोद्‌गार नवी दिल्ली येथील इंडियन कौन्सिल ऑफ कल्चरल रिलेशनशिपचे अध्यक्ष खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी काढले.

गणपतीपुळे - गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात आल्यानंतर येथील भक्त निवासात राहतो. ते नीटनेटके आणि भाविकांचे आदरातिथ्य करणारे आहे. पर्यटकांना देण्यात येणारी माहिती आणि येथील संपूर्ण परिसराची स्वच्छता अशी गणपतीपुळे देवस्थान ट्रस्टींची कामाची कल्पकता कौतुकास्पद आहे. त्यामुळेच आयएसओ मानांकन मिळवता आले, असे गौरवोद्‌गार नवी दिल्ली येथील इंडियन कौन्सिल ऑफ कल्चरल रिलेशनशिपचे अध्यक्ष खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी काढले.

गणपतीपुळे संस्थानच्या कोकणदर्शन व्हिडिओ सीडी प्रकाशन, आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान समारंभ, श्रींची ऑनलाईन आरती सुविधेचा शुभारंभ संस्थानच्या भक्तनिवासात झाला. 

श्री. सहस्रबुद्धे म्हणाले, ‘‘संस्थानला आयएसओ मानांकन मिळाले. ही बाब आनंददायी आहे; परंतु अजूनही येणाऱ्या भक्तांना विशेष माहिती देऊन संस्थानला यापेक्षाही उंच शिखर गाठता येईल. आमची मंदिरे स्वच्छ, अनुशासित राहतील यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अन्नदानासारखे अवघड कार्य गणपतीपुळेत सुरु केले गेले. हे करत असतानाच मंदिर व्यस्थापनाचा अभ्यासक्रम येथे सुरू केला तर निश्‍चित त्यात भर पडेल. बहुसंख्य मंदिरे किनाऱ्यावर आहेत. सीआरझेडचा प्रश्न अनेकांना सतावतो. त्यासाठी मंदिर व्यवस्थापनांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत.’’

पालकमंत्री रवींद्र वायकर, खासदार विनायक राऊत यांनी संस्थानच्या उपक्रमांचे कौतुक केले. या वेळी रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित, संस्थानचे सरपंच डॉ. विवेक भिडे, ॲड. बाबासाहेब परुळेकर, सरपंच महेश ठावरे, नूतन मायंगडे, दीपक दुर्गवळी आदी उपस्थित होते.

निधीसाठी पालकमंत्र्यांचे साकडे...
गणपतीपुळे हे मनःशांतीचे ठिकाण आहे. कोकणात आलो तेव्हा पर्यटन वाढवण्याचा निर्धार केला. त्यासाठी सल्लागार नेमला. आरे-वारे, गुहागर सारखी पर्यटनस्थळे गोवा, सिंगापूरप्रमाणे विकसित होऊ शकतात. हे लक्षात घेऊन बाहेरचे पर्यटक येथे आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी ६७० कोटीचे अंदाजपत्रक तयार केले. कोकणातील किल्ले पाहण्यासाठी परदेशी पर्यटक हजेरी लावतील. त्यासाठी किल्ले संवर्धनाचा त्यात समावेश केला होता; परंतु शासनाने अवघे ३ कोटी ९१ लाख रुपये दिले. एवढ्या बैठका झडल्या, सल्लागार नेमले; परंतु आमची निराशा झाली, असे सांगत पालकमंत्री वायकर यांनी कोकणच्या पर्यटन विकासाला निधी मिळू दे, अशी प्रार्थना गणरायाला केली.

Web Title: Ratnagiri News ISO rating for Ganpatipule Devasthan