दापोली उपजिल्हा रुग्णालय सुविधांबाबत उपेक्षित 

हर्षल शिरोडकर
बुधवार, 28 मार्च 2018

दापोली - सलग दोन वेळा डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या येथील उपजिल्हा रुग्णालय विविध समस्यांच्या गर्तेत सापडले आहे.

दापोली - सलग दोन वेळा डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या येथील उपजिल्हा रुग्णालय विविध समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. 2013 मध्ये 50 खाटांच्या दापोली ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा कागदोपत्री प्राप्त झाला. मात्र, गेली पाच वर्षे अनेक वेळा उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाने पत्रव्यवहार करूनही सुविधांच्या बाबतीत दापोलीकर उपेक्षित राहिले आहे. 

तालुक्‍यासह मंडणगड, खेड तालुक्‍यातील अनेक सर्वसामान्य जनतेला या रुग्णालयातून माफक दरात वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. 2004 मध्ये बांधण्यात आलेल्या या रुग्णालयाच्या इमारतीला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. पावसाळ्यात संपूर्ण इमारतीला गळती लागते. रुग्णालयात उपचारासाठी अंतर्गत कक्षात दाखल असलेल्या रुग्णांचे हाल होतात. याबाबत रुग्णालय इमारतीला पत्राशेड उभारण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार करूनही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. या समस्येबाबत माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन रुग्णालयाची पाहणी केली होती.

यावेळी त्यांनी तत्काळ पत्राशेड उभारण्याचा सूचना बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. मात्र केवळ शवविच्छेदन गृहावर पत्राशेड उभारून बांधकाम विभागाने वेळ मारून नेली. महिला रुग्ण कक्ष व गरोदर स्त्री तपासणी कक्षासारख्या विभागात आजही पत्राशेड उभारण्यात आलेल्या नाहीत. रुग्णालयाच्या इमारतीला14 वर्षे पूर्ण झाली आहेत.

इलेक्‍ट्रिक वायरिंग, विविध प्रकारच्या उपकरणांसाठी आवश्‍यक पॉइंट्‌स नादुरुस्त झाले आहेत. रुग्णालयातील सांडपाणी वाहून जाणारी व्यवस्था नादुरुस्त झाल्याने डास आणि दुर्गंधीचा त्रास रुग्णालयातील कर्मचारी, अधिकारी, रुग्ण आणि नातेवाइकांना होतो. रुग्णासाठी असलेल्या इमारतीतील बाथरूमच्या फ्लोरिंग टाइल्स आणि पाण्याचे नळ तुटले आहेत.

रुग्ण, नातेवाईक जागा मिळेल तेथे बसतात 

रुग्ण आणि सोबत असलेल्या नातेवाइकांना बसण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही. यासाठी रुग्णालय प्रशासनाने दर्शनी भागात पत्राशेड उभारून देण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती. मात्र, याबाबत कोणतीही दखल अधिकाऱ्यांनी घेतली नाही. सद्यःस्थितीत रुग्ण व नातेवाईक जागा मिळेल तेथे बसत असून याचा अडथळा काम करणाऱ्या परिचारिका व कर्मचाऱ्यांना होतो.

Web Title: Ratnagiri News issue of facilities in the hospital