निव बुद्रूकच्या विभूतेंनी मिळवले केळींची बागेतून आर्थिक स्थैर्य

संदेश सप्रे
बुधवार, 10 जानेवारी 2018

आगामी काळात शेतीबरोबरच बागायतीचा व्याप वाढवून त्यात आधुनिकता आणत आपण हे काम सुरू ठेवणार आहोत. याकामी कुटुंबाची साथ चांगली असल्याने माझ्या पुढचा मोठा प्रश्‍न मिटला आहे.
- जयवंत विभूते, बागायतदार 

देवरूख - मुंबईतील गिरणी कामगाराची नोकरी गेल्यावर खचून न जाता गावी येत गावठी केळींची बाग फुलवून त्याला शेळीपालनाची यशस्वी जोड येथील एका शेतकऱ्याने दिली आहे. या व्यवसायातून निव बुद्रूकमधील जयवंत विभूते कुटुंबाचा गाडा हाकत आहेत.

पाचवीपर्यंत शिक्षण घेऊन विभूते मुंबईत गेले. ते गिरणीत काम करत. १९८२ ला गिरण बंद झाली आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न उभा ठाकला. यानंतर गावात येऊन जगण्याचा निर्णय त्यांनी घेतला. निव्यात विभूतेंनी पारंपरिक भातशेतीबरोबरच गावठी केळींची लागवड केली. उत्पन मिळत गेले तसे त्यांनी बागेची व्याप्ती २००५ पासून वाढवली. सोनकेळी आणि वेलची केळी या गावठी केळ्यांमधील सर्वोत्कृष्ट जातीची केळी ते पिकवतात. २० फुटांपर्यंत वाढणाऱ्या झाडाला एका घडाला २५० ते ३०० केळी लागतात. आठवड्यातून एकदा पाणी आणि पूर्णतः सेंद्रिय पद्धतीने लागवड केली आहे. हंगाम असो वा नसो, औषधी गुणधर्मांमुळे ही केळी ४० ते ५० रुपये डझन दराने विकली जातात.

केळ्यांना खत, शेळ्यांना खाद्य
विभूतेंनी दोन शेळ्यांपासून शेळीपालन सुरू केले. आज त्यांच्या गोठ्यात २५ शेळ्या आहेत. केळीची पाने शेळ्यांसाठी खाद्य ठरते, तर शेळीची लेंडी खत म्हणून विक्री होते. शिवाय बागेतील झाडांना लेंडीचे सेंद्रिय खत मिळते. एक शेळी ३ ते ४ हजारांना विकली जाते. 

केळीच्‍या विक्रीसाठी देवरूख-रत्नागिरी मार्गावरच स्वतःचे केंद्र त्यांनी सुरू केले. वर्षाला १०० पेक्षा अधिक घड ते येथेच विकतात. सर्व खर्च वजा जाता त्यांना २५ ते ३० हजारांचा नफा मिळतो. त्यांनी शेळीपालनही सुरू केले. या दोन धंद्यांचा मिलाफ साधत ते पारंपरिक भातशेतीही करतात. गेली १० वर्षे त्यांनी या जोडधंद्यातून संसारगाडा चालवला. मुलाचे शिक्षण पूर्ण केले. नोकरीपेक्षाही चांगले उत्पन्न ते कमावतात.

आगामी काळात शेतीबरोबरच बागायतीचा व्याप वाढवून त्यात आधुनिकता आणत आपण हे काम सुरू ठेवणार आहोत. याकामी कुटुंबाची साथ चांगली असल्याने माझ्या पुढचा मोठा प्रश्‍न मिटला आहे.
- जयवंत विभूते,
बागायतदार 

Web Title: Ratnagiri News Jayvant Vibhute success story